भावी पिढीला वाचनाची आवड निर्माण करणे गरजेचे – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर
मुंबई दि. १५ : जगातील जे देश वाचनाबाबत आघाडीवर होते तेच देश आपला सर्वांगीण विकास जलद गतीने करू शकले आहेत. आपला देश विकसित करण्याकरिता देशातील भावी पिढी म्हणजे लहान मुलांनमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी मराठी भाषा विभागाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
मंत्रालयातील भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे याच्यासह मराठी भाषा विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मंत्री श्री केसरकर म्हणाले, भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना वाचनाची प्रचंड आवड होती. आपल्या भारत देशाला पुढे घेवून जाण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. भावी पिढी सक्षम करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. डॉ. अब्दुल कलाम यांच्या मनातील संकल्पना पुढे घेवुन जाण्यासाठी मराठी भाषा विभागाने प्रयत्न केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. तसेच पुस्तका संदर्भात ग्रंथालय हा वेगळा विषय असला तरी संबंधित विभागा सोबत संयुक्त बैठक घेवून ग्रंथालयाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रंथालय चळवळ चालू करावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आजूबाजूच्या जगातील माहिती होते. वाचनामुळे आपण ज्ञान संपादन करतो, विचार शक्ती वाढते आणि आपल्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते. शिकलेल्या माणसाला आपली प्रगती करता येते. मुलांच्या प्रगतीत पालकांचा वाटा असतोच. मुलांनी मागे न राहता जगाबरोबर धावावे, याकडे त्यांची धडपड असते, कल असतो. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘ वाचाल, तर वाचाल’ हा संदेश लक्षात ठेवला पाहिजे’
राज्यात पुस्तकाचे गाव ही संकल्पना सातारा जिल्ह्यातील भिलारगावापासून सुरुवात झाली आहे. पुस्तकाच्या गावात आता एक अभिनव संकल्पना आता पुस्तकप्रेमींसाठी रुजू झाली आहे. कल्पना तशी साधी आहे पण अनोखी आहे. इथे या, पुस्तके हाताळा, चाळा, वाचा. ते देखील अगदी मोफत. थोडी थोडकी नव्हे तर जवळ जवळ १२ हजार ते १५ हजार पुस्तके याठिकाणी आहेत. या पुस्तकांची व्यवस्था त्यांच्या त्यांच्या साहित्यप्रकारानुसार गावातील वेगवेगळ्या ठिकाणी केली आहे. यातील काही ठिकाणी तुम्ही निवास करू शकता असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी मराठी भाषेत ज्ञानेश्वरी लिहून मराठी भाषा अबाधित ठेवली आहे. मुंबई सारख्या राज्याच्या राजधानीत मराठी भाषा बोलतांना कोणालाच कमीपणा वाटता कामा नये.परराज्यातील नागरिकांनी येथे राहतांना मराठी बोलणे शिकले पाहिजे.वाचनाची चळवळ पुढे चालू राहिली तर मराठी भाषा प्रगल्भ होवू शकेल असे त्यांनी यावेळी सांगितले.