BREAKING NEWS:
महाराष्ट्र

शहरातील प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणेमुळे अपघातांचे प्रमाण घटणार – कृषी मंत्री दादाजी भुसे

Summary

मालेगाव, दि. 23 (उमाका वृत्तसेवा) : शहरातील मोसमपुलावरील प्रमुख चौकात उभारण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे शहरातील अपघातांचे प्रमाण कमी होवून वाहतुक व्यवस्था सुरळीत होण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी आज व्यक्त केला.            नगरसेवक ॲड.गिरीश बोरसे यांच्या […]

मालेगावदि23 (उमाका वृत्तसेवा: शहरातील मोसमपुलावरील प्रमुख चौकात उभारण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे शहरातील अपघातांचे प्रमाण कमी होवून वाहतुक व्यवस्था सुरळीत होण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी आज व्यक्त केला.
           नगरसेवक ॲड.गिरीश बोरसे यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या मोसमपूल चौकातील वाहतुक सिग्नलच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी उपमहापौर निलेश आहेर, जिल्हा पोलीस अधिक्षक (ग्रामीण) सचिन पाटील, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, महानगरपालिकेचे आयुक्त दिपक कासार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शान-ए-हिंद निहाल अहमद, माजी महापौर हाजी मोहम्मद युनूस इसा, सखाराम घोडके, मुस्तकीम डिग्नीटी, भिमा भडांगे, नंदकुमार सावंत, एजाज बेग, शफीक अन्सारी, दिपाली वारूळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            मोसमपूल चौकातील सिग्नल यंत्रणा ही शहराच्या वैभवात भर टाकणारी असल्याचे सांगत मंत्री श्री.भुसे म्हणाले, शहरात नव्यानेच राबविण्यात येणाऱ्या यंत्रणेमुळे वाहतुक व्यवस्थेवर सुरवातीला ताण पडेल. येणाऱ्या अनुभवातून यामध्ये आवश्यक त्या सुधारणा देखील करण्यात येतील. यामुळे वाहतुकीला चांगली शिस्त लागेल. सिग्नल यंत्रणेमुळे वाहतुक पोलीसांबरोबर नागरिकांवर देखील मोठी जबाबदारी राहणार आहे. शहरातील या प्रमुख चौकातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी रिंग रोड प्रस्तावित करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. तर रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब व ट्रान्सफार्मर लवकरच स्थलांतरीत करून चौकाचे सुशोभिकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असेही मंत्री श्री.भुसे यावेळी म्हणाले.
           2021 हे वर्ष मालेगावचे विकास वर्ष ठरेल
            शहरात प्रमुख सात ते आठ मुख्य रस्ते असून त्यावर महानगरपालिकेने लक्ष केंद्रीत करावे. या रस्त्यांचा विकास करून नागरिकांना भौतीक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शहराच्या विकासासाठी शासन स्तरावरून भरीव निधी मंजूर करून 2021 हे वर्ष मालेगावचे विकास वर्ष ठरेल असा विश्वासही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.
          कोरोना अजून संपलेला नाही सर्वांनी काळजी घ्यावी
          दिल्ली आणि गुजरात मधील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असून येणाऱ्या महिन्यात राज्यातील जनतेने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनावर मात करण्यासाठी मालेगावकरांनी यापुर्वी चांगले सहकार्य केले असून भविष्यात येणारी कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी प्रत्येकाने सज्ज रहावे. आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करत त्रिसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहनही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले.
        विकास निधीतून राबविण्यात येणारे विविध उपक्रमांची देखभाल व दुरुस्तीसाठी महानगरपालीकेने विशेष तरतूद करण्याचे आवाहन नगरसेवक श्री.बोरसे यांनी प्रास्ताविकात केले. तर पोलीस अधिक्षक (ग्रामीण) सचिन पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, विरोधी पक्षनेत्या शान-ए-हिंद निहाल अहमद, माजी महापौर हाजी मोहम्मद युनूस इसा यांनी मनोगत व्यक्त करून नागरिकांना वाहतुक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *