मुंबई- नाशिक सहापदारी महामार्गासाठी ५ हजार कोटी रुपये खर्च करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे छगन भुजबळ यांच्या मागणीवर आश्वासन सारडा सर्कल ते नाशिकरोड त्रिस्तरीय उड्डाणपूलाचा नागपूरच्या धर्तीवर होणार विकास
नाशिक, दि. ४ ऑक्टोबर :- मुंबई- नाशिक सहापदारी महामार्गास बरोबरच भारतमाला प्रोजेक्ट मध्ये समाविष्ट झालेल्या नाशिक शहरातील सारडा सर्कल ते नाशिक रोड उड्डाणपूल नागपूरच्या धर्तीवर थ्रि टायर स्वरूपात विकसित करण्यात येईल. त्याचे पुढील सहा महिन्यात भूमिपूजन देखील करण्यात येईल आश्वासन केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीला उत्तर देतांना आपल्या भाषणात दिले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नाशिक शहरातील गोविंद नगर मनोहर गार्डन येथे विविध रस्त्यांचे लोकार्पण व भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नितीन गडकरी यांच्याकडे आपल्या मनोगतात मुंबई- नाशिक सहापदारी महामार्ग आणि सारडा सर्कल ते नाशिक रोड त्रिस्तरीय उड्डाणपूलाची मागणी केली. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मकता दाखवीत तातडीने या दोनही रस्त्याच्या व उड्डाणपुलाच्या कामांना मंजुरी दिली. त्याचबरोबर नाशिक मुंबई महामार्गासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या त्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि तातडीने हा रोड दुरूस्त करण्याची मागणी केली होती. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक महिन्यात या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मार्गी लावण्यात येईल अशी माहिती दिली आहे.
कल्पकता आणि धाडस याचे दुसरे नाव म्हणजे नितीन गडकरी अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करत आज आपण मांडलेल्या मागण्या ते नक्कीच पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, मुंबई-आग्रा हा एन-एच-३ हायवे सद्यस्थितीत चार पदरी आहे. औद्योगिक क्षेत्रातील नाशिकची होणारी प्रगती व पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकला येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. इंडियन रोड कॉंग्रेस(IRC) च्या नियमानुसार प्रतिदिन पॅसेंजर कार युनिट्स ४० हजारांच्या वर गेल्यास रस्त्यांचे रुंदीकरण ४ पदरी वरून ६ पदरी करणे अनिवार्य आहे. सद्यस्थितीत मुंबई-आग्रा हायवेवर पॅसेंजर कार युनिट्स ५५ हजारांच्यावर आहे. हा रस्ता चार पदरी करतांना सहा पदरी करण्यासाठी आवश्यक असलेली जमीन याअगोदरच राष्ट्रीय महामार्ग ने भूसंपादित केलेली असून विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्ग सहपदारी करण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
ते पुढे म्हणाले की, भारतमाला योजनेअंतर्गत नाशिक शहरातील सारडा सर्कल- द्वारका ते नाशिक रोड हा ५.९ किमी चा उड्डाणपूल करणे आपल्या विभागाने प्रस्तावित केल्यामुळे नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपले मन:पूर्वक आभार मानले. यावेळी म्हणाले की, हा उड्डाणपूल तयार करण्यासाठीची प्रक्रिया जलद गतीने सुरु करावी. नाशिक शहरासाठी याच ठिकाणी महामेट्रोने इलेक्ट्रीक कोरीडॉर देखील प्रस्तावित केला आहे. द्वारका सर्कल येथे पुणे-नाशिक तसेच आग्रा/धुळे- मुंबई कडे जाणारी सर्व वाहतूक होत असते. अवजड व प्रवासी वाहनेदेखील याच मार्गाने प्रवास करत असतात. सदर वाहतुकीमुळे द्वारका सर्कल येथे बऱ्याच वेळेस वाहतुकीची वर्दळ होत असून जीवघेणे गंभीर अपघात होत असतात. त्यामुळे ५.९ किमीचा हा उड्डाणपूल नागपूर शहरातील त्रिस्तरीय उड्डाणपुलाच्या धर्तीवर केला गेल्यास वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटू शकेल अशी मागणी त्यांनी केली.
त्यानंतर आपल्या मनोगतात मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई- नाशिक सहापदारी महामार्गास बरोबरच भारतमाला प्रोजेक्ट मध्ये समाविष्ट झालेल्या नाशिक शहरातील सारडा सर्कल ते नाशिकरोड उड्डाणपूल नागपूरच्या धर्तीवर थ्रि टायर स्वरूपात विकसित करण्यात येईल. त्याचे पुढील सहा महिन्यात भूमिपूजन देखील करण्यात येईल आश्वासन केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना दिले. तसेच नाशिकच्या विकासासाठी आपण विविध योजना आखाव्यात केंद्र स्थरावर आपण त्यास मंजुरी देऊ असे सांगत दमणगंगा पिंजाळसह महत्वाच्या प्रकल्पात आपण पुढाकार घ्यावा केंद्र स्तरावर आपल्याला सर्व मदत दिली जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.