काटोलच्या रोजगार मेळाव्याला विक्रमी यश तब्बल २०३७ युवकांना ‘ऑफर लेटर’ ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार रोजगार मिशन
Summary
काटोल प्रतिनिधी -दुर्गाप्रसाद पांडे ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार रोजगार मिशनअंतर्गत शुक्रवारी नबिरा महाविद्यालय, काटोल येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्याला विक्रमी यश लाभले असून, या मेळाव्यात २ हजार ३७ इतक्या विक्रमी संख्येने ‘ऑफर लेटर’ प्रदान करण्यात आले. डॉ. श्रीकांत जिचकार फाऊंडेशनच्यावतीने […]
काटोल प्रतिनिधी -दुर्गाप्रसाद पांडे
ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार रोजगार मिशनअंतर्गत शुक्रवारी नबिरा महाविद्यालय, काटोल येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्याला विक्रमी यश लाभले असून, या मेळाव्यात २ हजार ३७ इतक्या विक्रमी संख्येने ‘ऑफर लेटर’ प्रदान करण्यात आले.
डॉ. श्रीकांत जिचकार फाऊंडेशनच्यावतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे उद्घाटन ग्रामीण भागातील अश्विनी इरखेडे व आकांक्षा खडसे या दोन युवतींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. श्रीकांत जिचकार फाउंडेशनच्या अध्यक्ष राजश्री जिचकार, अॅड. याज्ञवल्क्य जिचकार व नबिरा कॉलेजचे प्राचार्य श्री नवीन यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपक्रमाच्या यशस्वितेबाबत माहिती देताना अॅड. याज्ञवल्क्य श्रीकांत जिचकार यांनी सांगितले की, या रोजगार मेळाव्यात काटोल-नरखेड-कोंढाळी परिसरातील तब्बल ६ हजार २०० तरूण-तरूणींनी नोंदणी केली होती. या उमेदवारांच्या दिवसभर मुलाखती झाल्या व सायंकाळी २ हजार ३७ जणांना ऑफर लेटर देण्यात आले. याशिवाय ९०३ जणांची मुलाखतीच्या दुसऱ्या फेरीसाठी निवड करण्यात आली. एकाच दिवशी २ हजार ९४० उमेदवारांना संधी देण्याची ही पहिलीच वेळ आहे, हे उल्लेखनीय.
या रोजगार मेळाव्यात महिंद्रा, जस्ट डायल, बायजूज, डीटीडीसी, अॅक्सिस बॅंक, टाटा बॅटरीज, बीव्हीजी, पिअॅजिओ, वेलस्पून, आदित्य बिर्ला कॅपिटल, एसबीआय लाईफ, एलजी, एपीएस ग्रुप, इक्विटास, एचडीएफसी लाईफ, एचसीएल कॉम्प्युटर्स, पेटीएम, बिग बास्केट, हॉस्पिकेअर, फिअॅट, इंडोरामा, बार्बेक्यू नेशन, सारख्या सुमारे ८५ प्रतिष्ठित व नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. डॉ. श्रीकांत जिचकार फाऊंडेशनने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यापूर्वी अॅड. याज्ञवल्क्य जिचकार यांनी काटोल-नरखेड-कोंढाळी भागातील सुमारे १५० गावांमध्ये शिबिरे आयोजित करून बेरोजगारांना मुलाखतींसंदर्भात मार्गदर्शन देखील केले होते.