BREAKING NEWS:
महाराष्ट्र

विद्यार्थी हिताला प्राधान्य द्या – सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम

Summary

पुणे, ६ – राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी समाज कल्याण आयुक्त कार्यालयास भेट दिली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. समाज कल्याण आयुक्तालयामार्फत संपूर्ण राज्यात विविध कल्याणकारी योजना राबविण्यात […]

पुणे, ६ – राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी समाज कल्याण आयुक्त कार्यालयास भेट दिली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

समाज कल्याण आयुक्तालयामार्फत संपूर्ण राज्यात विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. याबाबतचा धावता आढावा राज्यमंत्री कदम यांनी यावेळी घेतला. विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन शिष्यवृत्ती व विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्नाबाबत तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच संपूर्ण कार्यालय परिसराची पाहणी केली. यावेळी संभाव्य नवीन आयुक्तालयाच्या इमारत प्रस्तावाबाबत समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी त्यांना अवगत करून दिले. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याबरोबर चर्चा करून नवीन इमारतीबाबत निर्णय घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आयुक्तालयाच्यावतीने आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे स्वागत केले. याप्रसंगी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, समाज कल्याण चे अतिरिक्त आयुक्त  दिलीप डोके, सह आयुक्त भारत केंद्रे, उपायुक्त प्रशांत चव्हाण, उपायुक्त रवींद्र कदम पाटील, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळुंकी, सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड यांच्यासह समाजकल्याण अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आयुक्तालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.   समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी विविध योजनांची माहिती राज्यमंत्री  विश्वजीत कदम यांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *