‘भारत माझं दुसरं घर’; ऑक्सिजन खरेदीसाठी ब्रेट ली कडून भारताला ४३ लाखांची मदत !
दिल्ली : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. देशात आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असून मागील लाटेपेक्षा यंदा स्थिती गंभीर झाली आहे. ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे.
कोरोनाच्या लाटेचा फटका क्रिकेटविश्वाला देखील बसला असून सध्या सुरु असणाऱ्या आयपीएलमधून काही खेळाडूंनी माघार देखील घ्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू पॅट कमिन्स याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा निवृत्त गोलंदाज ब्रेट ली यानं कोरोना संकटाशी दोन हात करणाऱ्या भारताला मदत केली आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर एक भावून पोस्ट शेअर केली आहे. त्याने एक बिटकॉइन म्हणजेच सुमारे ४३ लाख रुपयांची मदत ब्रेट ली यांनी केली आहे.
या पोस्ट मध्ये ब्रेट ली म्हणतो, ‘भारत हे माझं दुसरं घरच आहे. माझ्या क्रिकेट कारकिर्दीत आणि निवृत्तीनंतर येथील लोकांकडून मिळालेल्या प्रेमाचं माझ्या हृदयात वेगळं स्थान आहे. या संकटकाळात लोकांना मरताना पाहून मनाला वेदना होत आहेत. त्यांच्या मदतीसाठी मला थोडासा हातभार लावण्याची संधी मिळतेय, हे मी माझं भाग्य समजतो. मी एक बिटकॉईन दान करत आहे आणि त्यांच्या माध्यमातून भारतातील विविध हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल.’
‘या संकटाशी सर्वांना एकत्र येऊन मुकाबला करण्याची वेळ आहे आणि आपल्याकडून जेवढी शक्य आहे तेवढी मदत करणेही गरजेचे आहे. वेळ काळ न पाहता दिवसरात्र या संकटाशी सामना करणाऱ्या प्रत्येक फ्रंटलाईन वर्करचे मी आभार मानतो. मी लोकांना विनंती करतो की घरीच राहा, सुरक्षित राहा आणि वारंवार हात धुवा. गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा अन् मास्क घाला. पॅट कमिन्सचेही कौतुक !,’ असं ब्रेट ली म्हणाला आहे.
प्रवीण मेश्राम
उत्तर नागपुर प्रतिनिधी