महाराष्ट्र

सर्वांच्या एकत्रित सहभागातून ‘माझी वसुंधरा’ अभियान प्रभावीपणे राबवा – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे. पुणे आणि कोकण विभागातील नियोजनाचा घेतला आढावा

Summary

मुंबई, दि. 3 : लोकप्रतिनिधी, विविध विभाग, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते यांच्यासह लोकसहभागातून ‘माझी वसुंधरा’ हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने राज्यात नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या पुणे आणि कोकण […]

मुंबई, दि. 3 : लोकप्रतिनिधी, विविध विभाग, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते यांच्यासह लोकसहभागातून ‘माझी वसुंधरा’ हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने राज्यात नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या पुणे आणि कोकण विभागातील नियोजनाची माहिती पर्यावरणमंत्री श्री. ठाकरे यांनी दोन्ही विभागातील आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करुन घेतली.

पर्यावरणमंत्री श्री. ठाकरे यांच्यासह पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे हे मंत्रालयातून सहभागी झाले होते.  पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्यासह दोन्ही विभागातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.

पर्यावरणमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, अनियमित पाऊस, ‘निसर्ग’सारखी वादळे ही संकटे हवामानातील बदलामुळे निर्माण झालेली आहेत. अशी संकटे निर्माण होऊ नयेत यासाठी पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा उपाय नाही. त्यामुळे येत्या काळात ‘माझी वसुंधरा’ अभियानातील सर्व घटकांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. याची सुरुवात शासकीय कार्यालयांमधून करण्यात यावी. शासकीय कार्यालयांमधील ऊर्जा वापराचे, पाणी वापराचे लेखापरीक्षण, कचऱ्याचे व्यवस्थापन, साधनसामुग्रीचे व्यवस्थापन, अडगळीतील सामानाचे व्यवस्थापन, कार्यालय परिसरातील वृक्षाच्छादन आदी बाबींवर काम करण्यात यावे. तसेच सर्वांनी आपल्या प्राधान्यक्रमात या अभियानाचा समावेश करावा, असे आवाहनही श्री.ठाकरे यांनी केले.

पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, भावी पिढीला स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि मुबलक ऊर्जा देणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी पर्यावरणाच्या विविध घटकांचे संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. सर्वांनी समन्वयाने ‘माझी वसुंधरा’ अभियान प्रभावीपणे राबवून महाराष्ट्रास पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत अग्रभागी ठेवावे.

पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर म्हणाल्या, स्वच्छता अभियान, जलसंधारण, सौरऊर्जा अशा विविध योजनांच्या अभिसरणातून विविध उपक्रम राबवून ‘माझी वसुंधरा’ अभियानाला गती देण्यात यावी. डीपीडीसी, वित्त आयोग, सीएसआर, सीईआर आदींमधून निधी उपलब्ध करुन विविध उपक्रम राबविता येतील. सर्वांनी प्राधान्यक्रमाने हे अभियान राबवावे, असे आवाहन त्यांनी केले.

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अभियानाच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्या भागात करण्यात आलेले नियोजन आणि प्रस्तावित विविध उपक्रमांची माहिती दिली. अभियानामध्ये स्वयंसेवी संस्था, एनसीसी, एनएसएस यांचा सहभाग घेणे, नद्यांची स्वच्छता करणे, जैवविविधता जपणे, हरितपट्टे तयार करणे, कचऱ्याचे विलगीकरण, सायकल ट्रॅक निर्मिती, देशी झाडांचे रोपण, अर्बन फॉरेस्ट तयार करणे, सायकल शेअरींग, मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण, कांदळवनांचे जतन-संवर्धन, शहरांमधील धूळ कमी करण्याचे नियोजन, गृहनिर्माण सोसायट्यांमधील कचऱ्याचे व्यवस्थापन, नदी, तलाव, नाल्यांचे पुनरुज्जीवन, सिमेंट रस्त्यांजवळील झाडांचे डी-चौकींग करणे  आदी विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.

अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *