…तेव्हा आमचाही जीव तुटतच असेल ना!! -डॅाक्टरच्या पत्नी शुभदा पाटील यांच काळजाला हात घालणारं पत्र. कोरोना च्या काळात येणारे फोन. आणि प्रोटोकॉल. — पेशंट सिरिअस झाला आहे सर.. — कोविड पेशंट चे राऊंड, तासनतास पाहाणी.. आणि आब्जरवेशन.
मुंबई:- चक्रधर मेश्राम विभागीय प्रतिनिधी. दि. 14 मे. 2021
आमचा रोजचा दिवस सकाळी साडेपाच पावणे सहाला सुरू होतो… जग साखर झोपेत असताना आम्हाला जाग नवऱ्याच्या फोनच्या रिंगने येते,,,, “सर इमर्जन्सी आहे,,, सर ऑक्सिजन संपत आलाय ,,,सर पेशंट सिरियस झाला आहे,,,, सर पेशंटला इंटीब्यूट करायच आहे…
झोपेतून उठून भयंकर गडबडीत जाताना माझ्या नवऱ्याने एकदा चक्क माझी लहान मुलगी तूडवली होती….तिकडून परिस्थिती सेटल करून यायला त्याला सात-साडेसात होतात…माझा जेमतेम चहा बनवून होईपर्यंत त्याने पाच ते दहा फोन उचललेले असतात.. आपल्याला नाष्टा बनवायला किमान पंधरा- वीस मिनिटे लागतात पण तो नाश्ता मोजून पाच मिनिटात त्याने संपवलेलाही असतो,,,तेही फोनवर बोलत बोलतच….
यानंतर एकदा तो कोविड राऊंड ला गेला की नंतर दुपारी एक पासून आपण तो घरी जेवायला आला आहे का?? यासाठी चार-पाच फोन करायचे… एखाद्यावेळी नशिबाने नवर्याशी बोलणे होते नाहीतर कोविड सेंटरमधील इतर डॉक्टर्स अथवा स्टाफ यांचे ठरलेलं उत्तर असतं ,,,””सर राउंड घेत आहेत,, पीपीई किट घातलेलं आहे,,,””
फायनली अडीच तीन वाजता तो घरी जेवायला येतो…आपण घरी असू तर पंधरा-वीस मिनिटे तेवढिच भेट होते,,, तेही लांबूनच,,, तो आईसोलेशन मध्ये राहतो त्या वेगळ्या रूम मध्ये माझ्या सासूबाई,,माझ्या मुली त्याला लांबूनच हाय करतात …..कधी हळूच नजर चुकवून मुली धावत गेल्याच तर क्षणात तितक्याच जोरात सगळेच इतके ओरडतात की भेदरतात ती पिल्लं,,, आणि नंतर स्वतःच हसून स्वतःच्याच मनाची समजूत घालतो ,””तुमच्यासाठीच स्वतःला वाळीत टाकले आहे मी”
त्या पंधरा मिनिटांमध्येही ठरलेले फोन- “”बेड अवेलेबल आहे का?? ऑक्सीजन अवेलेबल आहे??
रेमेडिसेंविर आहे का ??
व्हेंटिलेटर आहे का???
त्यातच ऑलरेडी ऍडमिट पेशंटच्या रिलेटिव्ह चे,,, फॅमिली डॉक्टर्स चे,, पेशंट कार्यकर्ता असेल तर राजकारण्यांचे फोन “पेशंट कसा आहे ??ऑक्सिजन किती आहे ??
सर्वात बर्डन टाकणारा फोन काहीही करा पण पेशंट वाचलाच पाहिजे डॉक्टर…””
अरे बाबा ठरलेला प्रोटोकॉल आहे ट्रीटमेंट चा,,मी काय कोणताच डॉक्टर हे सोडून काहीच नाही करू शकत सध्या,,,
फोनवर बोलत बोलत जेवण कधी संपले हेही कळत नाही… तीन-साडेतीन ला गेलेला नवरा रात्री डायरेक्ट बारा-साडेबाराला भेटतो… तोवर आपण साधारणता नऊपासून पाच दहा फोन केलेले असतात… फोन उचलत नाही म्हणून मेसेज टाकून ठेवलेले असतात…
“प्लीज जेवायला ये,,, आय एम वेटिंग फॉर यू,,, जेवण करून पुन्हा राउंडला जा ना प्लीज,,,,””
एकदाही रिप्लाय येणार नाही हे माहीतच असतं…फायनली रात्री बारा साडेबाराला राजे युद्धावरून घरी येतात… त्यानंतर आंघोळ… त्यानंतर जेवण…दिवसाच्या तुलनेने रात्री फोन थोडासा कमी वाजतो,,, तरीही कमी म्हणजे त्या अर्ध्या तासात पेशंटच्या ऑर्डरर्स साठी का असेना हॉस्पिटलचे तरी पाच -सहा फोन होतातच,,,
पप्पा ची भरपूर आठवण काढून मुली एव्हाना झोपलेल्या असतात….पप्पा कधीच नसतो आम्हाला झोपवायला अशा तक्रारी मागच्या कोविड वेव मध्ये करणाऱ्या आमच्या मुली सध्या मात्र कोरोना कधी जाणार ????मग पप्पा आपल्यासोबत झोपेल ना ????
असं समजूतदारपणे बोलतात तेव्हा भरून येतं….
खरेतर प्रत्येक राउंड नंतर पेशंटच्या नातलगांना काउन्सलिंग हे केलेलंच असतं,,, तरीही सो कॉल्ड मुंबईचा भाऊ, पुण्याचा काका,,,कुठला तरी नेता यांचे पुन्हा पुन्हा फोन येतातच… एकाच पेशंट साठी इतके फोन ते हे डायरेक्ट फिजिशियन ला ,,,ही पद्धतच मुळात चुकीची आहे…
फिजिशियननी पेशंट पाहायचे की फोनवर एवढ्यांचे शंकासमाधान करायचचं???
सीसीसी,,,डीसीएचसी सगळे मिळून सत्तर-ऐंशी पेशंट धरले आणि रोजचा किमान एक फोन धरला डॉक्टरला नातलगांचा तरी वेडा होईल तो माणूस काही दिवसांमध्ये…पुण्या-मुंबईत बसून काळजीच्या नावाच्या शेळ्या हाकणारे हे रिलेटिव्ह बिल भरायच्या वेळी मात्र हात वर करतात,, भांडायला येतात…त्यातुन चुकून पेशंट गेलेला असेल तर तर मग विचारायलाच नको..
मला नेहमी प्रश्न पडतो पेशंट ऍडमिट होता तेव्हा कुठे गेले होते हे सगळे??? घरात राहून वीस-बावीस स्कोअर होईपर्यंत कुठे गेले होते हे सगळे???
बिल भरायच्या वेळी मात्र दंगा फिक्स…अरे डॉक्टर लुबाडतो म्हणताना लाज कशी वाटत नाही तुम्हाला??? गव्हर्मेंट ने ठरवून दिलेलं दर पत्रक बाहेर लावलेलं असतं ना बोर्डवर,,,करा ना स्वतः कॅल्क्युलेशन,,,,,पन्नास हजार बिल झाल्यावर 30,000 भरून पाय कसा काढता येईल यासाठी दंगा करणारे तुम्ही लोक,,,,अंत्यसंस्काराला सुद्धा येत नाही पुढे….बऱ्यापैकी पेशंट्स चे तेही क्रियाकर्म हॉस्पिटल्स करतात…यानंतरही डॉक्टरच्या नावाने बोंबा ठोकायला हे रिकामे… स्वतःच्या जीवावर खेळून ट्रीटमेंट करेपर्यंत डॉक्टर देव…,,बिल मागितले की दानव… चोराच्या उलट्या बोंबा असाच हा प्रकार,,, किती तो अपप्रचार करावा एखाद्या फिल्डचा…अपरात्री 2-3 ला येणाऱ्या इमर्जन्सी च्या कथा ऐकल्यावर तर मला हाच प्रश्न पडतो की दोन तीन मिनिटात डॉक्टरने यावे म्हणून धिंगाणा घालणारे,,, हॉस्पिटल फोडायच्या धमक्या देणारे,,,आपल्या पेशंटला दोन-तीन दिवसापासून त्रास होत असताना झोपा काढत होते की काय??? कधी-कधी दोन-तीन दिवस काय तर आठ -आठ ,,दहा- दहा दिवस दुखणं अंगावर काढतात,,, पण डॉक्टर मात्र दोन-तीन मिनिटात हजर झाला पाहिजे… अरे माणूस म्हणून तुमची योग्यता काय जर झोपेतून उठून पेशंट बघायला यायला डॉक्टरला,,,त्यात चुकून त्याला लघुशंका लागलीच तर दोन-तीन मिनिटे वेळ लागू शकतो हेही तुम्हाला कळत नसेल,,,,
अशा रीतीने गेले एक ते दीड महिना जास्तीत जास्त तीन ते चार तास झोप मिळते… कधीकधी खूप वाईट वाटत जेव्हा हॉस्पिटलचा स्टाफ पॉझिटिव्ह येतो… स्वतःच्या लहान मुलाबाळांना घरी सोडून अहोरात्र आपल्यासोबत सेवा देणारी ही लोक…अशातच नातलगानी बिलासाठी केलेला राडा,, शेवटी फक्त क्रेडिट घेण्यासाठी- मिरविण्यासाठी राजकारण्यांनी केलेले फोन,,,आपल्या नोकऱ्या सुरक्षित रहाव्या म्हणून प्रशासनाने काढलेली पत्र ……मानसिक खच्चीकरण होत रोज त्यांचं….
अक्षरशा कधीकधी तो म्हणतो मला “”होत नाहीये आता मला… थकलोय मी रोजच्या ह्या गोष्टींना,,,मग त्याने डिस्चार्ज केलेला एखादा पेशंट जोकी एन.आय.व्ही वर होता डिड दोन महिने,, तेवीस-चोवीस स्कोअर मधून बरा झालेला,, तीन-चार महिने ऑक्सिजन वर काढलेला स्वतःच्या पायांनी चालत फॉलोअपला चालत येतो आणि हात जोडतो,,,त्याची फॅमिली म्हणते डॉक्टर खरंच देव आहात तुम्ही आमच्यासाठी….. तेव्हा जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं त्याला…एखादा पेशंट दगावतो तेव्हा तो काही डॉक्टरांनी मुद्दाम मारलेला नसतो,,, माणसं मारायची नाही तर जगवायची शपथ घेतलेली असते त्यांनी… पण डॉक्टर ही एक माणूस आहे,,तो काही देव नाही की प्रत्येक पेशंट वाचवूच शकेल… अरे आजही येऊन बघितलं कोणी तर माझ्या नवऱ्याच्या हाताला जखमा आहेत सॅनिटायझर लावून लावून झालेल्या… किमान चाळीस पन्नास मास्क घरात अडकवलेले दिसतील त्याचे…अक्षरशा छोटीशी पोनी घालायला येईल एवढे वाढलेले केस कोणीही कापायला तयार नाहीये…आज प्रत्येक डॉक्टरची हीच अवस्था आहे…
पेशंट मरतो तेव्हा स्टाफ,,,डॉक्टर ही रडतातच,,, मृत्यू समोर दिसत असताना पेशंटला ट्रीट केलेलं असत त्यांनी… तू जगणार आहेस,,, तू बरा होणारच आहेस,, हा आधार दिलेला असतो… तरीही तुम्ही त्याच्या नावाने बोंबलता …एका घरातले चार -चार कर्ते पुरुष कोविडमधून वेंटीलेटर च्या दारातून परत आणलेल्या पेशंटनीही मागे कृतघ्नपणे बोलावं????
गरज सरो आणि वैद्य मरो…दुसरं काय… माझे सासरे सहा महिन्यापूर्वी 32 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवूनही पोस्टकोविड कॉम्प्लिकेशन नी गेले.. त्यानंतर माझ्या नवऱ्याला त्या शॉक मधून बाहेर काढायला आणि आता पप्पा या जगात नाहीत हे एक्सेप्ट करायला लावायला आम्हाला किमान चार महिने गेले… हॉस्पिटल मधल्या प्रत्येक प्रत्येक मृत्यू वेळी माझ्या नवऱ्या समोर तीच सिच्युएशन पुन्हा पुन्हा रीक्रियेट होतिये,,, आणि त्यातूनही सावरून बिचारा पुन्हा सेवा देतोय… ते दोन छोटेसे जीव मागची पूर्ण वेव आणि आताचे दोन महिने झाले पप्पाला भेटलेले नाहीयेत…काय असेल आमच्या घरातले मानसिक स्वास्थ्य???
तुम्ही साठ-सत्तर वर्षांच्या पेशंटच्या मृत्यूनंतर हुज्जत घालता…बिल बुडवण्यासाठी राजकारण्यांत पर्यंत जाता…
नुकतेच कोविड ने डॉक्टर पती गमावलेल्या आईचा बत्तीस वर्षाचा तरुण मुलगा,,,चार वर्षांच्या 2 मुलींचा बाप जेव्हा बायकोला म्हणतो हे सगळ्या एटीएमचे पासवर्ड,, हे टर्म इन्शुरन्स चे पेपर्स,,, हे एल.आय.सी चे पेपर,, अजून बाकी डिटेल्स हे या डायरीत लिहितोय मला काही झालं तर शहाण्यासारखं नीट राहायचं…स्वताला,,,घराला जपायचं…तेव्हा आमचाही जीव तुटतच असेल ना…त्याला कोविड ड्युटी वरच जाऊ द्यायला नको वाटत आम्हालाही कधी कधी…
समाज म्हणून,, प्रशासन म्हणून,,,नैतिकता म्हणून आपण डॉक्टरांच्या पाठीशी नक्की कधी उभा राहणार आहोत? (शुभदा पाटील, डॉक्टरांच्या पत्नी)