दिवाळीत सोन्याची बिस्किटं, हजारो कोटींचा भ्रष्टाचार; आता परमबीर सिंग यांच्याविरोधात लेटरबॉम्ब
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात आता अकोल्याचे पोलीस निरीक्षक भीमराज उर्फ भीमराव रोहिदास घाडगे यांनी 14 पानी पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात लेटरबॉम्ब टाकणाऱ्या परमबीर सिंग यांच्याविरोधात लेटरबॉम्ब पडला आहे. या पत्राला परमबीर सिंग काय उत्तर देणार ते पाहणं महत्त्वाचं आहे. पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक आणि पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना लिहिलं आहे.
*काय आरोप करण्यात आले आहेत पत्रात?*
परमबीर सिंग हे पोलीस आयुक्त ठाणे या पदावर कार्यरत असताना प्रियदर्शनी बंगलो, कोपरी ठाणे
फ्लॅट नंबर 15 A, निलीमा अपार्टमेंट, पोलीस अधिकारी निवासस्थान, मलबार हिल या दोन शासकीय निवासस्थानांचा वापर करत होते. कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला फक्त एकच शासकीय निवासस्थान वापरण्याची संमती असते. मात्र परमबीर सिंग हे दोन निवासस्थानं वापरून क्रिमिनल मिसकंडक्ट केल्याचं सिद्ध होत आहे.
परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त असताना त्यांच्यासोबत पो. ना. प्रशांत पाटील आणि पोलीस हवालदार फ्रान्सिस डिसिल्वा हे दोघे जण दिवसरात्र असत. हे दोघे २० वर्षांपासून खासगी व्यवहार आणि बदल्यांसाठी बेनामी संपत्ती खरेदी विक्री करतात. या दोघांनाही परमबीर सिंग यांनी बेनामी संपत्ती कुठे आणि कोणाच्या नावावर घेतली आहे याची माहिती आहे. परमबीर सिंग यांनी सिंधुदुर्गात दुसऱ्याच्या नावे 21 एकर जमीन घेतली आहे.
परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त होण्याआधी पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण या ठिकाणी नेमणुकीस असल्यापासून प्रकाश मुथा राहणार कल्याण यांना चांगले ओळखत. हे दोघेही मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्यामार्फत रिव्हॉल्वर लायसन्सचे काम 10 ते 15 लाख रूपये घेऊन केले जात होते. तसंच बिल्डर लोकांची कामं कोट्यवधी रूपयांच्या देवाण घेवाण करून सेटलमेंट केली जात होती.
परमबीर सिंग यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी एजंट राजू अय्यरला नेमलं होतं. त्याच्याकडे बदल्यांमधील भ्रष्टाचारानंतर रक्कम जमा केली जात होत्या.
परमबीर सिंग यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी पोलीस उप आयुक्त पराग मणेरे हे देखील त्यांच्याकडे बदल्यातील भ्रष्टाचाराच्या रकमा जमा केल्यानंतर बदल्या केल्या जात होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या बदलीसाठी 50 लाख ते 1 कोटी रूपये घेतले जायचे
साजन रमेश कांबळे,
मुंबई प्रतिनिधी