महाराष्ट्र हेडलाइन

गुळण्यांद्वारे आता झोनस्तरावर चाचण्या घसा आणि नाकातील स्रावाचे नमुने घेताना होणाऱ्या त्रासापासून होणार मुक्तता खारट पाण्याच्या गुळण्या करून (सलाइन गार्गल) आरटीपीसीआर चाचणी करण्याचे नागपुरात झाले ट्रायल

Summary

खारट पाण्याच्या गुळण्या करून (सलाइन गार्गल) आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या नवीन पद्धतीची अधिकाधिक केंद्रे सुरू करण्याचा प्रयत्न महापालिकेतर्फे सुरू आहे. त्याअंतर्गत शनिवारी सतरंजीपुरा झोनमध्ये ट्रायल घेण्यात आले. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) अंतर्गत नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेतर्फे (नीरी) […]

खारट पाण्याच्या गुळण्या करून (सलाइन गार्गल) आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या नवीन पद्धतीची अधिकाधिक केंद्रे सुरू करण्याचा प्रयत्न महापालिकेतर्फे सुरू आहे. त्याअंतर्गत शनिवारी सतरंजीपुरा झोनमध्ये ट्रायल घेण्यात आले.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) अंतर्गत नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेतर्फे (नीरी) करोना चाचणीसाठी नवीन पद्धत शोधून काढण्यात आली आहे. ‘नीरी’च्या या सलाइन गार्गल आरटीपीसीआर चाचणीला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मान्यता दिली आहे. या प्रकारच्या चाचणीचे एकमेव केंद्र सध्या सुरेंद्रनगरजवळील आरपीटीएस येथे आहे. या प्रकारच्या केंद्रांची संख्या वाढविण्यात आता भर देण्यात येत आहे. याबाबत अधिक सांगताना महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी शुभम मनगटे म्हणाले, ‘नवीन केंद्र सुरू करण्याच्या अनुषंगाने शनिवारी सतरंजीपुरा झोनमध्ये ट्रायल झाली. त्यावेळी एकूण सात जणांचे नमुने घेण्यात आले. त्यांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. महापालिकेच्या मोबाइल टेस्टिंग सेंटरद्वारे नमुने गोळा करण्यात आले. या प्रकारच्या चाचणीसाठी नागरिक अनुकूल आढळल्यास झोनस्तरावर केंद्रे सुरू करण्यात येतील.’

वेळ आणि मनुष्यबळ वाचणार
गुळण्यांद्वारे चाचणी करण्याच्या पद्धतीमुळे वेळेची बचत तसेच घसा आणि नाकातील स्रावाचे नमुने घेताना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता होणार आहे. त्यामुळे या पद्धतीला लोकांची पसंती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्येक झोनमध्ये या चाचणीचे केंद्र सुरू केल्यास कमी वेळेत जास्तीत जास्त नमुन्यांची चाचणी होऊन अहवाल प्राप्त होऊ शकेल. त्यामुळे आजाराचे निदान होऊन पुढील उपचार लवकरात लवकर सुरू करण्यास मदत होईल.

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *