मुंबईतील वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २७ जुलै रोजी शुभारंभ – गृहनिर्माणमंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड
Summary
ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती बीडीडी चाळ वासियांची स्वमालकीच्या गृह स्वप्नपूर्तीकडे वाटचाल १९५ चाळींचा होणार पुनर्विकास मुंबई दि. २३ : मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ […]
ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती
बीडीडी चाळ वासियांची स्वमालकीच्या गृह स्वप्नपूर्तीकडे वाटचाल
१९५ चाळींचा होणार पुनर्विकास
मुंबई दि. २३ : मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि.२७ जुलै रोजी होणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी.पाटील, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ सभापती विनोद घोसाळकर, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळचे सभापती विजय नाहटा, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी अनिल डोंगरे आदि मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
दक्षिण आशियातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प
दक्षिण आशियाई देशांमधील हा सर्वात मोठा नागरी पुनर्विकास प्रकल्प आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड यांनी दिली.वरळी, ना.म.जोशी मार्ग -परळ व नायगांव येथील शासनाच्या ३४.०५ हेक्टर जागेवर १९५ चाळी आहेत. प्रत्येक चाळ ही तळ+3 मजल्यांची असून त्यात प्रत्येकी ८० रहिवासी गाळे आहेत. सदरहू चाळींचा पुनर्विकास करुन सदरहू चाळीतील निवासी पात्र गाळेधारकांना ५०० चौरस फुट चटई क्षेत्रफळाची सदनिका विनामूल्य व मालकीहक्काने देण्यासाठीचा तसेच सदरहू ठिकाणच्या झोपडीधारकांना महाराष्ट्र झोपडपट्टी निर्मुलन अधिनियमातील तरतुदीनुसार पात्र झोपडपट्टी धारकांप्रमाणे २६९ चौरस फुट क्षेत्रफळाची सदनिका देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. बी. डी. डी. चाळींचा पुनर्विकास योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या जमिनीवर या योजनेद्वारे १५ हजार ५९३ पुनर्वसन गाळ्यांव्यतिरिक्त सुमारे ८ हजार १२० विक्रीयोग्य गाळे बांधण्यात येणार आहेत.
राज्य शासनाच्या जागेवर १५,५९३ गाळे, स्टॉल्स व अधिकृत झोपड्या आहेत. बीडीडी चाळींचा विकास नियंत्रण नियमावली ३३(९) ब) च्या अंतर्गत करण्यात येणार आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाने म्हाडाची सुकाणू अभिकरण म्हणून नियुक्ती केली आहे.बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प योग्य रितीने राबविण्यासाठी म्हाडास मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्तीप्रदत्त समिती गठीत करण्यात आली आहे.बीडीडी चाळीतील पात्र रहिवाशांना ५०० चौरस फुट चटई क्षेत्रफळाची आकाराची घरे वितरीत करण्यात येतील. पुनर्विकास प्रकल्प टप्याटप्याने राबविण्यात येणार असून, काही रहिवाश्यांना प्रकल्प जागेजवळ असलेल्या संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्याचे प्रस्तावित आहे. नायगांव व ना. म. जोशी मार्ग येथील पुनविकास प्रकल्प येत्या ७ वर्षात तर वरळी येथील प्रकल्प येत्या ८ वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहितीही मंत्री डॉ.आव्हाड यांनी दिली.
प्रस्तावित प्रकल्पाचा तपशिल
नायगाव योजनेत चाळीतील पुनर्वसन गाळयांची संख्या ३ हजार ३४४ (निवासी ३२८९+ अनिवासी ५५) असून पुनर्वसन इमारत २२ मजल्यापर्यंत व विक्रीयोग्य इमारत ६० मजल्यापर्यंत प्रस्तावित आहे.ना. म. जोशी मार्ग योजनेत चाळीतील पुनर्वसन गाळ्यांची संख्या २ हजार ५६० (निवासी २५३६+ अनिवासी २४) असून पुनर्वसन इमारत २२ मजल्यापर्यंत व विक्रीयोग्य इमारत ४० मजल्यापर्यंत प्रस्तावित आहे. वरळी योजनेत चाळीतील पुनर्वसन गाळ्यांची संख्या ९ हजार ६८९ (निवासी ९३९४+ अनिवासी २९५) असून पुनर्वसन इमारत ४० मजल्यापर्यंत व विक्रीयोग्य इमारत ६६ मजल्यापर्यंत प्रस्तावित आहे. अशा प्रकारे तीनही योजनेत मिळून १५ हजार ५९३ पुनर्वसन गाळे (निवासी व अनिवासी) निर्माण करण्यात येणार आहेत. तीनही बीडीडी चाळींच्या प्रकल्प जागेवर भाडेकरूंना पुनर्वसन सदनिका व अंतर्गत सोई सुविधा कशा असतील याची माहिती मिळण्यासाठी नमूना सदनिका (Sample Flat) बांधण्यात आले आहेत.
इतिहास :
साधारणतः १९२० च्या दरम्यान ब्रिटिशांनी या बीडीडी चाळीच्या इमारती बांधल्या. म्हणजे सुमारे १२२ वर्षांचा इतिहास या चाळींचा आहे. दुसऱ्या महायुद्धातील कैद्यांना ठेवण्यासाठी या चाळी वापरण्यात आल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर जेव्हा लोकल रेल्वे सुरु झाली, त्यानंतर या भागाकडे लोकांचे येणे जाणे वाढले, स्थलांतर झाले. त्यामुळे जागेची अधिक आवश्यकता भासू लागली. या पार्श्वभूमीवर सर जॉर्ज लॉईड यांनी गृहनिर्मिती व विकासाची मोठी योजना तयार केली आणि या योजनेची अंमलबजावणी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच बीडीडी च्या माध्यमातून करण्यात आली. मुंबई राज्याच्या तत्कालीन समाजव्यवस्थेत कामगार वर्गाचे आश्रयस्थान अशी बीडीडी चाळींची त्याकाळी ओळख होती. वरळी येथील बीडीडी चाळीत असलेले जांभोरी मैदान आजही अनेक ऐतिहासिक गोष्टींची साक्ष देते. याच मैदानावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सभा झाली होती. कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांच्या कामगार चळवळीचे प्रमुख केंद्र या भागात होते. या चाळींमध्ये अनेक सभा-संमेलने गाजली. अनेक स्वातंत्र्यसैनिक या चाळीतून जन्माला आले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बीडीडी आणि बीआयटी चाळीतील अनेक लोकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. बीडीडी चाळीला सांस्कृतिक इतिहासही असाच गौरवपूर्ण आहे, अशी माहितीही गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड यांनी दिली.