आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्र उपयुक्त ठरतील – कृषी मंत्री दादाजी भुसे मिनिटाला पाच लीटर ऑक्सिजन क्षमतेच्या पाच यंत्राचे लोकार्पण
Summary
मालेगाव,दि. ५(उमाका वृत्तसेवा) : ऑक्सिजनचे महत्त्व कोरोनाने अधोरेखित केले असून ऑक्सिजन केंद्रीत करणारी यंत्रणा ही काळाची गरज झाली आहे. ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्र ही आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त […]
मालेगाव,दि. ५(उमाका वृत्तसेवा) : ऑक्सिजनचे महत्त्व कोरोनाने अधोरेखित केले असून ऑक्सिजन केंद्रीत करणारी यंत्रणा ही काळाची गरज झाली आहे. ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्र ही आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.
सामान्य रुग्णालयात टेमसेक फाऊंडेशन इंटरनॅशनल कंपनी, सिंगापूर यांच्याकडून रत्ना निधी स्वयंसेवी संस्थेमार्फत सामाजिक दायित्व निधीतून प्राप्त झालेल्या पाच ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्राचे लोकार्पण मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी बोलत होते. यावेळी आमदार मौलाना मुफ्ती, उपमहापौर निलेश आहेर, स्थायी समितीचे सभापती राजाराम जाधव, बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, महानगरपालिकेचे आयुक्त दीपक कासार, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. हितेश महाले, डॉ.गौतम शिलवंत, समाजसेवा अधीक्षक विकास लोधे यांच्यासह पदाधिकारी व सामान्य रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रुग्णांना जीवनदान देणाऱ्या ऑक्सिजन यंत्राचे लोकार्पण करतांना समाधान व्यक्त करत मंत्री श्री.भुसे म्हणाले, कोरोनाच्या कालावधीत औद्योगिक वापरासाठी लागणारा ऑक्सिजन राखीव ठेवत रुग्णालयांना पुरवठा करण्यासाठी शासन स्तरावरून विशेष प्रयत्न करण्यात आले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील आरोग्य प्रशासने चांगले योगदान दिले आहे. सामान्य रुग्णालयामार्फत चांगली रुग्णसेवा देताना रुग्णालयाचा परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता नवीन मोठे रुग्णालय प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे सांगत त्यासाठी महानगरपालिकेमार्फत शहराच्या केंद्रभागी जागा उपलब्ध करण्याचे निर्देशही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिले.
शहरातील गरीब नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी सामान्य रुग्णालयाशिवाय पर्याय नसल्याचे सांगताना आमदार मौलाना मुफ्ती म्हणाले, सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून आरोग्य प्रशासनाला बळकट करण्यासोबतच रुग्णालयाचा विस्तार होणे गरजेचे आहे. सामान्य रुग्णालयामार्फत शहरातील नागरिकांना चांगली रुग्णसेवा व सोयी सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सामाजिक दायित्व निधीतून राज्याला 50 यंत्र प्राप्त झाली असून पैकी 5 यंत्र मालेगाव येथील सामान्य रुग्णालयास प्राप्त झाली आहेत. या पाच ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्राची माहिती अतिरीक्त शल्य चिकित्सक डॉ.हितेश महाले यांनी प्रस्तावनेतून दिली. तर आरोग्य प्रशासनाच्या बळकटीकरणासाठी नेहमीच प्रयत्नशिल असलेल्या मंत्री महोदयांसह उपस्थितांचे आभार समाज सेवा अधीक्षक विकास लोधे यांनी मानले.