शासनाने, समाजाने दुर्लक्षीत केलेला अखंड भारताचा निर्माता महान योध्दा चक्रवर्ती सम्राट अशोक
मुंबई /प्रतिनिधी चक्रधर मेश्राम .दि ६ एप्रिल २०२१
आपल्या प्रजेवर पितृवत प्रेम करणारा सम्राट अशोक कलिंगाच्या एका आलेखात म्हणतो, ‘सर्व माणसे माझी लेकरे आहेत. ज्याप्रमाणे मी माझ्या मुलांचे चांगले व्हावे अशी इच्छा करतो, त्याचप्रमाणे त्यांचे इहलोकी भले व्हावे असे मला वाटते.’ आपल्या अधिका-यांना त्यानी सांगितले, ‘ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आपले मूल प्रेमळ दाईच्या ताब्यात देतो, त्याप्रमाणे माझी प्रजा तुमच्या स्वाधीन केली आहे.’त्यांनी आपल्या निवासस्थाना जवळ एक शिलालेख कोरला होता, त्यावरील मजकूर असा की, ” ज्या कोणाला माझ्याकडून न्याय हवा असेल त्याने ह्या घंटेची दोरी ओढावी”, मी झोपलेला असो किंवा अन्य कोणत्याही कामात गुंग झालेला असो, मी ते काम बाजूला सारून त्याच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी प्रासादाबाहेर हजर होईल.'” त्यांच्या ह्या वाक्यावरून त्यांचे प्रजेवरील प्रेम दिसून येते. अशा राजाची शासन प्रणाली कशी होती? त्याची ओळख होणे आवश्यक आहे. भारतासह संपूर्ण पाकिस्तान, अफगाणिस्तान,व इराण, ताजिकिस्तान, कझागिस्तान चा बराच मोठा भाग. तसेच तिबेट, नेपाळ भूतान, बांगलादेश व म्यानमार वरील त्या काळच्या ज्ञान जगातील सर्वात मोठे जवळपास सात हजार चौरस किलोमीटर्स हूनही अधिक भूभागावरील, आणि ब्रिटिश इंडिया हूनही विस्तारित, आजही जगात विख्यात असलेल्या मौर्य साम्राज्यातील , व जगातील सर्वात प्रभावी सम्राट , लिखित संविधानाचा जगातील सर्वात प्रथम निर्माता, पशू व मानव यांच्यासाठी जगात सर्वात प्रथम आरोग्यसेवा निर्माण करुन, त्यासाठी औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात कायद्याने प्रथम लागवड करणारा, शेती सिंचनासाठी जलव्यवस्थापन करुन, त्यासाठी’ सुदर्श सरोवर ‘नावाचे जगातील पहिले धरण निर्माण करणारा , जगातील पहिले सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण करुन, ताम्रलिप्ती ते तक्षशिला असा तब्बल बावीसशे मैल लांबीचा, तीस फुट रुंदीचा रस्ता जो आजही ” ग्रँड ट्रंक हाय वे “म्हणून ओळखला जातो, अशा महामार्गाची जगात प्रथम निर्मिती करुन, त्यावरुन पायी अथवा घोडागाडी अशा तत्सम वाहनांनी प्रवास करणाऱ्या वाटसरुंना प्रवासात उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून रस्त्याच्या कडेला दुतर्फा ठराविक अंतरावर सावली व फळे देणारे वड , पिंपळ, कडुनिंब, आंबा , चिंच अशी हजारो झाडे लावून, दर अर्ध्या कोसावर पिण्यासाठी पाण्याच्या विहिरी जगात सर्वप्रथम खोदणारा, रात्रीच्या मुक्कामासाठी वाटसरुंसाठी जगात सर्वप्रथम सराया बांधणारा, स्वत:ची मुलगी संघमित्रा हिस भिक्खूनी म्हणून प्रथमच परदेशात पाठवून, तिच्यावर धम्म प्रसारासारखी अतिमहत्त्वाची जबाबदारी सोपवून, महिला सक्षमीकरणाची सुरुवात जगात सर्वप्रथम करणारा, जगातील सर्वात मोठे , व तेहतीस खाती असलेले व पाचशे मंत्र्यांचा समावेश असलेले मंत्रीमंडळ स्वत:च्या राजदरबारात असणारा, रणविजय सोडून धम्म विजय करणारा, सैन्य अमात्यांऐवजी जगात धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘धम्ममहामात्य ‘ जगात सर्व प्रथम पाठवणारा , आणि ‘ धम्मदायाद ‘ म्हणून शेवटी अंगावर तथागताचा वारसा चालविणारे काषायवस्त्र परिधान करुन, राजपद त्यागून सर्वसामान्य भिक्खूंप्रमाणे ‘ भंते मेघंकर प्रियदर्शी ‘ म्हणूनच उर्वरित आयुष्य धम्मप्रसारात व्यतित करुन भारताताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात आपल्या परम कर्तृत्वाने आढळपद मिळविणारा एकमेव चक्रवर्ती सम्राट प्रियदर्शी अशोक.
चक्रवर्ती सम्राट अशोक हा एक व्यक्ती, संगठना, राज्य किंवा देशापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण मानवजातीचा ठेवा आहे. आणि हा ठेवा जपणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. ज्या सम्राट अशोकाचे चक्र राष्ट्र ध्वजावर घेतले. सम्राट अशोकाचे ” सत्यमेव जयते ” हे ब्रीद वाक्य म्हणून देशाने स्वीकारले .सम्राट अशोकाची चार सिंहाची प्रतीमा देशाची मुद्रा म्हणून स्विकारली.
ज्या राजाला देशाचा सर्वोत्तम तथा सर्वश्रेष्ठ राजा म्हणून मानले जाते.सम्राट अशोकामुळे भारताला जगात नावलौकिक प्राप्त झाले. अशोकामुळे सबंध विश्व भारताला अशोकाचा भारत म्हणून ओळखते.ज्याच्या नावाने देशात सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र दिल्या जाते.
सम्राटाचे राज्य पाकीस्तान, अफगानिस्थान, ईरान , भूतान ,बांग्लादेशापर्यंत पसरलेले होते. ज्या सम्राटामुळे भारताला जम्बूदीप भारत म्हणून ओळख प्राप्त झाली. ज्यांनी सुवर्णमय भारत निर्माण निर्माण केला. आणि भारतात ज्यांच्या काळात सोन्याचा धूर निघत होता.
ज्यांच्या काळात भारतात साक्षरतेचे प्रमाण 80 % होते.
अशोकाच्या काळात भारताचा विकासाचा दर 32.5 % होता. ( आता भारताचा विकास दर 7% ते 9% दरम्यान आहे तर अमेरिकेचा 14% ते 20 % दरम्यान आहे.) सम्राट अशोकाच्या काळात भारत जागतिक महासत्ता होती.ज्या सम्राटामुळे भारतीय बौद्ध धम्म विश्व धर्म बनला. ज्यांच्यां शासन काळात मानव – प्राणी – पर्यावरण यांच्या विकासाला व संरक्षणाला प्राधान्यक्रम दिला जात होता.
ज्या महान अशोकाला सबंध जग देवानांप्रिय प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट म्हणून ओळखतात. त्या महान सम्राट अशोकाची जयंती भारतात का साजरी होत नाही ?मौर्य शासकांचे तथा सम्राट अशोकाच्या जयंतीचे विस्मरण शासनाला व भारतीय जनतेला म्हणजेच आम्हाला का पडावे?
आणि म्हणूनच मित्रांनो , प्रियदर्शी सम्राट अशोकाची जयंती चैत्र शुक्ल अशोकअष्टमीला म्हणजेच 20 एप्रिल 2021 रोजी मोठया प्रमाणावर भारतभर मोठ्या हर्षोल्लासात साजरी करावी आणि येणाऱ्या काळात शासनस्तरावर सुद्धा आपण जयंती साजरी झाली पाहिजे .
महान योध्दा चक्रवर्ती देवांनाप्रिय प्रियदर्शि सम्राट अशोक यांच्या जयंती शासन स्तरावर सर्व ठिकाणी साजरी केली पाहिजे असे मत राहुल भालेराव यांनी व्यक्त केले आहे.