▪ साहेब, शाळा कधी उघडणार▪ शाळा उघडण्यासाठी कुणी ▪ आवाज का? उठवीत नाही ▪ विद्यार्थ्यांच्या भवितव्यात ▪ अंधार पसरण्याची भीती ▪ पालकांनी पुढाकार घेण्याची गरज ▪
▪महेश देवशोध ( राठोड )▪
▪ वर्धा, जिल्हा प्रतिनिधी ▪
शिकल्या सवरलेल्या समाजाची मानसिकता अजूनही बदललेली दिसत नाही. मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद होतो .आंदोलने केली जातात. मात्र शाळा उघडण्यात करिता कुणीच काही बोलत नाही. राजकीय पोळी शेकणारे आवाज उचलताना दिसत नाही. दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यांचे उज्वल भवितव्य घडविण्याकरिता आता पालकांनीच शाळा सुरू करण्याची एक मुखी नारा देण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोना मुळे शाळा बंद आहेत .गेल्या चार महिन्यात देश आणि राज्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विदर्भात तर ही संख्या नगण्य असल्यासारखी आहे. युरोप आणि अमेरिकेत तिसरी लाट सुरू असताना सुद्धा तेथील शाळा बंद नाही. जगभरामध्ये शिक्षणाचा फिनलांड पॅटर्न नावाजलेला आहे. त्या फिनलंड मध्ये सुद्धा शाळा, प्री प्रायमरी पासून सुरू आहेत. देशभरातील सर्व तज्ञ मंडळींनी दीड वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे मुले तीन वर्षे मागे जाण्याची भीती व्यक्त केली आहे.
लवकरात लवकर शाळा सुरू झाल्या नाही. तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण पिढी वर पहायला मिळतील. पण खेदाची बाब ही की कुठलाही राजकीय पक्ष शाळा उघडण्याच्या संदर्भात ‘ब्र ‘शब्द सुद्धा काढत नाही. मंदिरे सुरू करण्यासाठी राजकीय पक्ष राज्यभर आंदोलने करतात. मोर्चे काढतात .मात्र शाळा सुरू करण्यासंदर्भात राजकीय मंडळी बोलताना दिसत नाही.
संविधानाने सर्वांना शिक्षण घेण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. गेल्या दीड वर्षापासून राज्यातील लाखो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. ऑनलाइन शिक्षण हा निव्वळ फार्स आहे ह्याची जाणीव सर्व राज्यकर्त्यांना असून सुद्धा त्यांच्या मताचे राजकारण शिक्षणावर नसल्यामुळे शाळा सुरू करण्यासंदर्भात त्यांची भूमिका संदिग्ध असल्याचे बोलल्या जात आहे .
जनतेची माथी देव आणि धर्माच्या नावावर भडकविता येतात. मात्र शिक्षण आणि शाळा येणाऱ्या पिढीला वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सारासार विवेक बुद्धी वापरण्याचे तंत्र शिकवीत असते . अनेक राजकीय लोकांना जनता निर्बुद्ध असावी असे वाटते. दर्जेदार शिक्षणामुळे भावी पिढीमध्ये विवेक दृष्टी जागृत झाली तर त्यांची राजकीय स्थान अडचणीत येऊन त्यांचा दांभिकपणा उघडा पडण्याची दाट शक्यता निर्माण होते . त्यामुळे राजकीय पक्षाकडून शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्याची अपेक्षा सोडून दिली पाहिजे, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे .
ज्यांना शिक्षणाचे महत्त्व कळले आहे. सारासार विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा समाज निर्माण व्हावा असे वाटणाऱ्या सर्वांनी शाळा आणि शिक्षणाची नौका पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी ताकदीने, ताकदीने प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी फक्त निवेदने, विनंती व चर्चा करून चालणार नाही तर रस्त्यावर उतरावे लागेल. संविधानिक मार्गाने सरकारला जाब विचारावा लागेल. असा सूर सध्या उमटत आहे . सर्व सुज्ञ नागरिक, पालक , शिक्षक व संस्थाचालकांनी मुलांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी लढाई लढण्याची गरज व्यक्त होत आहे .
▪पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क▪73 78 70 34 72 ▪