अंगात आलेली व्यक्ती लोकांच्या प्रश्नांची उत्तरे कशी देते? डॉ .दाभोलकर
अंगात आलेल्या व्यक्तीने ज्यांच्या ज्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली ती सर्व अचूक आली, याचा संख्या शास्त्रीय अभ्यास झालेला नाही. त्यामुळे वरील विधानाला शास्त्रीय आधार नाही. ज्यांना आपल्या प्रश्नांची उत्तरे अचूक आली, असा अनुभव आला आहे त्यांच्या बाबतीत शक्यता (Low of Probability) सिद्धांतानुसार उत्तरे खरी आली असतील.
संख्या शास्त्रात शक्यता सिद्धांत (Low of Probability) आहे. हा सिद्धांत सर्व प्रकारच्या बुवाबाजीत उपयोगी पडतो. नाणे उंच फेकले, तर छाप किंवा काटा वर येतो. इथे छाप येण्याची शक्यता निम्मी ( ५० %) आहे. म्हणजे १०० वेळा नाणे फेकले तर ५० च्या आसपास छाप येईल. किंवा १०० नाणी वर फेकली तर त्यातील ५० नाण्यांच्या बाबतीत छाप येईल. ह्या नियमाचा अंगात आलेल्या व्यक्तीला अगर बुवा मांत्रिकाला कसा कायदा होतो ?
सर्वसाधारणपणे अंगात आलेल्या व्यक्तीला ज्या प्रमाणे उत्तर ‘होय’ किंवा ‘नाही’ असे येईल, असेच प्रश्न विचारले जातात. उदा. मला मुलगा होईल की मुलगी? दोनच शक्यता असतात. त्या व्यक्तीला मुलगा होईल किंवा मुलगी. मुलगा झाला तर आपल्या प्रश्नाचे उत्तर अचूक मिळाले, असा त्या व्यक्तीचा समज होतो. १०० व्यक्तींनी अशा प्रकारचे प्रश्न विचारले तर काही जणांचे अचूक उत्तर मिळणार हे उघड आहे. ज्यांच्या प्रश्नांची उत्तरे बरोबर निघतात ते अंगात आलेल्या व्यक्तीला त्याचे श्रेय देतात. पण अनेक जणांच्या प्रश्नांची उत्तरे चुकीची आलेली असतात. त्यांचे काय? अशा व्यक्ती आपल्या नशिबाला दोष देत गप्प बसतात. म्हणून अंगात आलेली व्यक्ती प्रश्नांची उत्तरे बिनचूक देते, याची शास्त्रीय तपासणी झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवणे चुकीचे होईल. ‘होय’ किंवा ‘नाही’ अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्या ऐवजी अंगात आलेल्या व्यक्तीने दुसऱ्या प्रकारच्या प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजेत. अशा व्यक्तीने चाचणी घेणाऱ्या कार्यकर्त्याच्या खिशातील नोटेचा नंबर ओळखून दाखवावा. एवढ्या एकाच प्रश्नाचे उत्तर अचूक मिळले, तर अंगात आलेल्या व्यक्तीचे सामर्थ्य मान्य करता येईल संदर्भ- डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे
यांनी लिहिलेल्या ‘अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ या पुस्तकातून साभार.
मुंबई
प्रतिनिधी
चक्रधर मेश्राम