आरे दूध वितरण केंद्रातून खाद्यपदार्थांच्या रॉयल्टी तत्त्वावर विक्रीबाबत प्रस्ताव सादर करा – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
Summary
मुंबई, दि. 8 : आरे दूध वितरण केंद्रधारकांना दूध विक्रीपासून मिळणारे उत्पन्न अल्प असल्यामुळे त्यांना दुधाबरोबरच अन्य खाद्यपदार्थ रॉयल्टी तत्त्वावर विक्रीची परवानगी मिळण्याबाबत मागणी असून याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागले. त्यासाठी यासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पशुसंवर्धन राज्यमंत्री […]
मुंबई, दि. 8 : आरे दूध वितरण केंद्रधारकांना दूध विक्रीपासून मिळणारे उत्पन्न अल्प असल्यामुळे त्यांना दुधाबरोबरच अन्य खाद्यपदार्थ रॉयल्टी तत्त्वावर विक्रीची परवानगी मिळण्याबाबत मागणी असून याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागले. त्यासाठी यासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. तसेच शासनाच्या दुधाच्या दर्जामध्ये सुधारणा व्हावी यासाठी वितरण केंद्राना भेट देऊन या दुधाचा दर्जा तपासण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
वरळी व आरे डेअरी येथील दूधवितरकांच्या विविध मागण्यांसंदर्भात श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त सुमंत भांगे, उपायुक्त श्रीकांत शिरपूरकर, दूग्ध विकास अवर सचिव राजेश गोविल, दुग्ध महाव्यवस्थापक डी.डी. कुलकर्णी, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले तसेच दूधवितरक केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.
खाद्यपदार्थ विक्रीला मान्यता द्यावी व वितरकांनी याबदल्यात शासनाला रॉयल्टी द्यावी. केंद्र चालकांच्या करारामध्ये वेळोवेळी सुधारणा करुन त्यांना दूध विक्रीचा लाभ द्यावा. दूध वाहतुकीकरिता वितरणासाठी खुली निविदा काढावी. मयत दूध वितरण केंद्र धारकांच्या रक्ताच्या नात्यातील वारसांना केंद्र हस्तांतरित करावी, अशा मागण्या राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी केल्या. त्यावर सकारात्मक विचार करण्याची ग्वाही श्री. भरणे यांनी दिली.
कामगार वसाहतीमधील दूध वितरक कर्मचाऱ्यांच्या वसाहती दुरुस्त करण्याबाबतचा प्रस्ताव सेवानिवृत्त कामगारांची प्रलंबित देणी, निवृत्तीवेतन, भविष्य निर्वाह निधी तसेच अन्य सेवानिवृत्ती लाभाची रक्कम याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे आयुक्त श्री. भांगे यांनी सांगितले.