महाराष्ट्र मालेगाव हेडलाइन

शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्ध करतील शेतकरी उत्पादक कंपन्या : कृषीमंत्री दादाजी भुसे

Summary

मालेगांव, दि. 11 (उमाका वृत्त सेवा) : शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कथांचा अभ्यास मी अनुभवला आहे. शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यासाठी राज्यशासनाने शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यावर भर दिला असून याच माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल, असा विश्वास राज्याचे कृषी व […]

मालेगांव, दि. 11 (उमाका वृत्त सेवा) : शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कथांचा अभ्यास मी अनुभवला आहे. शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यासाठी राज्यशासनाने शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यावर भर दिला असून याच माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

शासकीय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात आयोजित आढावा सभेत कृषी मंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी रफीक नायकवडी, सुधाकर बोराळे, डॉ.प्रकाश पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, विभागीय अधिक्षक कृषी अधिकारी सुनिल वानखेडे, आत्माचे प्रकल्प संचालक रविंद्र निकम, बारीपाड्याचे सरपंच चैत्राम पवार, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वनाथ‍ शिंदे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, रामा मिस्तरी, प्रमोद निकम, निळकंठ निकम, तंत्रअधिकारी गोकुळ अहिरे, कृषी अधिकारी किरण शिंदे यांच्यासह पंचक्रोषीतील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ हा गट शेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांसह महिला शेतकऱ्यांना समोर ठेवून देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी पूर्व तयारी करत मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करुन कृषी योजनांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

मनरेगातंर्गत फळबाग लागवडीत राज्याने 38 हजार हेक्टरचा उच्चांक गाठला असून यामध्ये भविष्यात निश्चित वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, विकेल ते पिकेल ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची संकल्पना शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करित आहे. गतवर्षी 500 रोपवाटीकांचा लक्षांक पूर्ण करुन यंदा तो 1 हजाराचा देण्यात आल्यामुळे बळीराजाला यातून नक्कीच दिलासा मिळेल यात शंका नाही. द्रवरुपात उपलब्ध झालेला नॅनो युरियामुळे खतांचा अनावश्यक वापर टाळण्यास मदत होणार आहे. या द्रवरुपी युरियामुळे शेतकऱ्यांना चांगला पर्याय उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांचे अनुभव बोलके ठरतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. द्रवरुपी युरियाप्रमाणे डि.ए.पी. वर देखील कंपन्यांनी संशोधन करुन शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध करुन देण्याचे आवाहन करत प्रत्येक कंपनीने शेतकऱ्यांप्रती संवेदनशिलता दाखवून वाजवी दरात आपले तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिल्यास राज्य शासन त्यांना सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिले.

तालुक्याचे अर्थशास्त्र बदलविणारे पिक डाळींब

तालुक्याचे अर्थशास्त्र बदलविणारे डाळींब पिक असल्याचे सांगतांना विशेष कार्य अधिकारी श्री.नायकवडी म्हणाले, मनरेगातंर्गत फळपिक लागवडीत राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असतांना तालुक्यातून मिळणार अल्प प्रतिसाद आत्मचिंतन करणारा आहे. तालुक्यातील जवळपास 84 हजार कुटूंब मनरेगातंर्गत फळबाग लागवडीसाठी पात्र असतांना कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करुन त्यांना प्रवाहात आणण्याचे काम करावे. पिक स्पर्धेचे निकष शिथील करण्यात आले असून खरीप हंगामातील 11 पिकांचा पिकस्पर्धेत समावेश करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यभरात सुमारे 15 हजार शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले असून, ठिबक सिंचन योजनेतही चांगले काम झाले आहे.

शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्याचे काम करेल कृषी विज्ञान संकुल

एकाच छताखाली पाच कृषी महाविद्यालये हे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील काष्टी परिसरातील 250 हेक्टर क्षेत्रावर साकारण्यात येत असल्याची माहिती देतांना डॉ.प्रकाश पवार म्हणाले, हे कृषी विज्ञान संकुलामार्फत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचवून दिलासा देण्याचे काम करतील. प्रत्येक शेतकऱ्यांची डिबीटी पोर्टलवर नोंदणी गरजेची असून याकरिता केवळ आधार कार्ड व आधारलिंक मोबाईलची आवश्यकता आहे. यापुढे केवळ एक पानी अर्जाद्वारे कृषी विभागाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असून प्रत्येक शेतकऱ्याने डिबीटी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहनही डॉ.पवार यांनी यावेळी केले.

जल जंगल व जमिनीचे संवर्धन ही काळाजी गरज

सेंद्रीय शेतीला चालना देतांना जल, जंगल व जमिनीचे संवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत बारीपाड्याचे सरपंच चैत्राम पवार यांनी व्यक्त केले. वन, कृषी व आदिवासी विकास विभागाच्या समन्वयाने ग्रामीण भागातील विकास सहज शक्य आहे. वन धन विकास कार्यक्रमात वनभाज्यांचे सोलर ड्रायरच्या माध्यमातून संवर्धन करुन त्याचा संपूर्ण राज्यभरात पुरवठा करता येईल. सामुहिक जलव्यवस्थापन, सामुदायिक शेती व सोलरवर आधारित शितगृहे उभारल्यास शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल असेही श्री.पवार यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी उपस्थित असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सदस्यांना प्रातिनीधीक स्वरूपात खते व बियाणे विक्री परवाने राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. तर पाच शेतकरी उत्पादक कंपन्यांना इफको कंपनीच्या वतीने नॅनो युरियाचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *