युपीएससी परीक्षा उत्तीर्ण प्रतीक कोरडेचा जि.प.अभ्यास केंद्रात सत्कार व मार्गदर्शन जि.प.स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र, काटोलचा ‘ग्रेटभेट’ उपक्रम विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन
काटोल-/कोंढाळी प्रतिनिधी/ दुर्गा प्रसाद पांडे -दि.३ जून
– नुकताच जाहीर झालेल्या युपीएससी परीक्षेत 638 रँक घेऊन परीक्षा उत्तीर्ण करणारे नरखेड येथील प्रतीक नंदकुमार कोरडे यांचा ‘जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल’ येथे शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार व ‘ग्रेटभेट’ उपक्रमांतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार भागवत पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी नरेश भोयर, प्रा.आशिष क्षीरसागर, आदर्श मुख्याध्यापक धनंजय पकडे, नंदकुमार कोरडे,वंदनाताई कोरडे,बार्टी समतादूत मोहन पांडे ,पोलीस उपनिरीक्षक पूनम कोरडे प्रामुख्याने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रतीक कोरडे म्हणाले, जीवनात आई वडील माझे रोल मॉडेल आहे.त्याच्या त्यागाने व प्रोत्साहनाने यश प्राप्त करता आले.20 लाख पॅकेजची नोकरी सोडून स्पर्धा परिक्षेकडे वळलो तेव्हा माझा परिवार खंबीरपणे माझ्या पाठीशी होता.आज समाजात मला व माझ्या आईवडिलांना समाजात जो मान सन्मान मिळत आहे व आनंद होत आहे.तो आनंद 20 लाखाच्या पॅकेजच्या नोकरीत कधीही झाला नसता.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना सातत्य ठेवा.ध्येयापासून परावृत्त करणाऱ्या बाबींना जीवनातून वजा करा.आपली क्षमता ओळखून अभ्यासाचे नियोजन करा तेव्हाच यश नक्की मिळेल असा हितोपदेश प्रतीक कोरडे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी, जि.प.उच्च प्राथमिक शाळा,थुंगाव (निपाणी) शाळेतील कु.आर्या राजकुमार डिग्रसकर (वर्ग 6 वा)हिने ओघवत्या व ओजस्वी शैलीत ‘करिअर’ या विषयावर मार्गदर्शन करून उत्कृष्ट बाल वक्त्याचा परिचय करून दिला.तिच्या भाषणाच्या वेळी सर्व विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते.
अभ्यास केंद्रातील ‘मुंबई पोलीस’ मध्ये निवड झालेले कु.स्वर्णा महादेव कोटजावळे व प्रितम रामचंद्र नाईक तसेच डॉ.आंबेडकर जयंती निमित्त बार्टी तर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील अनुक्रमे विजेते अक्षय कावटे, नोमादेवी खुरपडे, रोशन धोत्रे,शुभम शेंडे व विद्या ठाकरे यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी नरेश भोयर, संचालन तेजस्विनी गौरखेडे तर आभार प्रदर्शन केंद्रसमन्वयक एकनाथ खजुरीया यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शक कपिल आंबूडरे, संगणक परिचालक सतिश बागडे, परिचारिका अनुसया रेवतकर व सुरक्षा रक्षक प्रल्हाद पडोळे आदींनी सहकार्य केले.