BREAKING NEWS:
महाराष्ट्र

नागपूर महापालिकेसाठी १७३.५०० दलघमी पाणी आरक्षित करा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

Summary

नागपूर दि. 21 : पाणी आरक्षणासाठी झालेल्या आजच्या बैठकीमध्ये नागपूर महानगर पालिका क्षेत्रासाठी यावर्षी 173.500 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.  नागपूर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील विविध बिगर सिंचन पाणी वापर संस्थेच्या आरक्षणावर आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. यामध्ये […]

नागपूर दि. 21 : पाणी आरक्षणासाठी झालेल्या आजच्या बैठकीमध्ये नागपूर महानगर पालिका क्षेत्रासाठी यावर्षी 173.500 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.

 नागपूर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील विविध बिगर सिंचन पाणी वापर संस्थेच्या आरक्षणावर आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. यामध्ये नागपूर महानगरपालिकेने सन 2020-21 करिता पेंच प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या तोतलाडोह येथून 173.500 दलघमी पाण्याची मागणी केली होती. या बैठकीमध्ये या मागणीला मंजुरी देत असल्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 पाटबंधारे प्रकल्पाच्या जलाशयातील पिण्याचे पाणी आरक्षित करण्याकरिता पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन् बी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नागपूरचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे यांच्यासह महानगरपालिका व विविध संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.

 नागपूर जिल्ह्यामध्ये 5 मोठे प्रकल्प व 12 मध्यम प्रकल्प तसेच 60 लघु प्रकल्प असे एकूण 77 प्रकल्प आहेत. यावर्षी मुबलक पाणी सर्व प्रकल्पांमध्ये आहे. त्यामुळे मागणी केल्याप्रमाणे पुरवठा करता येईल का अशी विचारणा या वेळी पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला केली.

 यावेळी अधीक्षक अभियंता जयंत गवळी यांनी सध्या जिल्ह्यातील 77 प्रकल्पाचा 1777.73 दलघमी प्रकल्पीय साठ्यापैकी (एकूण क्षमतेपैकी) मोठ्या पाच प्रकल्पांमध्ये 1277.30 दलघमी, बारा मध्यम प्रकल्पामध्ये 160.05 दलघमी, साठ लघु प्रकल्पामध्ये 127.05 दलघमी असे एकूण 1564.4 दलघमी पाणी उपलब्ध आहे. उपलब्ध पाण्याची टक्केवारी 89.56 टक्के असल्याची माहिती दिली.

 घरगुती व औद्योगिक दोन्ही मिळून नोव्हेंबर 2020 ते जून 2021 पर्यंत जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पातून 151.41 दलघमी मध्यम प्रकल्पातून 19.42 दलघमी व लघु प्रकल्पातून 3.29 दलघमी तसेच नदीवरून असणाऱ्या पाणीपुरवठ्याची मागणी 56.175 दलघमी आहे. घरगुती व औद्योगिक पाणी मागणीच्या तुलनेत मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे संस्थानिहाय सर्व पाणी आरक्षण मंजूर करण्याबाबत पाटबंधारे विभागाने तयारी दर्शवली होती. त्यामुळे मागणीप्रमाणे पाणीपुरवठा यावर्षी केला जाणार आहे.

 आजच्या बैठकीमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर घेत पालकमंत्र्यांकडून तातडीने या मागणीला मान्यता देण्या आली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *