हेडलाइन

समर्पित आयोगापुढे विविध संघटनांकडून शेकडो अर्ज 

Summary

समर्पित आयोगापुढे विविध संघटनांकडून शेकडो अर्ज   नागरिकांनी, संघटनांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मांडली भूमिका नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या सहा जिल्ह्यातील विविध संघटना, नागरिकांनी आज समर्पित आयोगापुढे आपली भूमिका मांडली. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात आयोगाच्या तीन पथकाने दुपारी […]

समर्पित आयोगापुढे विविध संघटनांकडून शेकडो अर्ज

 

नागरिकांनी, संघटनांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मांडली भूमिका

नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या सहा जिल्ह्यातील विविध संघटना, नागरिकांनी आज समर्पित आयोगापुढे आपली भूमिका मांडली. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात आयोगाच्या तीन पथकाने दुपारी 3.45 वाजतापासून सुनावणीला सुरूवात केली. एकूण 115 शिष्टमंडळांनी व व्यक्तिंनी आयोगापुढे आपली बाजू मांडली.

 

राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समर्पित आयोगासमोर आज मोठ्या प्रमाणात विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक-प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येकाने आपली लेखी निवेदने सादर केली. यावेळी विशिष्ट पेहरावही त्यांनी केले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ११ मार्च २०२२ रोजीच्या अधिसूचनेद्वारे “महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षणासाठी समर्पित आयोग” गठीत केला आहे. या आयोगाने आज सकाळच्या सत्रात अमरावती तर दुपारच्या सत्रात नागपूर येथे सुनावणी घेतली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या आयोगाच्या कार्यकक्षेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्यासाठी अभिवेदन, सूचना मागविण्यात आल्या आहेत. आयोगाच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निवेदन सादर करण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. त्यानुसार मोठ्या प्रमाणात व्यक्ती आणि प्रतिनिधींनी नोंदणी केली. विभागीय आयुक्त कार्यालयात नागपुरातील उन्हाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन बाहेर सुसज्ज मंडप टाकण्यात आला होता. या ठिकाणी येणाऱ्या शिष्टमंडळाला नोंद घेऊन टोकण दिले जात होते. तीन गटात आयोगाच्या सदस्यांनी शिष्टमंडळांचे म्हणणे ऐकूण घेतले. या सर्व शिष्टमंडळाच्या सदस्यांचे म्हणणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. शिष्टमडंळाला बाहेर बसण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची व चहाची व्यवस्था करण्यात आली होती.

सहा जिल्ह्यातून निवेदने

नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी संघटनांचे प्रतिनिधींसोबत अल्पसंख्याक, भटक्या विमुक्त संघटना, अनुसूचित जाती, कास्ट्राईब संघटना, विविध जातीच्या संघटना, राजकीय पक्ष व संघटना, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, पक्षाचे प्रवक्ते, स्थानिक स्वराज संस्थांच्या प्रतिनिधींनी निवेदने देत आपली भूमिका मांडली. आयोगाने निवेदने देण्यासाठी दुपारी 4.30 ते 6.30 पर्यत वेळ ठेवली असताना नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेता 3.45 पासून आयोगाने कामकाजाला सुरूवात केली, सायकाळी उशीरा पर्यत निवेदने स्विकारण्यात आली.

राजकीय पक्षांसह विविध संस्था आणि संघटनांच्या एकूण 115 प्रतिनिधींनीदेखील आपली मते नोंदवली. समर्पित आयोगाचे अध्यक्ष राज्याचे माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया(भा.प्र.से. निवृत्त), सदस्य टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे असोसिएट प्रोफेसर डॉ.शैलेशकुमार दारोकार, डॉ.नरेश गिते (भा.प्र.से. निवृत्त), माजी प्रधान सचिव महेश झगडे (भा.प्र.से. निवृत्त), माजी. प्रधान सचिव ह.बा.पटेल व या आयोगाचे सदस्य सचिव तथा महाराष्ट्र मस्त्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कुमार (भा.प्र.से) यांच्या उपस्थितीत निवेदने स्विकारण्यात आली. या सर्व निवेदनांची नोंद आयोग घेत असल्याची माहिती समर्पित आयोगाच्या सदस्य सचिवांनी दिली आहे.

 

समर्पित आयोगाने यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपायुक्त आशा पठाण, निवडणूक उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर व प्रशासनातील अन्य अधिकारी उपस्थित होते.

 

चौकट

समर्पित आयोगाला निवेदन देण्यासाठी नागपूर विभागाच्या विविध भागातून आलेले प्रतिनिधींनी दुपारी ऐन उन्हात मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रत्येक प्रतिनिधींना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. आलेल्या प्रत्येक प्रतिनिधींना आपले मत मांडण्याची आणि निवेदन देण्याची संधी देण्यात आली. काही शिष्टमंडळाने आपल्या मागणीच्या टोप्या घातल्या होत्या, काहींनी विशिष्ट पेहराव करीत आपली मागणी मांडली. आयोगाने नागपूर विभागाने केलेल्या पिण्याच्या पाण्याची व बैठक व्यवस्थेविषयी समाधान व्यक्त केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *