कोरोना लसीकरणाचे सूक्ष्म व योग्य नियोजन करावे – पालकमंत्री उदय सामंत
Summary
सिंधुदुर्ग, दि. 08 : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी कोरोनाला पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी शासनाकडून नजिकच्या काळात कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणाबाबतचे सुक्ष्म व योग्य नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित […]
सिंधुदुर्ग, दि. 08 : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी कोरोनाला पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी शासनाकडून नजिकच्या काळात कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणाबाबतचे सुक्ष्म व योग्य नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहीम व कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्र. जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीफे, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले आदी उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, येत्या काळात शासन टप्प्याटप्प्याने कोरोनाची लस देणार आहे. या लसीचे डोस शासनाच्या सूचनेप्रमाणे प्राधान्याने आरोग्यसंबंधित यंत्रणेत काम करणाऱ्या सर्वांना देण्यात येणार आहे. कोरोना लसीकरण हा ज्चलंत विषय असून आरोग्य व संबंधित यंत्रणांनी याकडे काळजीपूर्वक, भान ठेवून व पारदर्शकपणे काम करावे. त्यासाठीचे नियोजनही अगदी अचूक असावे. असे सांगून पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले, जिल्ह्यामध्ये अंदाजे 4 लाख लसींची साठवणूक करण्याची क्षमता आरोग्य यंत्रणेकडे आहे. जिल्ह्यामध्ये 38 प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी लसीकरणासाठीची यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आतापासून कामाला लागावे. कोरोना लस साठवणूक करण्याबरोबरच या लसीच्या वाहतुकीचेही नियोजन करण्यात यावे. लसी टोचण्यासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचारीच्या उपलब्धतेबाबत नियोजन असावे. जिल्ह्यामध्ये कोरोनाची सुरुवात झाल्यापासून कोविड रुग्ण व नॉन कोविड रुग्ण याचीही माहिती तयार करावी.
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासनाने “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम राबविली या मोहिमेअंतर्गत दोन टप्प्यात 100 टक्के सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. त्यामुळे कोरोना व्यतिरिक्त इतर आजाराच्या रुग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळाली. जिल्ह्यामध्ये या सर्वेक्षणाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने झाले यामुळे कोरोनाच्या फैलावाला आवरण्यात यश आले, असे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात असून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु करण्यात येईल. परंतू अजून कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे जनतेने तोंडावर मास्क, सामाजिक अंतर, हात स्वच्छ धुणे ही नियमावली पाळावी. यावेळी पालकमंत्री श्री.सामंत यांनी जिल्ह्यामध्ये महाआवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी 1 लाख 20 हजार इतके अनुदान मिळते. जिल्ह्यामध्ये 1 हजार 573 घरकुल प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यासाठी तालुकानिहाय गट विकास अधिकारी यांच्या स्तरावर कॅम्पचे आयोजन करुन लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्याची कार्यवाही संबंधितांनी करावी. असे आदेश दिले, त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या घराबाबत व इतर समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.