कर्जत व जामखेड तालुक्यातील रस्त्यांची तात्काळ पूर्ण करावी – सभापती प्रा.राम शिंदे

वन विभागासह संबंधित विभागाच्या परवानग्या तातडीने घ्याव्यात
मुंबई, दि. १७ : जामखेड – कर्जत – श्रीगोंदा राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी तसेच कर्जत व जामखेड तालुक्यातील राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग संदर्भातील सर्व प्रलंबित रस्त्यांची कामे, दुरूस्ती कामे मार्च २०२५ अखेरपर्यंत तातडीने पूर्ण करण्यात यावीत. वन विभागाकडून प्राप्त करावयाच्या आवश्यक परवानग्या विनाविलंब प्राप्त करण्यात याव्यात. वाहतूक व दळणवळण संदर्भात रहिवाशांची, प्रवाशांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश विधानपरिषदचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.
विधानभवन येथील दालनात कर्जत-जामखेड (जि.अहिल्यानगर) मधील सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, वन विभाग यांच्या अधिकाऱ्यांची प्रलंबित कामांसंदर्भातील आढावा बैठक झाली. त्यावेळी विधानपरिषदचे सभापती प्रा.राम शिंदे बोलत होते.
तुकाई उपसा सिंचन योजना व श्रीगोंदा-वालवड-जामखेड राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी व कर्जत व जामखेड तालुक्यातील राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची कामे यासंदर्भात वन विभागाकडून प्राप्त करावयाच्या आवश्यक परवानग्या विनाविलंब प्राप्त करण्यात याव्यात. या संदर्भात विलंब झाल्यास त्याबाबतची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करून कारवाई केली जाईल. यासंदर्भात पुढील बैठक वनमंत्री यांचेसमवेत घेण्यात येणार असल्याचेही सभापती प्रा. शिंदे यांनी सांगितले.
अढळगाव ते जामखेड, रांजनगाव ते उखलगाव, श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी श्रीगोंदा, देऊळगाव, मांडवगणरस्ता, न्हावरा-इनामगांव-काष्टी-श्रीगोंदा-जामखेड रस्ता, मौजे डोकेवाडी, भावडी, बिकटकेवाडी, माळवाडी, वालवड व सुपे (जि. अहिल्यानगर) येथील वनविभागालगत व वनविभागात असणाऱ्या रस्त्यांची दुरूस्ती, अढळगाव ते जामखेड,नेटकेवाडी-कुंभेफळ-अळसुंदे या रस्त्यांची कामे, दुरूस्ती मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याबाबतचे आदेश सभापती प्रा. शिंदे यांनी दिले.
बैठकीस अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ.व्ही.बेन, उप वन संरक्षक तुषार चव्हाण, वन्यजीव पुणे साल विठ्ठल, विभागीय वन अधिकारी, अहिल्यानगर, अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे, उपविभागीय अभियंता शशिकांत सुतार उपस्थित होते.
0000