‘आम्ही तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका’ लोणकर कुटुंबीयांना दिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धीर स्वप्नीलच्या बहिणीला सक्षम करण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश
मुंबई, दि. १६ : ‘आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत.. काळजी करू नका,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.
स्वप्नील लोणकर यांचे आई, वडील आणि बहिण यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वप्नीलचे आई, वडिलांचे सांत्वनही केले. तसेच स्वप्नीलच्या बहिणीला करता येईल, ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वस्तही केले. तिचे शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देता येईल यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलमताई गोऱ्हे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सर्वश्री अनिल देसाई, विनायक राऊत, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर, सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी स्वप्नीलच्या आई सौ.छाया, वडील सुनील तसेच बहिण पूजा यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. घटना दुर्देवी आहे. पण धीराने घ्यावे लागेल. आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका, असा धीर दिला.