इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील वाद विकोपाला का गेला; युद्ध का सुरू आहे ?
मुंबई :- चक्रधर मेश्राम विभागीय प्रतिनिधी:- दि. 13 मे. 2021
सध्या इस्रायल नि पॅलेस्टाईनमध्ये जो जोरदार संघर्ष सुरु आहे. आतापर्यंतच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला असून, हा वाद अजूनही शमलेला नाही. अवघे जग कोरोनाशी लढत असताना, या दोन देशात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या वादाचे मूळ काय आहे ते जाणून घेऊयात.. संघर्ष सुरू होण्याचे मूळ कारण जेरुसलेमच्या जुन्या शहराजवळ एक शेख जर्राह नावाचे शहर आहे. येथे बहुतांश पॅलेस्टाईनचे नागरिक आहेत.
मात्र, ही जागा कुणाच्या मालकीची यावरुनच संपूर्ण वाद सुरु झाला आहे. अनेक दशकं इस्राईलच्या सर्वोच्च न्यायालयात यावरील एक केसही सुरु आहे. यावर निकाल देताना न्यायालयाने या ठिकाणी राहणाऱ्या पॅलेस्टाईनच्या नागरिकांना हटवण्याचे आणि त्याऐवजी इस्राईलच्या नागरिकांना वसवण्याचे आदेश दिले. यावरुनच पॅलेस्टाईन आणि अन्य मुस्लीम देश संतापले आहेत. त्यातच रमजानच्या महिन्यात पॅलेस्टाईनचे लोक नमाज पठणासाठी अल-अक्सा मशिदीत आले होते. त्यावेळी हा वाद उफाळला. मुस्लीम समुहासाठी अल-अक्सा मशिदीचं महत्त्व मुस्लीम धर्मात 3 सर्वात पवित्र स्थळं आहेत. यातील दोन मक्का आणि मदिना सौदी अरबमध्ये आहेत. उर्वरीत एक जेरुसलेममधील अल-अक्सा मशिद आहे. ही मशिद जुन्या जेरुसलेमचा भाग आहे हे तेच ठिकाण आहे ज्यावर मुस्लीम, ख्रिश्चन आणि यहुदी असे तिन्ही धर्म आपलं असल्याचा दावा करतात. जेरुसलेम या जुन्या शहराची धर्माच्या आधारावर विभागणी करण्यात आलीय. याच्या मुस्लिम क्वार्टरमध्ये अल-अक्सा मशिद आणि डोम ऑफ द रॉक आहे. ईसाई क्वार्टरमध्ये एक चर्च आहे आणि यहूदी क्वार्टरमध्ये विलिंग वॉल आहे. येथे यहुदी धर्माच्या प्राचीन मंदिराचे अवशेषही आहेत. हे ठिकाण सीमेपासून अगदी जवळ आहे. यावर इस्राईल आणि पॅलेस्टाईन दोन्ही देश दावा करतात. मशिदीच्या परिसरात असलेल्या नागरिकां मधील काहींनी इस्राईलच्या पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप झाला.
इस्राईलच्या पोलिसांनी मशिदीत घुसून पोलिसांवर कारवाई केली अनेक लोकांना अटक करण्यात आली. त्यानंतर हा वाद पेटला. रॉकेट हल्ल्यांमध्ये आतापर्यंत गाजात 14 मुलांसह 65 लोकांचे मृत्यू झालेत. दुसरीकडे इस्राईलमध्ये देखील 7 लोकंचा मृत्यू झाला आहे. तसेच इस्रायली हवाई हल्ल्यांनी गाझा शहरातील 14 मजली अल-शारुक टॉवर पूर्णपणे उध्वस्त केली. या दोन देशातील तणावावर संयुक्त राष्ट्राने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्धसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.