जलालखेडा-कोंढाळीचे अप्पर तहसील कार्यालय कधी करणार ? सलील देशमुखांचे चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र
नागपूर, प्रतिनीधी
या भागाचे आमदार असतांना अनिल देशमुख यांनी तत्कालीन महसुल मंत्री यांना नरखेड तालुक्यातील जलालखेडा व काटोल तालुक्यातील कोंढाळी येथे अप्पर तहसील कार्यालय करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महसुल विभागाने जिल्हाधीकारी यांना तसा प्रस्ताव तयार करण्याची मागणी केली होती. यावरुन हा प्रस्ताव तयार करुन तो शासनाला सादर करण्यात आला आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी देवून जलालखेडा व कोंढाळी येथील अप्पर तहसील कार्यालय कधी करणार ? असा प्रश्न उपस्थीत करीत या दोन्ही ठिकाणच्या अप्पर तहसील कार्यालय मंजुरी द्यावी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सलील देशमुख यांनी महसुल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहुन केली आहे.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने नरखेड व काटोल तालुका हा फार लांब होत असल्याने याचा पर्याय म्हणुन जलालखेडा व कोंढाळी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरु करण्याची नागरीकांकडुन मागणी होत होती. यावरुन या भागाचे आमदार असतांना अनिल देशमुख यांनी 19 जानेवारी 2023 ला तत्कालीन महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहले होते. यासंदर्भात अनिल देशमुख यांनी विधानसभेत सुध्दा हा मुद्दा उचलला होता. यानंतर दोन्ही ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय करण्यासाठी जिल्हाधीकारी, नागपूर यांना प्रस्ताव मागीतला होता. त्यानुसार तसा प्रस्ताव तयार करुन जिल्हाधीकारी यांनी शासनाला पाठविला आहे. तेव्हापासुन याचा पाठपुरावा हा मंत्रालय स्तरावर करण्यात येत आहे. यासाठी मी स्वत: तत्कालीन महसुन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची अनेक वेळा भेट घेतली होती अशी माहिती सुध्दा सलील देशमुख यांनी दिली.
जर हे दोन्ही अप्पर तहसील कार्यालय झाले तर याचा फायदा हा मोठा प्रकरणात शेतकरी, विद्यार्थी व सामान्य नागरीकांना होणार आहे. त्याचा पैसा आणि वेळ सुध्दा वाचणार आहे यासाठीच अप्पर तहसील कार्यालयाची मागणी पुढे आली होती. मंत्रालय स्तरावर हा प्रस्ताव गेल्या अनेक दिवसापासुन धुळखात पडलेला आहे. आता हा विभाग चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच असल्याने आणि ते या जिल्हाचे पालकमंत्री असल्याने त्यांनी यात लक्ष देवून जलालखेडा व कोंढाळी येथील अप्पर तहसील कार्यालयास मंजुरी द्यावी अशी मागणी सुध्दा सलील देशमुख यांनी केली. फोटो ओळ – तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देतांना सलील देशमुख