काळी पिवळी मीटर टॅक्सी व ऑटो रिक्षा भाडे दरात वाढ करण्यास मान्यता भाडेदर १ फेब्रुवारी २०२५ पासून लागू

मुंबईत, दि. २८: मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजीच्या बैठकीत काळी पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) भाडेदर सुधारणा करण्यात आली होती. त्यानंतर वाहनाची सरासरी किंमत, ग्राहक निर्देशांक, वाहन कर्जाचा व्याजदर आदी मध्ये वाढ झाल्यामुळे प्राधिकरणाने काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षांचे भाडेदरवाढ करण्यास राज्य परिवहन प्रकरणाच्या 23 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे.
भाडेदर सुधारणा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रातील सर्व काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) यांना लागू राहील. भाडेदर सुधारणा १ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होईल.
जे टॅक्सी व ऑटोरिक्षा परवानाधारक सुधारीत भाडेदरानुसार भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन करून घेतील. त्या ऑटोरिक्षा, टॅक्सीना ही भाडेवाढ लागू होईल. भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन दिनांक १ फेब्रुवारी २०२५ पासून दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यंत करून घेणे आवश्यक राहील. (भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन होईपर्यंत सुधारीत अधिकृत टॅरिफ कार्ड दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यंतच अनुज्ञेय राहील.) मोटार वाहन अधिनियमनुसार बृहन्मुंबई विदयुत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट) १८५० बसेसचे ६ टप्पा प्रवासी वाहतूक परवान्याचे नुतनीकरण करण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.
मुंबई महानगर क्षेत्र प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी व “लास्ट माईल कनेक्टिविटी” अनुषंगाने नवीन ०२ काळी-पिवळी मीटर टॅक्सी स्टॅण्ड, ६८ ऑटोरिक्षा स्टॅण्ड व ०९ शेअर-ए ऑटोरिक्षा स्टँड उभारण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षांचे भाडेदर सूत्र विहित करण्याबाबत शासनाने खटुआ समितीची स्थापना केली होती. समितीने सादर केलेल्या अहवालास शासनाने ०९ मार्च २०२० रोजीच्या निर्णयाव्दारे मान्य केले आहे. त्यानुसार काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) भाडे निश्चितीच्या सुत्रानुसार व वाहनाची सरासरी किंमत, ग्राहक निर्देशांक, वाहन कर्जाचा व्याजदर आदी बाबी विचारात घेऊन भाड्याची परिगणना केली जाते. मोटार वाहन कायदा, १९८८ कलम ६८ अन्वये, राज्य शासनाकडून मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण समिती गठित करण्यात आलेली आहे.
असे आहेत सुधारित दर :-
काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) साठी पूर्वीचे प्रति कि.मी. १८.६६ रुपये वरून २०.६६ रुपये भाडेदर सुधारणा करण्यात आली आहे. आता काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) साठी किमान देय प्रति १.५ कि.मी. भाडे रूपये २८ रुपये वरून ३१ रुपये भाडेदर असणार आहे.
कुलकॅबसाठी पूर्वीचे प्रति कि.मी. भाडे रुपये २६.७१ वरून ३७.२ रुपये (२० टक्के वाढीप्रमाणे) भाडेदर सुधारणा करण्यात आली. आता कुल कॅबसाठी किमान देय प्रति १.५ कि.मी. भाडे रुपये ४० वरून ४८ रुपये (२० टक्के वाढीप्रमाणे) भाडेदर असणार आहे.
ऑटोरिक्षा (सीएनजी) साठी पूर्वीचे प्रति कि.मी. भाडे रुपये १५.३३ रुपये वरून १७.१४ रुपये भाडेदर सुधारणा करण्यात आली आहे. आता ऑटोरिक्षा (सीएनजी) साठी किमान देय प्रति १.५ कि.मी भाडे रूपये २३ वरून २६ रुपये भाडेदर असणार आहे.
0000