प्लँचेटच्या सहाय्याने माहिती मिळविता येते. ? प्रश्नांची उत्तरे बरोबर मिळतात हे कसे?
मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. १६ एप्रिल २०२१
एखाद्या व्यक्तीची लाडकी मुलगी वारली आहे. तिच्या आत्म्याला प्लँचेटवर बोलावले आहे. अशा आत्म्याला खालील स्वरुपाचे प्रश्न विचारले जातात.
*बेबी तू सुखी आहेस का?
:-प्लँचेट वस्तू ‘नाही’ अगर ‘होय’ या अक्षरावर फिरेल. हे फिरणे प्लँचेट करणारे ठरवितात. समजा ‘होय’ असे उत्तर आले.
*तू कुठे आहेस?
:-पृथ्वीवरच.
*मुक्ती मिळाली का ?
:-नाही.
अशा उत्तरांना जर आपण बरोबर उत्तरे आली असे समजू लागलो, तर हा वेडेपणा होईल. आत्मा सुखी आहे, की दुःखी आहे, स्वर्गात आहे की नरकात आहे हे कसे तपासता येईल? प्लँचेट करणारे समोरच्या व्यक्तीच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे उत्तरे ठरवितात. ती खरी असल्याचे आपणांस वाटते.
प्लँचेटने अचूक माहिती मिळविता येत असेल व प्रश्नांची बरोबर उत्तरे येत असतील तर खालील प्रकारे त्याचा पडताळा घेता येईल. १० वस्तू १० ठिकाणी आम्ही लपवून ठेवू. प्लँचेट वाल्याने त्या कोणत्या वस्तू आहेत व कोणत्या ठिकाणी आहेत ते मृताम्याला बोलावून ओळखायचे. प्लँचेट करणारे व त्यांचे सहकारी यांच्याशिवाय निरीक्षण समितीतील लोकांना प्लँचेटवर बसवून उत्तरे मागवावी. प्लँचेट करणारे याला तयार होत नाहीत, हा आमचा अनुभव आहे. कारण ज्या प्रश्नांची उत्तरे तपासता येतात, अशा प्रश्नांना दिलेली उत्तरे बिनचूक निघणे अशक्य आहे याची त्यांना खात्री असते.
प्लँचेटने माहिती मिळविणे शक्य असेल तर सरकारने असा प्लँचेट वाला तज्ज्ञ सी आय डी प्रमुखपदी नेमावा. सरकारचा खर्च वाचेल आणि पंजाबमधील अतिरेक्यांची यादी मिळविण्यासाठी एखादा प्लँचेट वाला शासनाच्या मदतीला येऊ शकेल.
(डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या ‘अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ या पुस्तकातून साभार)