महाराष्ट्र

नवउद्योजकांसाठी बिझनेस इन्क्युबेटर सेंटरमध्ये विनामूल्य प्रशिक्षणाची संधी – उद्योगमंत्री सुभाष देसाई उद्योग विभाग आणि कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्क यांच्यात सामंजस्य करार

Summary

जागतिक दर्जाचा बिझनेस ॲक्सिलेटर ‘कॉर्नेल महा ६०’ ची महाराष्ट्रातील उद्योजकांकरिता नवी मुंबई येथे स्थापना  मुंबई, दि. १० : नवउद्योजक आणि स्टार्ट-अप्ससाठी जागतिक दर्जाची सुविधा असलेले बिझनेस इनक्यूबेटर सेंटर नवी मुंबईमध्ये स्थापित होत असून निवड झालेल्या उद्योजकाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, […]

जागतिक दर्जाचा बिझनेस ॲक्सिलेटर ‘कॉर्नेल महा ६०’ ची महाराष्ट्रातील उद्योजकांकरिता नवी मुंबई येथे स्थापना


 मुंबई, दि. १० : नवउद्योजक आणि स्टार्ट-अप्ससाठी जागतिक दर्जाची सुविधा असलेले बिझनेस इनक्यूबेटर सेंटर नवी मुंबईमध्ये स्थापित होत असून निवड झालेल्या उद्योजकाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. उद्योग विभाग आणि कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्क, अमेरिका यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी श्री.देसाई बोलत होते.

 यावेळी उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, प्रधान सचिव (उद्योग) श्री.वेणूगोपाल रेड्डी , महाराष्ट्र उद्योगविकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, ‘कॉर्नेल महा 60’ चे संचालक प्रोफेसर ॲलन, कॉर्नेलचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. डेव्हिन बिगॉनेस आणि एक्सईडी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सिंगापूरचे मिस्टर जॉन कॅलेलिल हे उपस्थित होते.

 श्री. देसाई म्हणाले, राज्य शासनाचे हे मोठे आणि नाविन्यपूर्ण पाऊल आहे. महाराष्ट्रात सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट पायाभूत पूरक वातावरण असलेले देशातील सर्वाधिक औद्योगिकरण असलेले महाराष्ट्र राज्य आहे. राज्यात नवीन तांत्रिक, उच्च कुशल मनुष्यबळ आणि नाविन्यपूर्ण कल्पना असलेले तरुण उद्योजक आहेत.  या बिझनेस अॅक्सिलेटरमुळे महिलांसह अनुसूचित जाती व जमातीतील  तरुणांसह  राज्यातील उद्योजकांच्या प्रारंभिक विकासाला उत्तेजन देणे व त्याच्या व्यवसायाला वेग देणारी यंत्रणा बनविली गेली आहे. एमआयडीसीद्वारे या इनक्यूबेटर केंद्राचा सर्व खर्च उचलण्यात येणार असल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले.

 उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्वाक्षरी समारंभ आयोजित करण्यात आला होता. विकास आयुक्त (उद्योग) डॉ. हर्षदीप कांबळे व पॉल क्राउस, व्हाईस प्रोव्होस्ट, कॉर्नेल विद्यापीठ यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

 अपूर्व व नाविन्यपूर्ण इनक्यूबेटर सेंटरसाठी उद्योग विभागाचे अभिनंदन करून राज्यमंत्री कुमारी तटकरे यांनी या करारामुळे नवीन युगातील उद्योजक निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल, असे मत व्यक्त केले.

 डॉ.हर्षदीप कांबळे म्हणाले, कॉर्नेल हे जगप्रसिद्ध विद्यापीठ प्रथमच अमेरिकेबाहेर अशा प्रकारचे जागतिक दर्जाचा बिझनेस अॅक्सिलेटर स्थापन करीत आहे आणि अशा प्रकारचा भारतातील प्रथम प्रमाणित कोर्स आहे. “कॉर्नेल महा 60” हा कार्यक्रम या एक्सेलेरेटर अंतर्गत चालणार असून तो जवळजवळ वर्षभर निवडक 60 उद्योजकांना प्रशिक्षण देईल आणि त्यांना कॉर्नेल विद्यापीठ यांचेकडून पदविका प्रमाणपत्रासह मूर्त व अमूर्त फायदे प्रदान केले जाणार आहेत.  तसेच त्यांना मार्गदर्शन केले जाईल आणि उद्यम भांडवल निधीसारखी साधने देखील उपलब्ध करुन दिली जातील. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर प्रथम तीन वर्षांसाठी राबवला जाईल. प्रशिक्षणार्थी / उद्योजक संपूर्ण महाराष्ट्रातून निवडले जातील आणि विकास आयुक्त (उद्योग) यांच्या मार्गदर्शनाखाली कॉर्नेल टीमद्वारे त्यांची निवड केली जाईल. उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नॅसकॉम, कौशल्य विकास, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य आदी विभागही या महत्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी होतील.

 व्हाईस प्रोव्होस्ट श्री.पॉल यांनी महाराष्ट्र शासन आणि कॉर्नेल विद्यापीठ यांच्यातील सामंजस्य करार हा स्वाक्षरी सोहळा ऐतिहासिक असल्याचे सांगितले.

 फॅकल्टी डायरेक्टर कॉर्नेल महा 60 प्रो.ॲलन यांनी बऱ्याच वर्षांनी या मास्टर सर्व्हिस करारावर स्वाक्षरी होत असल्याने त्यांना खूप आनंद झाला असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी ‘कॉर्नेल महा ६०’ कार्यक्रमाबाबत दूरदृष्टी व सतत पाठपुरावा केल्याबद्दल विकास आयुक्त, उद्योग डॉ. हर्षदीप कांबळे यांचे विशेष कौतुक केले.

 उद्योग सचिव श्री. वेणूगोपाल रेड्डी यांनी नमूद केले की “कॉर्नेल महा 60” ची पहिली तुकडी मार्च 2021 पासून सुरू होणार आहे.  कॉर्नेल विद्यापीठ, अमेरिका आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील अपूर्व भागिदारी  (path breaking partnership) च्या निमित्ताने  उद्घाटन कार्यक्रमाची योजना आखली जात आहे.

 उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन आणि कॉर्नेल विद्यापीठ, अमेरिका यांनी 10 डिसेंबर 2020 रोजी सामंजस्यकराराद्वारे एक अद्वितीय इंटरनॅशनल बिझनेस अॅक्सिलेटर / इन्क्युबेटर अत्याधुनिक सुविधा असलेल्या “कॉर्नेलमहा 60” कार्यक्रम रिलायन्स आयटी पार्क, नवी मुंबई येथे 13,000 स्क्वे. फूट क्षेत्रावर स्थापन करण्यासाठी स्वाक्षांकित केला आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *