बिड महाराष्ट्र हेडलाइन

जिल्ह्यातील निजामकालीन ३८९ शाळांचे होणार पुनरुज्जीवन; ३७ कोटी रुपये निधी मंजूर – पालकमंत्री धनंजय मुंडे

Summary

बीड जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण बीड,  दि.17 : शिक्षण देणे म्हणजे प्रत्यक्ष poज्ञानदान, त्याला केवळ व्यवसाय न समजता मनातून सेवाभाव समजून ज्ञानदान करणारे सर्वच शिक्षक आदर्श आहेत, असे गौरवोद्गार राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय […]

बीड जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण

बीड,  दि.17 : शिक्षण देणे म्हणजे प्रत्यक्ष poज्ञानदान, त्याला केवळ व्यवसाय न समजता मनातून सेवाभाव समजून ज्ञानदान करणारे सर्वच शिक्षक आदर्श आहेत, असे गौरवोद्गार राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहेत. ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते.

बीड जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक अशा 217 शाळांमधील वर्गखोल्या पुनर्बांधणी कामे व 172 शाळांमधील दुरुस्ती कामे अशा एकूण 389 निजामकालीन शाळांच्या इमारतींच्या पुनरुज्जीवन कामासाठी राज्य शासनाने सुमारे 37 कोटी रुपयांची तरतूद केली असून, याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. या शाळांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम लवकरच हाती घेणार असल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमात स्पष्ट केले.

बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 5 लाख 71 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्या सर्वांना शिक्षण देन्याबरोरबरच सामाजिक जाणिवांची भावना निर्माण करणाऱ्या व आदर्श शिक्षकांचा सन्मान करणे भाग्याचे आहे असेही पालकमंत्री धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.

या समारंभात जिल्ह्यातील 11 प्राथमिक, 10 माध्यमिक व एका विशेष शिक्षकाचा सहकुटुंब आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी श्री. मुंडे यांच्या सह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट, आमदार संदीप भैय्या क्षीरसागर, संजयभाऊ दौंड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांसह अधिकारी, पदाधिकारी व सत्कारमूर्ती शिक्षक सहपरिवार उपस्थित होते.

कोविड मधील योगदान जिल्हा विसरणार नाही

बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षणाचे धडे देण्याबरोबरच बीड जिल्हा प्रशासनाच्या बरोबरीने कोविड व्यवस्थापनामध्ये मोलाचे योगदान दिले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये सुरुवातीपासून बीड जिल्हा विभागात अव्वल होता, त्याचे संपूर्ण श्रेय जिल्ह्यातील शिक्षकांचे आहे. त्यांचे कोविड व्यवस्थापनातील योगदान बीड जिल्हा कधीच विसरणार नाही, अशा शब्दात पालकमंत्री श्री.मुंडे यांनी शिक्षकांच्या कामाचे कौतुक केले.

हे ठरले आदर्श शिक्षक…

प्राथमिक विभागातून श्रीमती अनिता हरिश्चंद्र, अप्पा झिंजुके, श्रीमती मूनव्वर शेख, तानाजी लासुने, गंगाराम शिंदे, श्रीमती ज्योती शिंदे, ताहेरखान पठाण, अंकुश फड, अशोक पवार श्रीमती मंगल नागरे, हरिदास सोळंके तसेच माध्यमिक विभागातून चंद्रकांत कवडे, सतीश दळवी, पोपट गोसावी, शंकर इंगोले, लहू चव्हाण, महादेव क्षीरसागर, पांडुरंग राठोड, श्रीमती अनिता गर्जे, बबन घायाळ, प्रताप काळे आणि श्रीमती मंगल समुद्रे या विशेष शिक्षिका यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

समाजाचा ईश्वरावर जितका विश्वास तितकाच शिक्षकांवर

विशेषकरून ग्रामीण भागात पालकांचा शिक्षकांवर प्रचंड विश्वास असतो, समाजाचा जितका विश्वास ईश्वरावर आहे अगदी तितकाच विश्वास समाज शिक्षकावर व्यक्त करतो. तो विश्वास जपणे ही आपली जबाबदारी आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती बजरंग बप्पा सोनवणे यांनी केले, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिवकन्या सिरसाट यांनीही आपले मनोगत व्यक्त करत पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

शिक्षण विभागाच्या वतीने दाखविण्यात आलेल्या चित्रफितीचे पालकमंत्री महोदयांनी केले कौतुक

कार्यक्रमाच्या प्रास्तविक भाषणात शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी यांनी गुरूतत्वाचा हा सत्कार आहे. मुलांसाठी झटणाऱ्या शिक्षकांचा प्रातिनिधीक सत्कार आहे असे सांगून विविध उपक्रमाची माहिती दिली.

यावेळी पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते 11 प्राथमिक, 10 माध्यमिक आणि 1 विशेष अशा 22 शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्वागतगितानंतर शिक्षण विभागाच्या वतीने दाखविण्यात आलेल्या चित्रफितीचे पालकमंत्री महोदयांनी कौतुक केले.

प्रारंभी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा शिक्षण विभागाच्या वतीने उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांनी सत्कार केला.  आ.संदीप क्षीरसागर यांचा शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी तर आ.संजय दौंड यांचा सत्कार डॉ.विक्रम सारूक यांनी केला. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा व  मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार प्रभारी उपशिक्षणाधिकारी अजय बहीर   यांनी केला. जि.प. अध्यक्षा .शिवकन्या सिरसाट यांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी केला. तर उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांचा सत्कार प्रभारी उपशिक्षणाधिकारी सोनवणे यांनी केला.  यावेळी उपस्थित शिवाजी सिरसाट यांचा सत्कार गौतम चोपडे यांनी तर नारायण शिंदे यांचा सत्कार हिरालाल कराड यांनी केला. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन ज्ञानेश्‍वर काशिद यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. विक्रम सारूक यांनी केले.

००००००

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास लिहिण्यासाठी शासनस्तरावर निर्णय -पालकमंत्री धनंजय मुंडे

माजलगांव येथील पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

बीड, दि. 17 (जि.मा.का.) : भारतीय स्वातंत्र लढ्याचा इतिहास उपलब्ध आहे त्याच धर्तीवर मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास लिहिण्यासाठी शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

माजलगांव येथील पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री श्री.मुंडे यांच्या हस्त झाले. याप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन समारंभास आमदार प्रकाश दादा सोळंके, आमदार संदीप शिरसागर, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिवकन्या शिरसाठ, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जि.प.बांधकाम सभापती जयसिंग सोळंके, जि.प.सभापती कल्याण आबुज, माजलगाव पंचायत समिती सभापती सोनाली नवले,  गटविकास अधिकारी एस जी हजारे, श्री अशोक डक, नगराध्यक्ष शेख मन्सूरचाँद साहेब, श्री राधाकृष्ण होके पाटील, श्री बाबूराव पोटभरे यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, सध्या आपण कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात आहोत तरीदेखील सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घेत राज्य सरकारने निधी कमी पडू दिला नाही. यातूनच आपत्तीच्या काळात देखील माजलगाव मध्ये विकासाची अनेक काम देखील झाली आहेत. असे मंत्री श्री.मुंडे म्हणाले.

आमदार प्रकाश सोळंके यांचे विकासात महत्त्वाचे योगदान

पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि स्वर्गीय सुंदरराव सोळंके यांचा स्मृतिदिन आहे या महत्त्वाच्या दिवशी हा लोकार्पण सोहळा झाला. यासाठी आमदार प्रकाश सोळंके यांचे विकासात महत्त्वाचे योगदान आहे. आमदार सोळंके यांची सुरुवात पंचायत समिती सदस्य पदापासून सुरू झाली त्यानंतर ते राज्यात राज्यमंत्री देखील झाले त्यांचा अनुभव आणि विकास कामांची सुरुवात पंचायत समिती मधूनच झाली. ते सतत विकासासाठी पाठपुरावा करून विकास घडवत आहेत. येथे नगर परिषदेचे सिमेंट रस्ते कोरोना काळात झाले. माजलगाव येथे नाट्यग्रहासाठी 5 कोटी रु. निधीची मंजूरी आणि माजलगाव एम.आय.डी.सी. सह विकासाची अनेक काम होत आहेत.

मंत्री महोदय म्हणाले, माजलगाव हा सधन तालुका आहे. यासाठी माजलगाव धरण महत्त्वाचे ठरले असून या धरणास सुंदर सागर असे नामकरण करून येथे चांगले उद्यान विकसित करण्यासाठी निर्णय घेण्यात येईल. बीड जिल्ह्यातील नवीन जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत आणि सर्व नवीन पंचायत समिती इमारतींमध्ये साधनसामग्री फर्निचर यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ असे त्यांनी आश्वासित केले.

ते म्हणाले, आता सर्वात जास्त ऊस उत्पादन बीड जिल्हा जिल्ह्यात होते तेव्हा येथील सर्वात जास्त मजूर ऊस तोडणी साठी इतर जिल्ह्यात जातो. बीड जिल्ह्यास हक्काचे पाणी मिळवून देऊ यातून येथील दुष्काळ पुसून टाकण्यास मदत होईल असे मंत्री श्री.मुंडे यांनी सांगितले.

आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, तालुक्यातील गोरगरीब सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम पंचायत समितीच्या माध्यमातून घडत असते. सामान्य माणसाला येथे आल्यानंतर विश्वास वाटला पाहिजे. या पंचायत समितीच्या नवीन इमारती मधून विश्वासाने सामान्य माण्साचे काम व्हावे. तसेच योजनांचे उदि्दष्ट 100% साध्य करण्याचे काम व्हावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पं.स.सभापती सोनाली खुळे यांनी केले.  तसेच सभापती जयसिंग सोळंके आणि विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि मंत्री महोदयांच्या हस्ते कोनशिला अनावरण करुन व फित कापून नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीच्या विविध योजनातील लाभार्थ्यांना पालकमंत्री श्री.मुंडे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. यामध्ये सुनील राठोड व मनीषा राठोड या दांम्पत्यास आणि प्रशांत थिटे यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *