BREAKING NEWS:
महाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना ऑनलाईन अभिवादन करुन लाखो अनुयायांनी सर्वांसमोर ठेवले आदर्श उदाहरण राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आवाहनाला संपूर्ण प्रतिसाद दिल्याबद्दल महापौर व महानगरपालिका आयुक्तांनी मानले अनुयायांचे आभार

Summary

मुंबई, दि. 7 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनी, यंदाच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, दादर स्थित चैत्यभूमी येथे प्रत्यक्ष न येता, ऑनलाईन अभिवादन करुन लाखो अनुयायांनी सर्वांसमोर एक अनोखे उदाहरण ठेवले आहे. शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आवाहनाला संपूर्ण […]

मुंबई, दि. 7 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनी, यंदाच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, दादर स्थित चैत्यभूमी येथे प्रत्यक्ष न येता, ऑनलाईन अभिवादन करुन लाखो अनुयायांनी सर्वांसमोर एक अनोखे उदाहरण ठेवले आहे. शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आवाहनाला संपूर्ण प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांच्यासह महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी देशभरातील अनुयायांचे आभार मानले आहेत.

मुंबईत दादर येथे महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी स्मारक आहे. दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी (६ डिसेंबर) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे देशभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. कोरोना संसर्ग पसरु नये, यासाठी खबरदारी म्हणून यंदा अनुयायांनी चैत्यभूमीवर न येता ऑनलाईन प्रक्षेपणातून अभिवादन करावे, असे आवाहन सातत्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले होते. त्यास अनुयायांनी संपूर्ण प्रतिसाद दिला. चैत्यभूमीसह शिवाजी पार्क परिसरात उसळणारा अनुयायांचा सागर यंदा दिसला नाही.

सरकारने तसेच महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला संपूर्ण प्रतिसाद देऊन अनुयायांनी सर्वांसमोरच अनोखे उदाहरण ठेवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच राष्ट्र, समाज हिताचा विचार करुन त्यास सर्वोच्च प्राथमिकता दिली. त्यांची ही विचारसरणी तंतोतंत पाळत असल्याचे अनुयायांनी एकजुटीने दाखवून दिले आणि शासनाला व बृहन्मुंबई महानगरपालिकेला संपूर्ण सहकार्य केले.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीसह राष्ट्रीय दूरदर्शनचे यूट्यूब चॅनल, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे यूट्यूब, फेसबूक, ट्विटर खात्यांवरुनही चैत्यभूमी येथील शासकीय मानवंदनेसह अभिवादनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यामुळे अनुयायांना आपापल्या घरी राहून चैत्यभूमीचे दर्शन घेणे व अभिवादन करणे शक्य झाले. अनुयायांच्या सहकार्याबद्दल मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, उपआयुक्त (परिमंडळ २) विजय बालमवार, जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी महानगरपालिकेच्यावतीने आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *