BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

लोकसभा निवडणुकीसाठी २० मे रोजी होणाऱ्या मतदानाकरिता मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव

Summary

मुंबई शहर जिल्ह्यात २४ लाख ९० हजार २३८ मतदार २ हजार ५२० मतदान केंद्रे मुंबई, दि. १६ :- मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवार, २० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत […]

मुंबई शहर जिल्ह्यात २४ लाख ९० हजार २३८ मतदार

२ हजार ५२० मतदान केंद्रे

मुंबई, दि. १६ :- मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवार, २० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज आहे. लोकशाहीच्या या उत्सवात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा, असे आवाहन मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज आयोजीत पत्रकार परिषदेत श्री. यादव बोलत होते.

श्री. यादव पुढे म्हणाले की, ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर ‘३१- मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदार संघात १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यात ३०-मुंबई दक्षिण मध्य, ३१-मुंबई दक्षिण हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात एकूण २४ लाख ९० हजार २३८  मतदार असून २ हजार ५२० मतदान केंद्रे आहेत. जिल्ह्यात सोमवार २० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मंगळवारी ४ जून  रोजी मतमोजणी होणार आहे.

मतदान केंद्रांवर सुविधा उपलब्ध

मुंबई शहर जिल्ह्यात २५२० मतदान केंद्रे आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी प्रशासनातर्फे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. किमान सुविधेची खात्री (Assured Minimum Facilities) अंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मंडप, प्रसाधन गृह, दिव्यांग मतदारांसाठी मार्गिका (Ramps), स्वयंसेवक, व्हीलचेअर्स व विद्युत पुरवठा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदार माहिती स्लिपचे वाटप सर्व नोंदणीकृत मतदारांना करण्यात आले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात मतदानासाठी १५ हजार कर्मचारी

लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्याअंतर्गत असलेल्या ‘३०-मुंबई दक्षिण मध्य’, ‘३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघातील २० मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी सुमारे १५ हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतदान पारदर्शक, नि:पक्षपाती व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती यावेळी श्री. यादव यांनी दिली.

मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांची माहिती

एकूण मतदार :- २४ लाख ९० हजार २३८

एकूण पुरुष मतदार :- १३ लाख ४३ हजार ९६९

एकूण स्त्री मतदार :- ११ लाख ४६ हजार ०४५

एकूण तृतीयपंथी मतदार :- २२४

ज्येष्ठ नागरिक मतदार (८५ +)

एकूण:- ५५ हजार ८१७

एकूण पुरूष :- २६ हजार ८१५

एकूण स्त्री :- २९ हजार ००१

१८ ते १९ या वयोगटातील नवमतदार

एकूण मतदारः- २६ हजार ४५०

एकूण पुरुषः १४ हजार ७१७

एकूण स्त्री:- ११ हजार ७३३

दिव्यांग मतदार

एकूण मतदार :- ५५४९

एकूण पुरुष:- ३३२२

एकूण स्त्रीः- २२२७

मतदान केंद्रांची माहिती

एकूण मतदान केंद्रः- २ हजार ५२०

एकूण सहाय्यकारी मतदान केंद्र:- ०८

एकूण सखी महिला मतदान केंद्रः- ११

नवयुवकांसाठी मतदान केंद्रः- ११

दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्र :- ०८

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदानाच्या दिवशी सुविधा

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक (८५ वर्ष व त्यापेक्षा अधिक) मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाण्याकरिता सक्षम ॲपवर नोंदणी केलेल्या मतदारांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेला दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या ॲपवर नोंदणीकृत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांना संबंधित सुविधा पुरविणा-या शासकीय व स्थान निश्चिती यंत्रणेला दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या मागणीनुसार आवश्यक मदत म्हणजेच गरजेनुसार वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहाय्यक पोहोचविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. सक्षम मोबाईल ॲपवर नोंदणी न करू शकलेल्या काही दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची मागणी नोंदविण्यात येत असल्याचे श्री. यादव यांनी सांगितले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे ज्येष्ठ नागरिक मतदार व दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा पर्याय देण्यात आला आहे. ’३०–मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत सुमारे ३१० ज्येष्ठ नागरिक मतदार व ९ दिव्यांग मतदारांनी तर ’३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघात ५८४ ज्येष्ठ नागरिक मतदार व ४८ दिव्यांग मतदारांनी गृहमतदान केले आहे.

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई

मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई असणार आहे. मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या प्रत्येक निर्देशाची अंमलबजावणी कसोशीने होईल याकडे मुंबई शहर जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेचा कटाक्ष आहे. मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करण्यासाठी, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव असणार आहे.

मतदार यादीत नाव तपासून घ्या

मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन श्री. यादव यांनी केले. मुंबई शहर जिल्हा प्रशासनातर्फे क्यूआर कोड ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आले असून त्या माध्यमातूनही नागरिकांना मतदार यादीत आपले नाव तपासता येणार आहे, असे श्री. यादव यांनी सांगितले.

****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *