BREAKING NEWS:
हेडलाइन

‘सोमपूरा महाविहार’ बांगलादेशाची शान ‘Sompura Mahavihar’ the great Vihar of Bangladesh.

Summary

बांगला देशात नावगाव जिल्ह्यात पहारपूर येथे एक मोठे बौद्ध विहार आहे. याचे नाव सोमपूरा महाविहार असून ते जवळजवळ २७ एकर जागेत पसरलेले आहे. या विहाराचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रचंड मोठ्या समभूज चौकोनी आकारात स्थापित केले असून तेथे १७७ ध्यानकक्ष चारी […]

बांगला देशात नावगाव जिल्ह्यात पहारपूर येथे एक मोठे बौद्ध विहार आहे. याचे नाव सोमपूरा महाविहार असून ते जवळजवळ २७ एकर जागेत पसरलेले आहे. या विहाराचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रचंड मोठ्या समभूज चौकोनी आकारात स्थापित केले असून तेथे १७७ ध्यानकक्ष चारी बाजूस होते व मध्यभागी मोठा स्तूप होता. आज जरी तेथे पडझड झाली असली तरीही त्याच्या आकारमानावरून त्याच्या भव्यतेची कल्पना येऊ शकते. केंद्रीय मुख्य स्तूपाच्या आजूबाजूस अनेक छोटेमोठे स्तूप आणि लहान विहार, दगडी शिल्पे, शिलालेख विखुरलेल्या अवस्थेत सापडले होते.

येथील पाल राजवटीच्या काळात दुसरा पाल राजा (इ.स. ७८१-८२१) याने हे विहार बांधले. तसेच महिपाल राजाच्या काळात (इ.स. ९९५-१०४३) या विहाराची दुरुस्ती केल्याचा उल्लेख आढळतो. येवढ्या मोठ्या प्रचंड जागेत हे भव्य महाविहार पसरलेले असल्यामुळे त्याचा प्रभाव बर्मा, जावा, कंबोडिया येथील विहारांवर पडला असावा असे एका तज्ञांनी सांगितले. याचे विलोभनीय भव्यदिव्य आकारमान आणि भारत खंडात कुठेही न आढळणारी स्वतंत्र विहाराची शैली यामुळे या विहाराचे सन १९८५ मध्ये जागतिक वारसा यादीत नाव समाविष्ट झाले.

जेव्हा पाल राजवटीत या विहाराचे बांधकाम केले गेले तेव्हा त्यावेळी बंगाल व मगध हे त्याचे क्षेत्र होते. सोमपूरा विहारात एक मोठा प्रज्ञावंत बौद्ध भिक्खू रहात असल्याचा उल्लेख चिनी भिक्खू प्रवासी ह्युएनत्संग यांनी त्यांच्या प्रवासवर्णनात केला आहे. तसेच आता अस्तित्वात असलेली सुधारित बंगाली भाषा ही आठव्या शतकापासून आकार घेत होती असे जाणकारांचे म्हणणे आहे. प्रसिद्ध बौद्ध स्थळ सीताकोट व हळूड येथून जवळच असून सन १९७२-७३ दरम्यान तेथे उत्खनन होऊन बौद्ध विहार सापडले.

अभ्यासाअंती तज्ज्ञांना उमजून आले की सोमपूरा महाविहार हे बांगलादेशातील एक उत्कृष्ट पुरातत्त्वीय ठिकाण आहे. अकराव्या शतकात वंग सैन्यामुळे येथे आग लागून हे विहार नष्ट झाले, असा उल्लेख नालंदा येथील ‘विपुल श्रीमित्रा’ नोंदीवरून आढळतो. बाराव्या शतकात सेन राजवटीत परकीय आक्रमणामुळे येथील विहाराची नासधूस झाली. सद्यस्थितीत युनेस्को UNESCO चे अधिकारी येथे वारंवार भेट देत असून हे अत्यंत महत्वाचे भव्य विहार सुरक्षित ठेवणे बाबत कार्यवाही करीत आहेत. येथील सुधारणेसाठी मास्टर प्लॅन UN ने तयार केला असून US$ ५.६ मिलियन तरतूद त्यासाठी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *