ऊर्जानगर वसाहत येथे चक्रवर्ती अशोक, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारोह उत्साहात संपन्न

दिनांक : १४ एप्रिल २०२५
स्थळ : उर्जानगर, चंद्रपूर
१४ एप्रिल २०२५ रोजी उर्जानगर येथे “चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारोह” उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, उर्जानगर, चंद्रपूर यांच्यावतीने करण्यात आले.
दिनांक १० एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. १० एप्रिल रोजी लहान मुलांसाठी वक्तृत्व, चित्रकला, निबंध, हस्ताक्षर आणि वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ११ एप्रिल रोजी स्लो सायकल आणि धावण्याच्या शर्यतींसह क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. त्याच दिवशी विशेष व्याख्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते. अॅडव्होकेट भूपेंद्र रायपुरे यांनी “चक्रवर्ती सम्राट अशोक : आधुनिक भारतासाठी प्रेरणा” या विषयावर मार्गदर्शन केले, तर प्रवीण दादा देशमुख यांनी “महात्मा फुले यांचा जीवन संघर्ष आणि आपली जबाबदारी” या विषयावर सखोल विवेचन केले.
१२ एप्रिल रोजी महिलांसाठी रांगोळी, पुष्प सजावट व पाककला स्पर्धा घेण्यात आल्या. त्याच दिवशी लहान मुलांच्या महापुरुषांवर व समाजसुधारकांच्या वेशभूषा सादरीकरणाची स्पर्धा पार पडली, सायंकाळी “रमाई” आणि “व्हय मी सावित्री बोलते” या एकपात्री नाट्यप्रयोगांनी प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. 13 एप्रिल ला Run For Equality या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन झाले. यानंतर विद्यार्थ्यांसाठी १२ तास अभ्यास उपक्रम राबविण्यात आला आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभ्यासातून मानवंदना घेण्यात आली .
१३ एप्रिल रोजी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण झाले आणि बुद्ध-भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला.
१४ एप्रिल रोजीच्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात धम्म ध्वजारोहनाने झाली. यावेळी समता सैनिक दलातर्फे विशेष मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्याम राठोड, उपमुख्य अभियंता, महा औष्णिक वीज केंद्र, चंद्रपूर होते. उद्घाटन मा. नितीन रोकडे, उपमुख्य अभियंता यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. अशोक उमरे, उपमुख्य अभियंता; मा. संजय हिरवे, अधीक्षक अभियंता; मा. महेश पराते, अधीक्षक अभियंता; मा. के. के. मेश्राम, अधीक्षक अभियंता; मा. शीलरत्न गोंगले, वरिष्ठ व्यवस्थापक, सुरक्षा; आणि डॉ. संगीता बोधलकर, वैद्यकीय अधीक्षिका उपस्थित होते.
मुख्य व्याख्याते प्रा. रत्नाकर शिरसाट यांनी “शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि आपली जबाबदारी” या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर उर्जानगर वसाहतीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या समारोपानंतर धम्म ध्वजासमोर सामूहिक बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी समितीचे अध्यक्ष मा. निलेश भोंगाडे यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी समितीचे सचिव मा. मंदार वंजारी, सहकार्याध्यक्ष शर्मिला मुनघाटे, उपाध्यक्ष हेमंत पवार, कोषाध्यक्ष मनीष पाटील, सहसचिव सुनील काटकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
संयुक्त जयंती सप्ताहाच्या आयोजनामुळे सामाजिक एकोपा, विचारशीलता व प्रबोधन यांचा प्रभावी प्रसार झाला असून, समितीने वर्षभर समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे .