कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम गतिमान करावी – पालकमंत्री शंभूराज देसाई
Summary
कोरोना संसर्ग सद्यस्थितीचा आढावा लसीकरणाविषयीचे गैरसमज दूर करण्याच्या सूचना ग्रामीण भागामध्येही लसीकरणाचे प्रमाण वाढणे आवश्यक वाशिम, दि. १९ (जिमाका) : कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र व्यक्तींचे लसीकरण अधिक गतीने […]
कोरोना संसर्ग सद्यस्थितीचा आढावा
लसीकरणाविषयीचे गैरसमज दूर करण्याच्या सूचना
ग्रामीण भागामध्येही लसीकरणाचे प्रमाण वाढणे आवश्यक
वाशिम, दि. १९ (जिमाका) : कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र व्यक्तींचे लसीकरण अधिक गतीने करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज, १९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार किरणराव सरनाईक, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात लसीकरण मोहीम गतिमान करतांना ज्या भागामध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, अशा भागांवर लक्ष केंद्रित करून जनजागृती करावी. काही नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी गैरसमज असण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांच्या मनातील गैरसमज दूर करून त्यांना लसीकरणाचे महत्व पटवून द्यावे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरुपात लसीकरण केंद्र उभारून लसीकरण मोहीम राबवावी, यासाठी आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे.
जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण सध्या कमी आहे, ही चांगली बाब आहे. मात्र, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असल्याने आरोग्य यंत्रणेने सज्ज राहणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा कोविड रुग्णालयासह कारंजा उपजिल्हा रुग्णालय व सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा तयार कराव्यात. ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण होण्यासाठी जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी, साठवण क्षमता वाढविण्याची कार्यवाही सुरु असून ही कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करावा. मनुष्यबळाची कमतरता भासू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.
खासदार गवळी म्हणाल्या, काही संस्था आरोग्य विभागासाठी उपकरणे व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यास तयार आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाने मागणी करावी. तसेच लसीकरण मोहीम गतिमान करण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा.
आमदार पाटणी म्हणाले, कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील व्हेंटीलेटर सुविधा तातडीने सुरु करावी. तसेच मानोरा तालुक्यातील लसीकरण वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण भागामध्ये लसीकरण केंद्र सुरु करावे.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण सध्या नियंत्रणात असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ०.५ ते ०.८ इतका आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २९ टक्के लसीकरण झाले असून अधिकाधिक पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून जिल्ह्यात ऑक्सिजन, व्हेंटीलेटर बेडची पुरेशा प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये एका दिवशी जास्तीत जास्त ७ मे. टन ऑक्सिजनची आवश्यकता भासली होती. तिसऱ्या लाटेची तयारी करताना जिल्ह्यात दैनंदिन २७ मे. टन ऑक्सिजन उपलब्ध होईल, याचे नियोजन करण्यात आले आहे.