अस्वस्थ मनातून कोणतेही योग्य निर्णय घेतले जाऊ शकत नाही.. डॉ. आसबे ल. म.
मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. १६ एप्रिल २०२१
गैरसमज हा पेटविलेल्या बॉम्ब सारखा असतो, त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या आयुष्gयात बरेच नुकसान हे गैरसमजातून होते.
_आपल्या मनात गैरसमज निर्माण झाला की त्याचा पहिला तडाका आपल्या मनःशांतीला बसतो._
*मन अस्वस्थ होते आणि अस्वस्थ मनातून कोणताच निर्णय योग्य घेतला जात नाही.*
त्याचबरोबर अस्वस्थ मानसिकतेतून केलेली कृती योग्य असण्याची शक्यता फार कमी असते, त्याचबरोबर आपली क्षमता क्षीण होते, हे न दिसणारे आपले वैयक्तिक नुकसान असते.
गैरसमज हा उलटी सारखा असतो, तो फार काळ दाबून ठेवता येत नाही. ज्यावेळी हा बाहेर पडतो, त्यावेळी आपले दृश्य स्वरूपातील नुकसान सुरू होते. जवळची आणि चांगली माणसे गैरसमजामुळे विनाकारण तुटली जातात. गैरसमज दूर होताच ती पुन्हा जोडली जातात, पण नंतरची ती जोड भंगलेल्या भांड्याला जोड दिल्यासारखीच असते.गैरसमज निर्माण झाल्यानंतर, आपण त्या व्यक्तीशी जे बोलतो, वागतो, ते ती व्यक्ती कधीच विसरत नाही. म्हणून गैरसमज विसरून दिलेली ही जोड कायम दिसत असते.
आपल्या मनात गैरसमज तरी का निर्माण होतो. व समज प्रत्येकाला असते,ती गैर कधी होते ..आपले अंतःकरण,
ही आपल्या समजाची जननी आहे. जीवनात कोणताही गैरसमज निर्माण होण्यापूर्वी आपले अंतःकरण गढूळ होते_.
चित्ती वसे l ते स्वप्नी दिसे ll
आपले चित्त जसे असेल तसे
अंतःकरणात भाव निर्माण होतात. त्यामुळे गैरसमज निर्माणच होऊ नये असे वाटत असेल, तर आपल्या चित्ताला शुद्ध ठेवण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असले पाहिजे_.
*चित्त शुद्ध असेल तर जीवनामध्ये कोणताही गैरसमज निर्माण होत नाही, कारण शुद्ध चित्तामध्ये देव वास करत असतो*.
तुका म्हणे चित्त करावे निर्मळ l
येऊनी गोपाळ राहे तेथे ll
विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता l
सकळ भोगीता होय त्यांचे ll
गैरसमजामुळे होणारे नुकसान स्वतः प्रयत्न केल्याशिवाय टाळता येत नाही. साधू आणि संत यांच्या जीवनामध्ये एकही गैरसमज नाही. कोणत्याही संतांचे जीवन चरित्र तपासून पहा, तुम्हाला प्रत्येक जाती-धर्मांच्या साधू आणि संतांमध्ये हे साम्य दिसून येईल. याचे एकच कारण आहे ते म्हणजे
चित्ताची शुद्धता आणि
अंतःकरणाची निर्मलता !
हाच उपाय गैरसमज टाळण्यासाठी करता येतो. तुकोबाराय अशा संतांचे वर्णन करताना म्हणतात,
सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ l
तुका म्हणे जाती पाप दर्शने विश्रांती ll