BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

अहिल्यादेवींचे सुशासन, मंदिरांचा जीर्णोद्धार व महिला सक्षमीकरणाचे कार्य लोकोत्तर – राज्यपाल रमेश बैस

Summary

मुंबई, दि. ३१ : भारताचा वारसा, संस्कृती आणि सामर्थ्य समृद्ध करण्यात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे खूप मोठे योगदान लाभले आहे. अहिल्यादेवींचे सुशासन, मंदिरांचा जिर्णोद्धार व महिला सक्षमीकरणाचे कार्य लोकोत्तर असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी […]

मुंबई, दि. ३१ : भारताचा वारसा, संस्कृती आणि सामर्थ्य समृद्ध करण्यात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे खूप मोठे योगदान लाभले आहे. अहिल्यादेवींचे सुशासन, मंदिरांचा जिर्णोद्धार व महिला सक्षमीकरणाचे कार्य लोकोत्तर असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती समारंभाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाचे लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र आणि समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहाँगीर दीक्षांत सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् अँड रिसर्चचे संचालक प्रा. सतीश मोढ, समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेशचे कोषाध्यक्ष धीरज बोरीकर, मुंबई विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दूरदर्शी प्रशासक म्हणून अहिल्याबाईंनी जमीन महसूल व्यवस्थापनाची प्रक्रिया सुलभ केली. त्यांच्या प्रशासन निष्पक्षता, न्याय आणि प्रजेबद्दलच्या कर्तव्याच्या भावना उदार होत्या. महिलांच्या हक्कांसाठी व सामाजिक-आर्थिक उन्नतीचे मार्ग निर्माण करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. आज महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने परिस्थितीत लक्षणीय बदल होत असून सर्वत्र महिलांचे प्रतिनिधीत्व वाढत आहे ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचे पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे समर्पण वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच मंदिरांची पुनर्बांधणी केली. अहिल्याबाई होळकर या थोर समाजसुधारक होत्या. माळवा संस्थेत सती प्रथेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. वाईट प्रथा मोडीत काढत त्यांनी मुलींचे लग्नाचे वय वाढविण्याचे धाडसी पाऊल उचलले. विधवांना मालमत्तेत हक्क दिला असल्याचेही  राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.

आज, जसे आपण अहिल्यादेवींचा वारसा लक्षात ठेवतो, तसेच जीवनाच्या सर्व क्षेत्रात महिलांना नेतृत्व पदे स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज देखील आपण ओळखली पाहिजे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात महिलांना समान भागीदार केल्याशिवाय ‘विकसित भारत’चे उद्दिष्ट आपण साध्य करू शकत नाही. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृती जपून, आपण अधिक समावेशक आणि न्याय्य समाजाची निर्मिती केली पाहिजे.  अहिल्यादेवी होळकरांचा वारसा पुढे नेण्यासाठी विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार असून राज्यातील विद्यापीठांना विद्यार्थिनींसाठी अधिकाधिक वसतिगृहे बांधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. नोकरदार महिलांसाठी अधिकाधिक वसतिगृहे बांधणे व वंचित आदिवासी मुली गरिबीमुळे शाळा सोडणार नाहीत याची सर्वांनी काळजी घेतली जाणे हेही तितकेच महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाधिक महिला उद्योजिका निर्माण व्हाव्यात, महिलांना अधिक स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक असून महिलांना त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या उद्देशाने राज्य आणि केंद्राच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा याची आपणा सर्वांस खात्री करावी लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी असून अशा महनीय व्यक्तिमत्वातून सतत प्रेरणा मिळत राहावी, यासाठी वर्षभर विद्यापीठामार्फत विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् अँड रिसर्चचे संचालक प्रा. सतीश मोढ यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर सखोल प्रकाश टाकला. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जगलेले ७० वर्षांचे आयुष्य आज तीनशे वर्षानंतर आणि इथून पुढेही चिरकाल प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. बळीराम गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती समारंभाचे औचित्य साधून दीक्षान्त सभागृहात भरविण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावरील चित्र प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *