BREAKING NEWS:
ब्लॉग

रयतेचा राजा राजर्षि शाहू

Summary

आपले राजेपण हे मिरविण्यासाठी नसून लोकांच्या सेवेसाठी आहे. राजेपद हे शाहू महाराजांच्या दृष्टीने नगण्य होते. मात्र लोकसेवेसाठी ते टिकविणे जरूरी होते. त्यातूनच राजर्षी शाहू महाराजांनी लोकसेवेचा नवा आदर्श निर्माण केला. अफाट कर्तृत्ववान असलेला हा राजा. ज्याच्या कार्यकर्तृत्वाला मर्यादा  नव्हत्याच. त्यांची […]

आपले राजेपण हे मिरविण्यासाठी नसून लोकांच्या सेवेसाठी आहे. राजेपद हे शाहू महाराजांच्या दृष्टीने नगण्य होते. मात्र लोकसेवेसाठी ते टिकविणे जरूरी होते. त्यातूनच राजर्षी शाहू महाराजांनी लोकसेवेचा नवा आदर्श निर्माण केला. अफाट कर्तृत्ववान असलेला हा राजा. ज्याच्या कार्यकर्तृत्वाला मर्यादा  नव्हत्याच. त्यांची कार्यशक्ती जबरदस्त होती. ध्येय दृष्टी निश्चित होती. सुक्ष्म निरीक्षण आणि दाट अवलोकन यांचे सुयोग्य मिश्रण होते, म्हणूनच ते लोकनेता होते.

२६ जून हा त्यांचा जन्मदिवस. पुरोगामी महाराष्ट्रात हा दिवस ‘सामाजिक न्याय दिन म्हणून मोठ्या गौरवाने साजरा केला जातो. राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वातील एक छोटीशी घटनाही त्यांच्या अफाट कार्याची महती सांगून जाते.

महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन महान व्यक्तींमुळे आपणास सामाजिक न्यायाचा पाठ अनुभवयास मिळतो. सामाजिक समतेची एक मोठी शिकवण यांनी आपणास दिली. यातील प्रत्येकाचे कार्य हे आभाळापेक्षाही मोठे आहे. असे म्हटले तर ते अतिशयोक्ती नसेल.

आपल्या जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी, उन्नतीसाठी जे-जे काही करता येईल त्या-त्या बाबींकडे अत्यंत जागरुकतेने लक्ष देऊन त्यांची पूर्तता करण्याचे काम राजर्षीनी केले. शिक्षण, सामाजिक समता, जाती निरपेक्षता यांच्याकडे पाहण्याची ज्यांची दृष्टी ही खूप वेगळी व तेजस्वी होती. शिक्षण, समाज, धर्म, हक्क, अर्थ अशा विविध घटकांचा विचार करून राजर्षी शाहू महाराज लोकसेवा करीत असत.

स्वयंप्रेरणेचा मंत्र

स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात जेव्हा आपण  ब्रिटीशांच्या गुलामगिरीत होतो. त्यावेळी ती नष्ट करण्यासाठी असलेल्या डोळस नेतृत्वाच्या गरजेबद्दल राजर्षी शाहू महाराजांचे सडेतोड आणि स्पष्ट विचार सर्व काही सांगून जातात. हिंदुस्थानातील जीवघेणी गुलामगिरी नष्ट करण्यासाठी तोंडाने बडबडणारे पुढारी आम्हास नको आहेत. कृतीने जातीभेद मोडून आम्हास मनुष्याप्रमाणे वागवतील “असे पुढारी पाहिजेत. अस्पृश्यांसाठी काय ? किंवा इतर कोणासाठी काय? कुठलीही विधायक गोष्ट घडवायची असेल तर कृतीशील मानवतावादी पुढारीच हवा आहे, असे ते म्हणत. कुणावरही न विसंबता स्वत:च स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा ‘स्वंयप्रेरणेचा मंत्र’ हा शाहू महाराजांच्या कार्याचा मूलमंत्र आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या भाषणांच्या टीकाटिप्पणीसह चिकित्सक अभ्यास असलेल्या क्रांतिसुक्ते: ‘राजर्षि छत्रपती शाहू’ या ग्रंथाच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष य. दि. फडके यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आधुनिक काळात महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या महान नेत्यांमध्ये कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकोणिसाव्या शतकात महात्मा  ज्योतिराव फुले यांनी स्वाभिमानाचे व समतेचे बी पेरुन जो वृक्ष लावला त्याला खतपाणी घालून काळजीपूर्वक वाढविले ते शाहू छत्रपतींनी. या वृक्षाला कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेधे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाच्या रुपाने पुढील काळात नवनवीन धुमारे फुटले. शेकडो वर्षे जे ज्ञान, सत्ता, संपत्ती यापासून वंचित राहिले त्यांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावे, शिकता यावे आणि विकासाच्या वाटा खुल्या व्हाव्यात असा शाहू छत्रपतींनी आयुष्यभर ध्यास घेतला होता. राजकीय स्वराज्य मिळविण्याचा प्रश्न त्यांना गौण वाटला. सामाजिक व धार्मिक समतेची प्रस्थापना करण्याच्या प्रश्नाला त्यांनी नेहमीच अग्रक्रम दिला.

लोकनेता  राजर्षी शाहू महाराज यांनी अनेक वेळा आपले विचार लोकांच्या समोर अत्यंत प्रखरतेने व प्रगटपणे मांडले. त्यांच्या प्रत्येक भाषणातून लोकांच्याप्रती, समाजाच्याप्रती असलेला त्यांचा आप्तपणाचा भाव स्पष्टपणे दिसून येतो. अशाच एका भाषणाच्या प्रसंगी ते म्हणतात, आपण मला आज आपला असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे शेवटपर्यंत प्रेम दृढ ठेवा, मी देखील कितीही अडचणी आल्या, कितीही त्रास झाला, तरी त्याला न जुमानता उन्नतीच्या महात्कार्यास शक्य तेवढा हातभार लावण्यास कधीही माघार घेणार नाही, असे आश्वासन देऊन मी आपले भाषण संपवितो.

राजर्षींच्या कार्याची आठवण आपणास सदैव असण्याकरीता त्यांच्या जन्मदिनी साजरा होणारा हा सामाजिक न्याय दिन आहे.

(संदर्भ- क्रांतिसुक्ते राजर्षि छत्रपती शाहू. संपादक : डॉ. एस. एस. भोसले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *