राजु यादव हत्याकांड प्रकरण राजू यादव यांच्या दोन मारेकऱ्यांना अटक सायंकाळी रामतीर्थ येथे अंत्यसंस्कार वाचा सविस्तर वृत्त….
राजुरा – राजुरा येथे दिनांक 31 जानेवारीला सायंकाळी नाका क्रमांक तीन जवळील सलून मधे राजू यादव या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला चार गोळ्या घालून जागेवरच ठार केल्याची घटना घडली होती. घटनास्थळा वरुन बंदुकीच्या गोळ्यांचे चार खाली राऊंड जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी राजुरा पोलिसांनी घटनेच्या चार तासात कापनगाव जवळ दोन्ही आरोपींना शस्त्रासह अटक केली.
राजू यादव यांची हत्या झाल्यानंतर हे दोघेही याच परिसरातील असल्याने त्यांची पोलिसांना लवकर ओळख पटली आणि पोलिसांनी तातडीने कापनगाव कडे जाणार्या रस्त्यावर आरोपी चंदन शीतलाप्रसाद सिंग वय 30 राहणार जवाहरनगर, राजुरा आणि सत्येद्रकुमार परमहंस सिंग वय 28 राहणार हनुमाननगर, रामपूर या दोघांना अटक केली. त्यांचे जवळून बंदूक जप्त करण्यात आली आहे.
राजू रामचंद्र यादव हे 31 जानेवारीला सायंकाळी सहा वाजता राजुरा येथील नाका क्रमांक तीन जवळील मयूर सलून मध्ये आले होते. ते सलून मध्ये बसुन असतानाच आरोपींनी गोळ्या झाडल्या. त्यात यादव जागीच ठार झाले. मात्र शेजारचे लोक मागे धावल्याने आरोपींनी त्यांची हीरो गाडी क्रमांक एम एच 34 / 2425 ही सोडून दिली आणि ते रामपूर कडे पळून गेले. या दोघांनाही अनेक लोकांनी पाहिल्याने त्याची माहिती पोलिसांना त्वरित कळली. त्यामुळे पोलिसांनी तातडीने शोध घेऊन कापनगाव रस्त्यावरुन जाणार्या दोन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी या दोघांकडून एक देशी बनावटीची बंदूक जप्त केली. आरोपींची दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे.
राजू यादव यांना ठार मारणारे आरोपी चंदन सिंग हा ट्रक व्यवसायीक असून राजुरा शहरातील जवाहरनगर येथे रहात होता. दुसरा आरोपी शितल सिंग हा रामपूर येथे राहणारा असून हे दोघेही मित्र होते. मृतक यादव आणि दोन्ही आरोपी हे उत्तर प्रदेशातील आहेत. या दोघांचेही देण्याघेण्या वरुन राजू यादव यांचेही वाद झाले होते. शेवटी याचे पर्यवसान खुनी हल्ल्यात झाले. दोन्ही आरोपींविरुद्ध भा.दं.वी.कलम 302, 34 आर्म्स एक्ट 7/27 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमदर्शनी तपासात कोळशाच्या व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याचे ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे यांनी सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी रामसिंग पवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार चंद्रशेखर बहादूरे, पोलिस उपनिरीक्षक चेतन टेंभुर्णे, प्रशांत साखरे, पोलिस जमादार श्रीकांत चन्ने, हवालदार संपत पुलीपाका हे पुढील तपास करीत आहेत.
मृतक राजू यादव यांचे मागे पत्नी, तीन लहान मुली व एक मुलगा आहे. राजुरा, रामपूर, सास्ती भागात आज तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी आरोपींच्या घराजवळ कडक पोलीस बंदोबस्त ठेवला. यासाठी या भागात चंद्रपूर येथून दंगा नियंत्रण पथक, सी 60 चे जवान आणि जादा कुमक बोलविली होती. सध्या तरी येथे तणावपूर्ण शांतता आहे.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर