विभागीय आयुक्तांकडून मतदार यादी पुनरीक्षणाचा आढावा
ठाणे दि. २३ (जिमाका) : राज्यात दि. १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकवर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक अण्णासाहेब मिसाळ यांनी आज ठाणे जिल्ह्यातील या कार्यक्रमाचा आढावा घेतला.तसेच ठाणे जिल्ह्यात या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबरोबरच मतदार जनजागृती व नोंदणी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर ,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील,उपजिल्हानिवडणूक अधिकारी अर्पणा सोमाणी तसेच ठाणे जिल्ह्यातील १८ विधान सभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी, सहा.मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्त मिसाळ म्हणाले की, मतदार याद्यांमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणी तात्काळ दुर कराव्यात. नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. तसेच मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेली मयत मतदार, दुबार नाव नोंदणी असलेले मतदार व स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही सुद्धा या दरम्यान करणे आवश्यक आहे. ही कार्यवाही करताना योग्य ती शहानिशा केल्यानंतरच मतदारांची नावे वगळावी. मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रमासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्राधान्यक्रमाने कराव्यात अशा सुचनाही त्यांनी यावेळी केली.
स्विप कार्यक्रम आंतर्गत जिल्ह्यात जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त मिसाळ यांनी दिले.
मा.भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विभागीय कोकण आयुक्त यांची मतदार निरिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
यावेळी आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी मतदार यादी, संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आढावा,मतदार छायाचित्र त्रुटी ,मतदारांचे अचुक ओळख पत्र तयार करणे,मतदार वगळणी, मतदार यादीतील तांत्रिक तृटी दुरुस्ती करणे ,भारत निवडणूक आयोगाच्या तक्रार निवारण पोर्टलवर तक्रारीचा आदींचा विषयनिहाय आढावा घेतला.
कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी मंगळवार दि. 15 डिसेंबर 2020 असा आहे. विशेष मोहिमांचा कालावधी दावे व हरकती स्किारण्याचा कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी ,महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार असे आहेत.दावे व हरकती निकालात काढणे यासाठी मंगळवार दि.5 जानेवारी 2021 पर्यंत असा आहे. गुरुवार दि. 14 जानेवारी 2021 पर्यंत प्रारुप मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी करणे आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिध्दी करिता आयोगाची परवानगी घेणे.डेटाबेसचे अदयावतीकरण आणि पुरवणी यादयांची छपाई असा आहे.शुक्रवार दि.15 जानेवारी 2021 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्दी करणे असा आहे.
जिल्ह्यातील रहिवाश्यांनी दि. १५ डिसेंबर, २०२० या पर्यंत खालील प्रमाणे योग्य तो फॉर्म नमुना भरणे. फॉर्म नमूना नं. 6- नव्याने मतदार नोंदणी करणे ,फॉर्म – नमूना नं. 7 मयत मतदार , कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार यांचे मतदार यादीतील नाव वगळणेकामी , फॉर्म – नमूना नं. 8 – मतदार यादीतील नावांची किंवा तपशीलाची दुरुस्ती करणेकरिता ,फॉर्म नमूना नं. 8 अ – मतदार संघामध्ये स्थलांतर झाले असल्यास नाव नोंदणीकरिता भरणे आवश्यक आहे.
संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491