BREAKING NEWS:
महाराष्ट्र

‘जेंडर आयडेंटिटी’पेक्षा काम महत्त्वाचे : तृतीयपंथी अंजली पाटील न्यायालयापर्यंत धाव घेऊन ग्रामस्थांना जिंकले…ठरल्या पहिल्या तृतीयपंथी लोकप्रतिनिधी हिनाकौसर खान-पिंजार 22 Jan 2021

Summary

गावगाड्याचा कारभारी ठरवण्यासाठी 15 जानेवारी 2021ला महाराष्ट्रातल्या 12711 ग्रामपंचायतींमध्ये मतदान झालं आणि 18 जानेवारी 2021 रोजी या निवडणुकीसाठीची मतमोजणी होऊन निकाल हाती आला. या निकालात शिवसेना 3113 ग्रामपंचायती जिंकून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे… तर भाजप 2632 ग्रामपंचायती जिंकून दुसऱ्या […]

गावगाड्याचा कारभारी ठरवण्यासाठी 15 जानेवारी 2021ला महाराष्ट्रातल्या 12711 ग्रामपंचायतींमध्ये मतदान झालं आणि 18 जानेवारी 2021 रोजी या निवडणुकीसाठीची मतमोजणी होऊन निकाल हाती आला. या निकालात शिवसेना 3113 ग्रामपंचायती जिंकून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे… तर भाजप 2632 ग्रामपंचायती जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे…राष्ट्रवादी काँग्रेसने 2400 तर काँग्रेसने 1823 ग्रामपंचायती जिंकल्या. राज्यात अपक्ष उमेदवारांचा बोलबाला राहिला. तब्बल 2344 ग्रामपंचायती अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या. प्रस्थापितांना धक्का आणि नवोदितांना संधी अशी ही निवडणूक ठरली. या निवडणुकीत लोकशाहीवरचा विश्वास दृढ करणारी एक घटना घडली. ती म्हणजे उमेदवारीसाठी न्यायालयात जाऊन झगडावे लागणाऱ्या एका तृतीयपंथी व्यक्तीचा विजय!

जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक गावात वंचित बहुजन आघाडीकडून उभ्या असलेल्या तृतीयपंथी उमदेवार अंजली पाटील यांचा तर उमेदवारी अर्जही बाद ठरवला होता. तृतीयपंथी व्यक्ती महिला राखीवमधून अर्जच करू शकत नाहीत म्हणत विरोधकांनीही कांगावा केला. उमेदवारीच नसेल तर निवडणूक कसली… पण त्यांनी हार न मानता कोर्टापर्यंत जाऊन लढा दिला. आपला अर्ज वैध ठरवला आणि भादली गावकर्‍यांनीही त्यांच्यावर विश्‍वास टाकून लढ्याचे चीज केले.

या विजयामुळे 42वर्षीय अंजली पाटील जळगाव जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथी विजेत्या उमेदवार ठरल्या आहेत. यापूर्वी 2017मध्ये अशीच एक सकारात्मक घटना घडली होती. सोलापूर जिल्ह्यातील तरंगफळ गावात तृतीयपंथी समाजातल्या ज्ञानेश्‍वर उर्फ माउली कांबळे यांची सरपंचपदी निवड झाली होती. ते राज्यातले पहिले तृतीयपंथी सरपंच ठरले. लैंगिक अल्पसंख्य असणार्‍या व्यक्तींसाठी या सकारात्मक घटना घडत असल्या तरी संघर्षमय आयुष्य जगत असलेल्या अंजली पाटील यांच्या विजयाचा मार्गही सुकर नव्हता. गावगाड्यातून संघर्ष करत न्यायालयापर्यंत त्यांना धाव घ्यावी लागली आहे…!

अंजली पाटील यांचा जन्म जळगाव तालुक्यातल्या भादली या गावचा. पटेल बिरादरीतून येणार्‍या अंजली यांच्या घरची स्थिती सर्वसाधारण अशी होती. त्यांच्या कुटुंबात आईवडील, दोन बहिणी, एक भाऊ आहेत. घरातले मोठे अपत्य म्हणून त्यांनी अगदी लहानपणापासूनच घराची जबाबदारी अंगावर घेतली. घर चालवण्यासाठी कमवण्याची गरज अधिक होती. त्यातूनच चौथी-पाचवीनंतरचे त्यांचे शिक्षण सुटले. मग लहानपणीच पडेल ते काम त्या करू लागल्या. कधी कुणाच्या शेतावर जाऊन मजूरी कर तर कधी शेळ्यामेंढ्या चरायला ने. पैशाची गरज असल्याने गावात कुणाला कशाची मदत हवी असेल तर तीही कामे कर. एकीकडे अडनिड्या वयात जगण्याचा संघर्ष सुरू होता तर दुसरीकडे स्वतःच्या वेगळ्या लैंगिक ओळखीची जाणीव व्हायला सुरुवात झाली होती. वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षीच अंजली यांना स्वतःच्या ‘ट्रान्सजेंडर’ असण्याची ओळख पटू लागली होती. अर्थात ती उमजण्याइतकी समज तेव्हा नव्हती… मात्र त्याच काळात जळगावमधील तृतीयपंथी समूहाच्या संपर्कात त्या आल्या होत्या.

सुदैवाने त्यांच्या या नव्या ओळखीसाठी त्यांना कौटुंबिक पातळीवर संघर्ष करावा लागला नाही. आईवडिलांनी, बहीणभावांनी त्यांना झिडकारले नाही, ना त्यांच्या नव्या लैंगिक जाणिवेचा अस्वीकार केला. गाव आणि समाज पातळीवर मात्र अंजली यांना तृतीयपंथी व्यक्तीसारखाच संघर्ष वाट्याला आला. सुरुवातीला समाजाकडून हेटाळणी होत राहिली. शिवाय स्वतःचा तृतीयपंथी स्वीकार केल्याने अर्थार्जनाच्या वाटाही खुंटल्या. भिक्षुकी करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरला नाही. एके काळी त्यांनीही रेल्वेस्टेशनवर लोकांपुढे टाळ्या वाजवून हात पसरले आहेत… पण अशा तर्‍हेने लोकांपुढे हात पसरत राहणे त्यांच्या मानी स्वभावाला पटत नव्हते. आपण फुकट आयुष्य घालवण्यापेक्षा काही काम करावे, लोकांची मदत करावी असे त्यांना खूप वाटत होते.

त्याच सुमारास एचआयव्हीसंदर्भात जनजागृती करणार्‍या एका एनजीओशी त्यांचा परिचय झाला. त्या संस्थेत त्या स्वयंसेवक म्हणून काम करू लागल्या. एचआयव्हीविषयी माहिती देणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी याविषयी संवाद साधणे, काँडोमविषयी माहिती देणे, वेश्यावस्तीत जगजागृती करणे या तर्‍हेचे काम त्या करू लागल्या. यातून लोकांशी संपर्क-संवाद करण्याच्या त्यांच्या उपजत कौशल्याला धार मिळाली. डॉ.उज्ज्वल पाटील मेडिकल कॉलेजशी आणि त्याच कॉलेजच्या गोदावरी या चॅरिटेबल हॉस्पिटलशी ही एनजीओ संबंधित होती.

एनजीओसोबत काम करत असतानाच प्रशासकीय कामासाठी मेडिकल कॉलेजमध्ये व हॉस्पिटलमध्ये अंजली यांना जावे लागे. त्यातून तिथल्याही ओळखी वाढल्या. या ओळखींची मदत आपल्या ग्रामस्थांना व्हायला हवी असे त्यांना वाटू लागले. त्यातूनच मग त्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार मिळवून देऊ लागल्या. विविध मोफत योजनांद्वारे इतर ग्रामस्थांसाठी वैद्यकीय मदत मिळवू लागल्या. शासकीय रुग्णालयातही ओळखी वाढवून ग्रामस्थांच्या आरोग्यविषयक गरजांसाठी मदत करू लागल्या. यातून लोकांचा विश्‍वास संपादित झाला. या अनुभवाने त्यांची स्वतःची जडणघडणही समृद्ध होऊ लागली.

…मात्र आपण लोकांना मदत करतोय, लोकांच्या अडीअडचणींत धावून जातोय तरीही गाव आहे तिथेच आहे, हे निरीक्षण अंजली यांना अस्वस्थ करू लागले. रस्ते, पाणी, वीज कशातच सुधारणा नाही. गटारे तुंबलेली. अंगणवाडी दुर्लक्षित. मग या सगळ्यांवर काम करणारी संस्था म्हणजे ग्रामपंचायत… म्हणजे ग्रामपंचायतीत शिरले की याही प्रश्‍नांवर काम करता येईल, हे अंजली पाटील यांच्या लक्षात आले… पण स्थानिक पातळीवरचे राजकारण हे लिंगाधिष्ठित असणार… शिवाय तिथे राजकीय कुरघोडी असणार. हे सर्व ठाऊक असूनही 2016मध्ये त्या निवडणुकीला उभ्या राहिल्या. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तरी तो अवघ्या 11 मतांनी झाल्याने त्यांना ग्रामस्थांचा कौल लक्षात आला होता. पराभवानंतरही त्यांनी पूर्वीसारखेच काम सुरू ठेवले. वेगवेगळ्या स्तरांवर गावकऱ्यांना मदत करण्याचा विडा त्यांनी कायमच उचलला.

मग या वर्षी त्या पुन्हा निवडणुकीला उभ्या राहिल्या. त्यांनी सुरुवातीला प्रस्थापित पक्षांकडे उमेदवारी अर्जाची मागणी केली… मात्र तृतीयपंथी या त्यांच्या ओळखीमुळे त्यांना नकारघंटा मिळाली. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी अर्ज मागितला आणि तो त्यांना मिळालाही. भादली गावातला वॉर्डक्रमांक 4 हा सर्वसाधरण महिलांसाठी राखीव होता. त्या वॉर्डातून अंजली यांनी पहिल्याच दिवशी अर्ज केला… मात्र निवडणूक अधिकर्‍यांनी त्यांचा अर्ज अवैध असल्याचे म्हटले. अंजली पाटील या तृतीयपंथी म्हणजे लिंगओळख ‘इतर’ किंवा जन्माने असणारी पुरुष अशी समजूत असल्याने त्यांना महिला राखीव गटातून अर्ज करता येणार नसल्याचे निवडणूक अधिकर्‍यांनी सांगितले. विरुद्ध गटानेही या गोष्टीचे राजकारण करण्यास सुरुवात केली.

निवडणूक अधिकार्‍यांची ही भूमिका ऐकून सुरुवातीला अंजली यांना धक्का बसला. त्या वेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील यांच्याशी संपर्क केला. शमिभा पाटील त्या वेळी भादलीपासून 60 किलोमीटरवरच्या फैजपूर गावात होत्या. त्या तातडीने भादली गावी उपस्थित झाल्या आणि त्यांनी तहसीलदारांशी व अधिकार्‍यांशी संवाद साधला. मतदान यादीत त्यांची नोंद ‘इतर’ म्हणून केलेली होती… मात्र आधारकार्डावर व मतदानकार्डावर अंजली पाटील यांची ओळख ‘महिला’ म्हणूनच आहे, असे असतानाही अधिकारी ते पुरावे ग्राह्य मानत नव्हते. शेवटी शमिभा यांनी अधिकार्‍यांना महिला गटातून तृतीयपंथी व्यक्ती निवडणूक लढवत नसल्याचा अधिनियम आहे का असा सवालही केला… मात्र कशाचाच परिणाम झाला नाही.

शेवटी अधिकार्‍यांशी हुज्जत न घालता अंजली पाटील व शमिभा पाटील यांनी त्यांच्या वकीलमित्रांची मदत घेऊन औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल केली. नाल्सा कमिशनने दिलेला निकाल, तृतीयपंथी उमेदवारांचा अधिकार आणि शासकीय-प्रशासकीय स्तरावर तृतीयपंथीयांना महिला म्हणून ग्राह्य धरावे असे महिला कमशिनचे पत्रक, हे तीन पुरावे त्यांनी खंडपीठाला सादर केले… शिवाय 2019चा ट्रान्सजेंडरसंबंधित आलेला कायदा या गोष्टींमुळे खंडपीठाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि खंडपीठाने अंजली यांचा अर्ज वैध असल्याचे घोषित केले. यानंतर अंजली पाटील, शमिभा पाटील यांनी व त्यांच्या इतर आठदहा कार्यकर्त्यांनी मिळून प्रचाराची धुरा सांभाळली आणि अंजली पाटील या 560 मते मिळवून विजयी ठरल्या. भादलीच्या इतिहासात तृतीयपंथी विजेत्या तर ठरल्याच… शिवाय यापूर्वीच्या निवडणुकीत विजेत्या उमेदवाराने कधी पाचशेचा आकडाही गाठलेला नव्हता. तो आकडा पार करण्याची कामगिरीदेखील अंजली यांनी केली आहे.

एक तृतीयपंथी व्यक्ती म्हणून अजंली पाटील यांना बरीच हेटाळणी सहन करावी लागली आहे. उपेक्षित आणि अपमानितही व्हावे लागले आहे… मात्र या कशालाच घाबरून न जाता त्या सक्षमपणे उभ्या राहिल्या. संघर्ष करून त्यांनी एक पाऊल पुढे उचलले आहे. निवडणुकीत जी व्यक्ती स्वतःच्या हक्कासाठी कोर्टात जाऊ शकते ती गावकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नक्कीच उभी राहू शकते असा विश्वास त्यांनी गावात कमवला आहे. या यशातून पुढची दिशा ठरवताना त्या जे म्हणतात ते फार महत्त्वाचे आहे…

‘लोकांच्या प्रेमामुळं आपण जिंकून आलोय आणि आता त्यांचा विश्‍वास सार्थ ठरवायचा आहे. लोकांसाठी चांगले रस्ते, पाण्याची सोय या गोष्टी करायच्या आहेत. अंगणवाडीचं रूपडं बदलून डिजिटलायझेशन करायचं आहे. महिलांसाठी पाच रुपयांत सॅनटिरी नॅपकिन्स उपलब्ध करून द्यायचे आहेत आणि गावातल्या तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. लोकशाहीवर मी विश्‍वास टाकला आणि लोकांनी माझ्यावर. आजवर स्थानिक राजकारण हे ‘जेंडर आयडेंटिटी’तून घडत आलंय, पण काम करणारी व्यक्ती ग्रामस्थांना आता महत्त्वाची वाटते हे उघड आहे.’

सचिन सावंत
मंगळवेढा
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *