रोजगारनिर्मितीसह विदर्भाच्या विकासावर भर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील जपानस्थित होरिबा कंपनीच्या सुविधा केंद्राच्या कोनशीलेचे अनावरण
Summary
▪नागपूर औद्योगिक क्षेत्राच्या गौरवात भर नागपूर, दि. ६ : विदर्भात अधिकाधिक रोजगारनिर्मिती होण्याच्या दृष्टीने सर्व सुविधांनी परिपूर्ण औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यावर आपण पूर्वी भर दिला. इथे आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योग समूह आता नागपूरकडे आकर्षित होत असून विविध देशात कार्यरत असलेल्या जपान येथील होरिबा […]
▪नागपूर औद्योगिक क्षेत्राच्या गौरवात भर
नागपूर, दि. ६ : विदर्भात अधिकाधिक रोजगारनिर्मिती होण्याच्या दृष्टीने सर्व सुविधांनी परिपूर्ण औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यावर आपण पूर्वी भर दिला. इथे आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योग समूह आता नागपूरकडे आकर्षित होत असून विविध देशात कार्यरत असलेल्या जपान येथील होरिबा कंपनीच्या या नवीन अत्याधुनिक प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूरच्या औद्योगिक क्षेत्राला नवी ओळख मिळाली असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या जपानस्थित होरिबा या कंपनीच्या सुविधा केंद्राच्या कोनशीलेचे अनावरण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. बुटीबोरी येथील कंपनीच्या परिसरात आयोजित केलेल्या या समारंभात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कंपनीचे अध्यक्ष आत्सूशी होरिबा, होरिबा इंडियाचे अध्यक्ष डॉ. जय हाकू, कॅार्पोरट ऑफिसर डॉ. राजीव गौतम, माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेल्या या प्रकल्पामुळे भारतातील सुमारे ३० हजार डायग्नॉस्टिक लॅब यांना अत्यावश्यक महत्त्वाची उपकरणे पुरवली जाणार आहेत. तपासणी प्रयोगशाळेसाठी लागणारे सोल्यूशन्स व इलेक्ट्रॉनिक चिप्सवर होरीबा कंपनीचे कार्य असून वैद्यकीय क्षेत्रासाठी ही निर्मिती महत्वाची आहे. सुमारे १२ एकर जागेवर उभारलेल्या या कंपनीचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी माझ्या हस्ते करण्यात आले होते. अत्यंत युद्धपातळीवर हे काम कंपनीने पूर्ण केल्याबद्दल आनंद झाल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
नागपूर हे आता केवळ आकर्षक महानगरच नव्हे तर पायाभूत सुविधांनी परिपूर्ण असलेले महानगर झाले आहे. कंपनीच्या भविष्यात लागणाऱ्या प्रकल्पांना जी जागा व पायाभूत सुविधा लागेल ती उपलब्ध करुन देऊ असे त्यांनी स्पष्ट केले.
जगातील मेडिकल टुरिझम हबमध्ये भारताने अल्पावधीत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आजच्या तुलनेत आपण जगात दहाव्या स्थानी आहोत. इथल्या वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक पातळीवरील सुविधा व तज्ज्ञ वैद्यकीय सेवांच्या माध्यमातून आपण जगाला वेगळी ओळख देऊ. याचबरोबर भारत आता सेमी कंडक्टरचा हब ठरला आहे.
होरीबा कंपनीने इथे सेमिकंडक्टर प्रकल्पाबाबत विचार करावा. अशा नवीन प्रकल्पांना सहकार्यासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. होरीबाचे नागपूर येथील सुविधा केंद्र हे आदर्शाचा मापदंड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागपुरातील उद्योग वसाहतींमध्ये विविध औद्योगिक कंपन्या आल्यास स्थानिक रोजगारास चालना मिळेल. विदर्भाची सामाजिक आणि आर्थिक प्रगती व्हावी हा प्रयत्न असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले. आत्मनिर्भर भारत ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरेल आहे. भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था व्हावी यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण राहिले आहे. यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल. औद्योगिक वसाहतींचा विकास व्हावा यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.