महाराष्ट्र हेडलाइन

भारताची आरोग्यसेवा धोक्यात..? 🔹मुलभूत सुविधांचा अभाव 🔹6000 सेंटर मध्ये महिला आरोग्य सेविका नाहीत.? 🔹भारताचा सार्वजनिक आरोग्यवर खर्च करण्यात 171 वा. क्रमांक 🔹राज्यातील आणि केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सारीच विकुन खाल्ली का❓ शेकाप चे राहुल पोकळे यांनी व्यक्त केले स्पष्ट आणि बिनधास्तपणे विचार.

Summary

मुंबई प्रतिनिधी:- कोरोनाने माजवलेल्या हाहाकारामुळे आज आपली आरोग्य व्यवस्था पूर्णतः नागडी झाली असल्याचे प्रकर्षाने जाणवले आहे,मग प्रश्न उरतो इतक्या वर्ष जे जे सत्तेवर आले त्यांनी काय केले? आणि आम्ही त्यांना याबाबत जाब का विचारला नाही? भारतात आरोग्याची परिस्थिती अतिशय दारुण […]

मुंबई प्रतिनिधी:- कोरोनाने माजवलेल्या हाहाकारामुळे आज आपली आरोग्य व्यवस्था पूर्णतः नागडी झाली असल्याचे प्रकर्षाने जाणवले आहे,मग प्रश्न उरतो इतक्या वर्ष जे जे सत्तेवर आले त्यांनी काय केले? आणि आम्ही त्यांना याबाबत जाब का विचारला नाही?
भारतात आरोग्याची परिस्थिती अतिशय दारुण आहे हे मान्य करायला हवे. क्षय,हिवताप,हत्तीरोग,कावीळ आणि मेंदूज्वर या संसर्गजन्य आजारावर आपण अजून पूर्ण ताबा मिळवलेला नसताना त्यात कोरोनाने आपण पूर्ण हतबल झालेलो आहोत.मलेरियामुळे भारतात दरवर्षी अंदाजे 2 लाख लोक मरतात म्हणजे दिवसाला अंदाजे 548 लोक.जगातल्या टी बी च्या एकूण संख्येपैकी 28% रुग्ण एकट्या भारतात आहेत.दरवर्षी 3 लाख लोक मरतात म्हणजे रोजचे 822 लोक मरण पावतात.जुलाबामुळे संपूर्ण जगात जे मृत्यू होतात त्यापैकी 25% मृत्यू एकट्या भारतात होतात. कुष्ठरोगाने मृत्यूमुखी पडण्यात जगाच्या तुलनेत भारतातील प्रमाण 33% आहे आणि ही शरमेची बाब आहे आणि मेंदूज्वराने भारतात जगातल्या मृत्यूपैकी 50% लोक मृत्यू पावतात.एवढी विदारक परिस्थिती आजही भारतात आहेत.आरोग्याच्या बाबतीत आपण अजूनही गंभीर नाही.
गर्भवती माता आणि बालमृत्यूचे प्रमाण जगातील इतर देशांपेक्षा खूप अधिक आहे.भारतात फक्त 40% बालकांनाच जन्मानंतर सर्व योग्य लसी टोचण्यात येतात आणि इतर मुले त्यापासून आजही दूर आहेत आणि आता कोरोनाची तिसरी लाट याच लहानग्यांच्या जीवावर येणार आहे असे म्हणतात मग ते चित्र किती विदारक असेल हे न बोललेले बरे..??
मग अशा आरोग्य सेवेवर सरकार किती खर्च करते.तर सर्वात नीचांकी खर्च सरकार करते.आरोग्यसेवेवर राष्ट्रीय उत्पन्नाच्या कमीतकमी 5% खर्च केला पाहिजे पण सरकार फक्त 1.3% खर्च करत आहे,तो एकदम क्षुल्लक आहे.LPG धोरण स्वीकारल्या पासून आरोग्यवरील खर्च निरर्थक समजुन अजून कमी केला गेला आहे.भारताचा प्रत्येक व्यक्तीवरील खर्च आहे फक्त 1112 रूपये इतकाच तर अमेरिका आदी देशात हाच खर्च दरडोई 4802 डॉलर इतका आहे.आपल्यावर होणाऱ्या खर्चात तर मोठ्या डॉक्टरची फी सुद्धा भागू शकत नाही.खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल यांचा खर्च न परवडल्यामुळे शहरातील 68% आणि खेड्यातील 57% लोक घरीच मनाने औषध घेतात आणि ती ही परवडली नाही तर ते ही करत नाहीत.
“”आरोग्य सेवा तीन प्रकारे चालते. सब सेंटर,प्रायमरी हेल्थ सेंटर आणि कम्युनिटी हेल्थ सेंटर ” .ही 3 ही सेंटरची संपूर्ण देशात कमतरता तर आहेच परंतु आहे त्यात देखील डॉक्टर,स्टाफ, नर्सेस,अंबुलन्स, उपकरणे आणि औषधे नाहीत.20% सब सेंटर मध्ये पाणी नाही.23% मध्ये वीज नाही.6000 सेंटर मध्ये स्त्री आरोग्यसेविका नाही तर 1 लाख सेंटर मध्ये पुरुष आरोग्य सेवक नाही आणि 4243 सेंटरमध्ये दोघेही नाही.आपल्याकडे अंदाजे 1,56,231 सेंटर आहेत.त्यातील फक्त 38% केंद्रवर सुविधा आहेत.फक्त 20% केंद्रावर टेलिफोन आहेत तर 31% केंद्रात एकही बेड नाही. अशा या सरकारी सेंटरला अंदाजे दरवर्षी फक्त 80 हजार ते 1 लाख रुपये निधी येतो त्यात पगार तरी भागातील का??बाकी सर्व सुविधा करणे कोसो दूर..?
सार्वजनिक आरोग्यावर खर्च करणाऱ्या 175 देशांत भारताचा 171 वा क्रमांक लागतो तर मेडिकल टुरिझम इंडेक्समध्ये भारताचा जगात 5 वा क्रमांक लागतो,ही लाजिरवाणी बाब आहे. भारतातल्या पंचतारांकित हॉस्पिटलमुळे परदेशी रुग्ण भारतात येऊन उपचार घेऊन जातात म्हणून भारतात मेडिकल टुरिझम वाढला आहे.भातातले श्रीमंत व्यक्ती उद्योगपती, सेलिब्रिटी, राजकारणी हेच फक्त त्याचा लाभ घेऊ शकतात बाकी लोक रस्त्यावर झोपून सुद्धा इलाज करू शकत नाही.बेड नाही म्हणून लोक रिक्षात बसून सलाईन लावत आहेत,बेड नाही म्हणून अनेकांनी गाडीत जीव सोडला आहे.आज सरकारी जागेत उभी असलेली पुणे मुंबई येथील मोठं मोठी हॉस्पिटल फुकट जागेवर अफाट नफा कमवत आहेत.1 रुपाया दराने मुंबईतील काही हॉस्पिटलचे भाडे आहे.त्यांना वाढीव FSI, वीज आणि पाणी बिलात सवलत,टॅक्स मध्ये सवलत,कस्टम ड्युटी माफ,बँकेकडून त्वरित कमी दराने कर्ज मंजूर होतात आणि हीच हॉस्पिटल गरिबांना महाग आहेत.
जुन्या आकडेवारी नुसार भारतात 1000 लोकसंख्येप्रमाणे 0.62 डॉक्टर्स आहे.आज भारतात वाढती लोकसंख्या आणि निवृत्त होणाऱ्या डॉक्टर्सची संख्या लक्षात घेतली तर 6 ते 7 लाख डॉक्टर्सची गरज आहे परंतु देशात मेडिकल कॉलेजमध्ये अंदाजे फक्त 67000 जागा आहेत म्हणजे आपल्याला अजून 9 ते 10 वर्ष लागणार आणि आणखी त्यात वाढ होणार.देशात सरकारी आणि खाजगी मिळून 476 महाविद्यालय आहेत त्यात खाजगी हॉस्पिटलमध्ये कोटी कोटी रुपयांपर्यंत फी आहे मग कसे डॉक्टर्स तयार व्हायचे?वैद्यकीय शिक्षण मुद्दाम महाग करून ठेवण्यात नक्की हेतू काय असावा? जे गरजेचे आहे ते दुर्लभ करून ठेवले आहे.
सरकारी हॉस्पिटलमध्ये 11082 रुग्णामागे 1 डॉक्टर तर 2046 रुग्णासाठी 1 बेड आहे आणि आता तर कोरोनामध्ये तर सर्वत्र हाहाकार माजला आहे.
आज खेड्यात फ़क्त 20 हजार हॉस्पिटल आणि 2 लाख 80 हजार बेड आहेत आणि आजही 70% च्या वर जनता खेड्यात राहते म्हणजे ते प्रमाण किती असू शकते?आजही जवळ जवळ खेड्यांमध्ये 75% आणि शहरात 69% जनता आपल्या खिशातूनच हॉस्पिटलचा खर्च करतात तर सरकार फक्त 26% खर्च करते.भारतातील 80% आरोग्यसेवा ही खाजगी क्षेत्राकडून तर फक्त 20 % सार्वजनिक क्षेत्राकडून दिली जाते. आरोग्य सेवांचे होत चाललेले खाजगीकरण आणि महागडी आरोग्य सेवा यामुळे भारतातील लोकांचे आरोग्य ऐरणीवर आहे.आज पर्यंत आरोग्य,शिक्षण,अन्न,वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा देखील पूर्ण होऊ शकल्या नाहीत. भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेऊन मोठ्या वर्गाचे प्रचंड शोषण या व्यवस्थेकडून चालू आहे.आपण आज पर्यंत कधीही जाब विचारलेला नाही.आपण ज्यांना निवडून देतो त्यांनी आज पर्यंत या मूलभूत सुविधा का केल्या नाहीत याच जाब आपण कधी विचारणार आहोत?मोफत आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराची हमी आज पर्यंत आपण का मागितली नाही??आपण दरवेळी आपला माणूस,आपला पक्ष म्हणून ज्यांना निवडून देतो त्यांचे गुलाम होऊन बसलो आहोत.मतदार राजा गुलामच नव्हे तर बटीक झाला आहे.जो पर्यंत आपण या व्यवस्थेला जाब विचारून नेस्तनाबूत करत नाही तो पर्यंत तरी काही खरे नाही…!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *