ग्रामीण नागरिकांनी टेली-मानस हेल्पलाईनचा लाभ घ्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा
Summary
कोंढाळी -(नागपूर) दुर्गा प्रसाद पांडे प्रतिनिधी – नुकत्याच लागलेल्या दहावी बारावीच्या निकालात अपयश आलेल्या किंवा मनासारखा निकाल न लागल्यामुळे आलेल्या नैराश्याने अनेक विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलताना दिसतात तर कित्येकदा परिक्षेचा तणाव घेऊन नैराश्येकडे वळलेले अनेक विद्यार्थी आपल्याला दिसून येतात खरं […]
कोंढाळी -(नागपूर) दुर्गा प्रसाद पांडे प्रतिनिधी –
नुकत्याच लागलेल्या दहावी बारावीच्या निकालात अपयश आलेल्या किंवा मनासारखा निकाल न लागल्यामुळे आलेल्या नैराश्याने अनेक विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलताना दिसतात तर कित्येकदा परिक्षेचा तणाव घेऊन नैराश्येकडे वळलेले अनेक विद्यार्थी आपल्याला दिसून येतात खरं तर यावेळी पालक आणि त्यांचे पाल्य यांचे समूपदेशन होणे गरजेचे असते. या उदात्त हेतूने नागपूर जिल्हयातील ग्रामिण भागातील विद्यार्थी, पालक व नागरिकांसाठी मानसिक आरोग्य मदत व समुपदेशन करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने सातही दिवस चोवीस तास चालणाऱ्या टेली-मानस हेल्पपाइन टोल फ्रि क्रमांक 14416 ची सुरुवात या आधीच करण्यात आली होती. या हेल्पलाइनचा मोठया प्रमाणावर लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले आहे.
आरोग्य विभागाव्दारे सातही दिवस चोविस तास चालणा-या या टेली-मानस हेल्पपाइनचा ग्रामिण नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असून ग्रामीण नागरिक, पालक व विद्यार्थी यांनी मानसिक तणावात असल्यास आपल्या नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय येथे संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
मानसिक समुपदेशन करण्यासाठी शहरी भागात अनेक सोयी, हेल्पपाइन उपलब्ध आहेत. परंतू ग्रामिण भागात टेली- मानसच्या माध्यमातून ग्रामीण नागरिकांसाठी ही सेवा महत्वपूर्ण भूमिका बजावू शकणार आहे. परीक्षेच्या निकालामुळे तात्पुरती निराशा येवू शकते पण त्यामुळे आपल्या भविष्याबददल नाउमेद होणे योग्य नाही. शैक्षणिक आव्हानांना सामोरे गेलेल्या परंतू इतर क्षेत्रांमध्ये भरभराट झालेल्या कुशल व्यक्तीच्या कथा परिक्षेतील गुणांचा विसर पाडणाऱ्या आहेत. अल्बर्ट आइन्स्टाइन यांना त्यांच्या आयुष्यात सुरुवातीच्या काळात शैक्षणिक संघर्ष करावा लागला. त्यांची अभ्यासातील खराब कामगिरी त्यांना भैतिकशास्त्राची आवड जोपासण्यापासून परावृत्त करु शकली नाही आणि त्यांनी आपले सिद्धांत मांडून क्रांती केली. तर महानायक अमिताभ बच्चन यांनाही त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये नकाराचा सामना करावा लागला. शैक्षणिकदृष्टया सुमार असतांनाही त्यांनी चित्रपट विश्वावर आपले नाव कोरले. तणावरहीत होवून आपले सामान्य जीवन स्फुर्तीने जगण्यासाठी सातही दिवस चोवीस तास चालणाऱ्या टेली-मानस हेल्पपाइन टोल फ्रि क्रमांक 14416 चा लाभ घेऊन तणावरहीत होण्यासाठी ही हेल्पलाइन महत्वाची ठरणारी आहे.
******