विद्यार्थ्यांनो! सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा एप्रिल पासून सुरुवात
Summary
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह अन्य विद्यापीठांनी विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, कोरोनाचा जोर वाढू लागल्याने विद्यापीठांनी त्यांचे नियोजन बदलत आता पुन्हा एकदा ऑनलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा एप्रिलमध्ये, तर द्वितीय व […]

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह अन्य विद्यापीठांनी विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, कोरोनाचा जोर वाढू लागल्याने विद्यापीठांनी त्यांचे नियोजन बदलत आता पुन्हा एकदा ऑनलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे.
प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा एप्रिलमध्ये, तर द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा मे महिन्यात घेतली जाणार असल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक श्रेणीक शहा यांनी दिली आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा घेत असताना कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रत्यक्षात परीक्षा घ्यायच्या कशा याची चिंता प्रशासनाला लागून राहिली आहे.
जानेवारीत पार पडलेल्या द्वितीय व अंतिम वर्षाची प्रात्यक्षिक परीक्षा विद्यार्थ्यांना टप्प्याटप्याने महाविद्यालयांमध्ये बोलावून 2 मार्चपर्यंत घ्यावी, असे पत्र विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना पाठविले आहे.
सोलापूर विद्यापीठांतर्गत 101 महाविद्यालये असून द्वितीय व अंतिम वर्षासाठी सुमारे 68 हजार विद्यार्थी आहेत.या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा सध्या सुरू असून 2 मार्चपर्यंत सर्व महाविद्यालयांनी अंतर्गत गुण विद्यापीठाला कळवावेत, अशा सूचनाही केल्या आहेत.
बी.ए.च्या विद्यार्थ्यांचे 27 विषय असून एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांचे 21 विषय आहेत. त्यामुळे यांची परीक्षा 15 दिवस चालणार आहे. मार्चअखेर अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून परीक्षेला सुरुवात होणार आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईनच घेतली जाणार असून कोरोनाची परिस्थिती सुधारल्यास ऑफलाईनचा विचार केला जाईल, असेही विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ऑनलाईन परीक्षेसाठी साधारणपणे 15 दिवसांचा कालावधी पुरेसा ठरेल, असेही विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक श्रेणीक शहा यांनी सांगितले.
प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र 2 ते 17 एप्रिलदरम्यान होणार आहे. द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे द्वितीय सत्र मे महिन्यात होणार आहे.
प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे द्वितीय सत्र जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. विद्यापीठातील 101 महाविद्यालयांतील जवळपास 95 हजार विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेचे नियोजन करण्यात येत आहे
सचिन सावंत
मंगळवेढा
(पश्चिम महाराष्ट्र)
9370342750