पर्यावरण महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

येत्या काळात मुंबई प्रदूषण, खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मरीन ड्राईव्ह येथे सुशोभीकरण प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Summary

मुंबई, दि. २१ : मुंबईमध्ये कोस्टल रोड, मेट्रोची पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. उन्हाळ्यामध्ये प्रदूषणात वाढ होत असल्याने यावेळी संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविली. यामुळे मुंबई शहर प्रदूषणमुक्त होवू लागले आहे. येत्या दोन वर्षात मुंबईचा चेहरा बदलण्यासाठी सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात […]

मुंबई, दि. २१ : मुंबईमध्ये कोस्टल रोड, मेट्रोची पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. उन्हाळ्यामध्ये प्रदूषणात वाढ होत असल्याने यावेळी संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविली. यामुळे मुंबई शहर प्रदूषणमुक्त होवू लागले आहे. येत्या दोन वर्षात मुंबईचा चेहरा बदलण्यासाठी सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात येणार आहेत. मेट्रो आणि कोस्टल रोडमुळे मुंबईतील प्रदूषण, खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करण्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

पद्मश्री नाना चुडासामा यांच्या स्मरणार्थ मुंबई महापालिका आणि आय लव्ह मुंबई यांच्यातर्फे मरीन ड्राईव्ह येथे आयोजित सुशोभीकरण प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, माजी मुख्य न्यायाधीश मोहित शांतीलाल शाह, शायना एनसी, जॅकी श्रॉफ आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते फीत कापून वारली पेंटिंग, योग मुद्राचे उद्घाटन करण्यात आले, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह त्यांनी पाहणी केली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन म्हणाले, मरीन ड्राईव्ह येथे सुंदर सुशोभीकरण केले आहे. नाना चुडासामा यांचे सामाजिक काम महत्त्वपूर्ण असून मुंबईत विविध सुशोभीकरणासाठी त्यांनी हातभार लावला आहे. नाना चुडासामा यांचे काम शायना एनसी पुढे चालवित आहेत. शासन आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मुंबई स्वच्छ, सुंदर आणि हरित बनविण्यात येणार आहे. सर्व रस्ते सिमेंटचे करणार असल्याने खड्डेमुक्त शहर होण्यास मदत होईल. जुलैपर्यंत सी लिंकपर्यंत संपूर्ण काम होईल, कोस्टल रोड, मेट्रो यामुळे नागरिकांना वाहतूक समस्येतून  दिलासा मिळाला आहे. शायना एनसीमुळे भायखळा स्टेशनला युनेस्कोचा पुरस्कार मिळाल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला.

योगाचे महत्त्व अधोरेखित करणारे योगाचे पोस्टर्स आकर्षक असल्याचाही उल्लेख यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केला.

रोज योग करा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योगाला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यातूनच 21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ जगभरात साजरा केला जात आहे. योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक मानून रोज योग करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *