मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याशी ‘लोकशाही गप्पा’ विद्यार्थ्यांचा उस्फूर्त सहभाग
Summary
पुणे, दि. 5 : लोकशाही मूल्ये, भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने, मतदारांमध्ये लोकशाही मूल्यांची जागरुकता निर्माण करण्याचे मार्ग या विषयावर प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पुणे विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी यामध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला. […]
पुणे, दि. 5 : लोकशाही मूल्ये, भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने, मतदारांमध्ये लोकशाही मूल्यांची जागरुकता निर्माण करण्याचे मार्ग या विषयावर प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पुणे विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी यामध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकशाही गप्पा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक पवार, सुहास पळशीकर, प्रवीण महाजन, रवींद्र धनक, नागराज मंजुळे, श्रीरंग गोडबोले, राही श्रुती गणेश, विद्यापीठातील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी इव्हीएम मशीन बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकांत देशपांडे म्हणाले, प्रत्यक्ष मतदान सुरु होण्यापूर्वी मशीनची तपासणी केली जाते. मतदानाच्यावेळी मशीन बंद पडले म्हणून त्यातील डेटा लॉस होत नाही. अशावेळी पुढच्या प्रक्रियेसाठी दुसरे मशीन वापरले जाते. मतदार नोंदणी बंधनकारक करण्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, मतदार नोंदणी वाढविण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी केलेली असणे बंधनकारक केल्यास मतदार नोंदणी वाढू शकते. मतदान प्रक्रियेसाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहकार्य देऊ शकतात याचे उत्तर देताना श्री. देशपांडे म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये मताधिकाराविषयी जाणीव-जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने महाविद्यालयांमध्ये ‘निवडणूक साक्षरता मंडळे’ सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअंतर्गत विद्यार्थी वंचित घटकांच्या मतदार नोंदणीसाठी आणि नैतिक मतदान याविषयी जागृती करु शकतात.
शहरी भागातील नागरिकांचा लोकशाही प्रक्रियेतला सहभाग कमी का? या प्रश्नाला उत्तर देताना श्री. देशपांडे म्हणाले, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातल्या मतदारांची जीवनशैली अधिक आत्मकेंद्री आहे. करिअर, व्यवसाय यामध्ये तो गुंतलेला आहे. तृतीय पंथी, दिव्यांग तसेच शरीर विक्री करणाऱ्या महिलांना एनजीओ मार्फत मतदान प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना सुहास पळशीकर म्हणाले, लोकांनी लोकशाहीचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. लोकशाहीच्या मर्यादा सांभाळणे हे आपले कर्तव्य आहे. लोकशाही जगवणारे नागरिक विद्यार्थ्यांनी बनावे.
नागराज मंजुळे म्हणाले, लोकशाही मूल्य नैतिकतेत उतरली नाहीत तर त्याचा उपयोग होत नाही. मतदानाचा अधिकार म्हणजे जगण्याचा अधिकार आहे. आरक्षणाचा हेतू काय याचा विचार केला जात नाही. लोकशाही हे वेगवान वाहन आहे परंतु ते चालवायचे कसे हे लोकांना कळत नाही. तरूणांनी सतत जागरूक राहून मतदान केले पाहिजे.
यावेळी रवींद्र धनक, श्रीरंग गोडबोले, प्रवीण महाजन, राही श्रुती गणेश यांनीही आपली लोकशाही विषयीची मते मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पवार यांनी तर आभार प्रभाकर देसाई यांनी मानले.