भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात येणाऱ्या ‘मीडिया ॲवार्ड-२०२४’ साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
Summary
मुंबई, दि.४ : राज्यातील प्रसारमाध्यमांनी सन २०२४ मध्ये मतदार साक्षरता व जनजागृती संदर्भात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मीडिया ॲवार्ड २०२४ साठी भारत निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांकडून प्रस्ताव मागवले आहेत. यामध्ये चार वर्गवारीमध्ये पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकी एक मुद्रित माध्यम (प्रिंट […]
मुंबई, दि.४ : राज्यातील प्रसारमाध्यमांनी सन २०२४ मध्ये मतदार साक्षरता व जनजागृती संदर्भात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मीडिया ॲवार्ड २०२४ साठी भारत निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांकडून प्रस्ताव मागवले आहेत. यामध्ये चार वर्गवारीमध्ये पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकी एक मुद्रित माध्यम (प्रिंट मीडिया), टेलिव्हिजन (इलेक्ट्रॉनिक), रेडीओ (इलेक्ट्रॉनिक) आणि ऑनलाइन (इंटरनेट)/ सोशल मीडियावरील सर्वोत्कृष्ट प्रचारासाठी पुरस्कार या चार पुरस्कारांचा समावेश आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
प्रसारमाध्यमांनी आपले प्रस्ताव दि. १० डिसेंबर २०२४ पर्यंत राजेश कुमार सिंग, अवर सचिव (संवाद), भारत निवडणूक आयोग, निर्वाचन सदन. अशोका रोड, नवी दिल्ली 110001. ईमेल: media-division@eci.gov.in , फोन नंबर: ०११-२३०५२१३१ केंद्रीय निवडणूक आयोग, दिल्ली यांच्या कार्यालयाकडे परस्पर पाठवायचे आहेत. प्रस्ताव इंग्रजी अथवा हिंदी भाषांमध्ये सादर करावेत. इतर भाषेतील प्रस्ताव इंग्रजी भाषांतरासोबत सादर करावे. पुरस्कारासंदर्भात अंतिम निर्णय हा निवड समितीचा राहील. प्रस्तावावर आपले पूर्ण नाव, प्रसारमाध्यमांचा सविस्तर पत्ता, संपर्क क्रमांक, ईमेल यांची अवश्य नोंद करावी.
निवडणुकांबद्दल जागरुकता निर्माण करून, निवडणूक प्रक्रियेबद्दल लोकांना साक्षर करून, निवडणुकीशी संबंधित माहिती व तंत्रज्ञान वापर, युनिक/रिमोट मतदान केंद्रांवरील कथा आणि सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून मतदान, नोंदणीची प्रासंगिकता आणि महत्त्व या कार्यात निवडणूक सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.
निकष – या पुरस्कारासाठी सादर करण्यात येणारे वृत्त, प्रसिद्धी साहित्य 2024 दरम्यान प्रसारित/प्रक्षेपित प्रकाशित केले गेले असावे. संबंधित कालावधीत केलेल्या कामाचा सारांश ज्यामध्ये बातम्या/लेखांची संख्या, चौरस सेमी मध्ये एकूण मुद्रण, पीडीएफ सॉफ्ट कॉपी QR संबंधित वेब पत्त्याची लिंक, वर्तमानपत्र/लेखांची पूर्ण आकाराची छायाप्रत/मुद्रित प्रत, थेट सार्वजनिक सहभाग इ. इतर माहिती याचा समावेश करावा.
मुद्रित माध्यमांसाठी प्रसिद्ध झालेले लेख अथवा बातम्या यांचा आकार, आणि पीडीएफ कॉपी सोबत जोडणे आवश्यक आहे. यासोबतच दैनिकाचा वर्ग अथवा एबीसीद्वारे प्रमाणित वर्गवारी यांची माहिती द्यावी.
ईलेक्टॉनिक माध्यमे यामध्ये विविध वाहिन्या, रेडीओ यासाठी प्रसारित केलेले साहित्य पेन ड्राईव्ह मध्ये सादर करावे तसेच प्रसारित झालेल्या बातम्या, यशोगाथा विशेष वृत्तांकन यांच्या प्रसारणाची वेळ नमूद करावी. मतदान जनजागृतीबाबत इतर विशेष उपक्रम वाहिनीमार्फत राबवण्यात आले असल्यास त्याची माहिती द्यावी.
प्रसारण/टेलिकास्टचा कालावधी आणि वारंवारता आणि कालावधी दरम्यान प्रत्येक स्पॉटच्या अशा प्रसारणाची एकूण वेळ, सर्व स्पॉट्स/बातम्यांच्या एकूण प्रसारण वेळेची बेरीज याची माहिती नमूद करावी. सीडी किंवा डीव्हीडी किंवा पेन ड्राईव्हमध्ये इतर डिजिटल मीडियावरील बातम्या फीचर्स किंवा मतदार जागृतीवर कार्यक्रम, कालावधी, टेलिकास्ट/प्रसारण तारीख आणि वेळ आणि वारंवारता याची माहिती द्यावी.
समाजमाध्यमांवरील प्रसारित साहित्य यामध्ये ब्लॉग, कॅम्पेन, ट्विट आणि लेख याची माहिती पीडीएफ तसेच सॉप्ट कॉपीमध्ये सादर करावी. तसेच प्रसारित केलेल्या लिंकचा तपशीलही त्यात द्यावा. याशिवाय लोकजागृतीसाठी इतर काही उपक्रम राबवले असल्यास त्याची माहिती द्यावी.
निवड झालेल्या पुरस्कारार्थींना राष्ट्रीय मतदार दिनी 25 जानेवारी 2025 रोजी पुरस्कार प्रदान केले जातील, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
0000