दिव्यांगांना शक्ती देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या संपूर्ण संगणक तंत्रज्ञान या ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन
Summary
मुंबई, दि. 05 : दृष्टिहीन असून काम करू शकणारी व्यक्ती असामान्य असते. दिव्यांग व्यक्तींबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यापेक्षा त्यांना शक्ती देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. नाशिक येथील ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेने […]
मुंबई, दि. 05 : दृष्टिहीन असून काम करू शकणारी व्यक्ती असामान्य असते. दिव्यांग व्यक्तींबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यापेक्षा त्यांना शक्ती देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
नाशिक येथील ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेने अंध दिव्यांग बांधवांसाठी निर्मिलेल्या संपूर्ण संगणक तंत्रज्ञान या पुस्तकाचे सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे प्रकाशन करण्यात आले.
संगणकाची ओळख, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, डेटा एन्ट्री आदी विषयांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला असून, 5 भागांतील या पुस्तकाचे लेखन श्री. हेमंत दवे व श्रीमती गौरी कापुरे यांनी केले आहे. या प्रकाशन कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अरुण बारस्कर, संचालक अर्जुन मुद्दा, मानद अध्यक्ष सौ. कल्पना पांडे, उपाध्यक्ष विश्वासराव गायकवाड, कोषाध्यक्ष विजया दवे आदी उपस्थित होते.
संस्थेने ब्रेल लिपीतील पुस्तकांचे प्रिंटिंग करण्यासाठी विभागाकडे मागणी केली असून, त्यास श्री. मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अद्ययावत प्रिंटर उपलब्ध करुन देण्याचे सांगितले. राज्यातील अंध बांधवांना ब्रेल लिपीतून संगणकाची माहिती देणारे पुस्तक उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री.मुंडे यांनी राज्य सरकारच्या वतीने ब्लाइंड वेल्फेअर संस्थेचे आभार मानले.