डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनाने थोर समाजसुधारक व आध्यात्मिक मार्गदर्शक हरपले – मंत्री अशोक चव्हाण
Summary
मुंबई, दि. 31 : बंजारा समाजाचे धर्मगुरू, पोहरादेवी संस्थानचे प्रमुख, बालब्रह्मचारी, संत, तपस्वी डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनामुळे थोर समाजसुधारक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक हरपल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त […]
मुंबई, दि. 31 : बंजारा समाजाचे धर्मगुरू, पोहरादेवी संस्थानचे प्रमुख, बालब्रह्मचारी, संत, तपस्वी डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनामुळे थोर समाजसुधारक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक हरपल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करताना श्री. चव्हाण म्हणाले, देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे लाखो अनुयायी असून, ते बंजारा समाजाचे शक्तिस्थान होते. त्यांच्या निधनामुळे आज प्रत्येक वाडी-तांड्यावर शोककळा पसरली आहे. संत सेवालाल महाराज यांचा वारसा त्यांनी समर्थपणे चालवला होता. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, महिला अत्याचार, हुंडाबळी, अनिष्ट प्रथा व रूढींचे उच्चाटन आदींबाबत त्यांनी जनजागरणाचे मोठे कार्य केले. वाडी-तांड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजाची प्रगती करायची असेल तर समाज शिक्षित झाला पाहिजे, त्यांच्यावर नव्या विचारांचे संस्कार झाले पाहिजे, ही भूमिका मांडून त्यांनी शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला व बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. त्यांचे कार्य केवळ बंजारा समाजापुरते मर्यादित नव्हते; तर इतर समाजांसाठीही ते प्रेरणास्थान होते.
डॉ. रामरावजी महाराज यांचे चव्हाण कुटुंबाशी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे, या शब्दांत मंत्री अशोक चव्हाण यांनी डॉ. रामराव महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491