BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

‘पोषण माह’मध्ये अव्वल क्रमांक मिळवण्याबरोबच निरंतर प्रयत्नांद्वारे कुपोषणाला हरविण्याचा निर्धार करा – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

Summary

मुंबई, दि. 1: कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा. परंतु, केवळ पोषण महिन्याच्या स्पर्धेपुरतेच नव्हे तर वर्षभर काम करत कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा, असे निर्देश महिला व बालविकास […]

मुंबई, दि. 1: कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा. परंतु, केवळ पोषण महिन्याच्या स्पर्धेपुरतेच नव्हे तर वर्षभर काम करत कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

राष्ट्रीय पोषण महिन्याचा राज्यातील शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे ॲड. ठाकूर यांच्या हस्ते झाला. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव इद्झेस कुंदन, एकात्मिक बालविकास सेवा योजना (आयसीडीएस) आयुक्त रुबल अग्रवाल, राजमाता जिजाऊ माता बाल पोषण अभियानचे संचालक संजीव जाधव, आयसीडीएसचे उपायुक्त गोकुळ देवरे, सहायक आयुक्त विजय क्षीरसागर आदी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.

कुपोषण ही एक गंभीर समस्या असून त्यावर आपल्याला मात करायची आहे, असे सांगून मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, पोषण महिन्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस यांना महत्त्वाची भूमिका बजावायची आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी ज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे पदाधिकारी, स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी लोकांमध्ये काम करणाऱ्यांना सहभागी करुन घ्यावे. कोविडचे नियम पाळून जास्तीत जास्त नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून आणि लोकसहभाग वाढवून पोषण माहमध्ये देशात पहिला क्रमांक मिळवावा.

ॲड. ठाकूर पुढे म्हणाल्या, शून्य ते 6 वर्ष वयोगटातील बालके असलेल्या स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांवर लक्ष ठेवायचे असून त्यामधील लहान बालकांना स्थलांतराच्या नवीन ठिकाणी पूरक पोषण आहार सुलभतेने मिळेल या बाबीची खात्री करावी लागेल. त्यादृष्टीने चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी राजमाता जिजाऊ मिशनच्या सहयोगातून तयार केलेले स्थलांतरित लाभार्थ्यांसाठीचे (मायग्रेशन सॉफ्टवेअर) उपयुक्त ठरेल.

आदीवासी भागामधील कुपोषण निर्मुलनासाठी रानभाज्यांमधील पोषक तत्त्वांची माहिती पोहोचवणे आवश्यक आहे. तसेच या भाज्यांच्या उत्तम पाककृतींचा समावेश रोजच्या आहारात करणे उपयुक्त ठरेल, असे मत अॅड. ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले.

प्रत्येक अंगणवाडीतील शालेयपूर्व शिक्षण उत्कृष्ट व्हावे हे आपले स्वप्न आहे, असेही त्या म्हणाल्या. कोविड- 19 च्या काळात अंगणवाडी सेविकांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम केले. अनंत अडचणींवर मात करत, दुर्गम भागात, काही ठिकाणी नावेतून जात पोषण आहार पुरवला आहे. आताही अशाच प्रकारे आपल्याला काम करायचे आहे. कोविडचा धोका टाळून हे काम सुरक्षितरित्या करण्यासाठी राज्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षक, सेविका, मदतनीस यांचे  शंभर टक्के कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

यावेळी प्रधान सचिव श्रीमती कुंदन म्हणाल्या, तीव्र कुपोषित बालकांवर लक्ष ठेऊन त्यांच्यापर्यंत आयसीडीएसच्या सेवा पोहोचवण्यासाठी आणि कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी मायग्रेशन सॉफ्टवेअर उपयुक्त ठरेल. गडचिरोली मध्ये 100 अंगणवाड्यांमध्ये राबवण्यात येणारा शालेयपूर्व शिक्षणाच्या तितली प्रकल्पातील उपयुक्त बाबींचा ‘आकार’ अभ्यासक्रमात करण्याबाबत अभ्यास करुन प्रस्ताव सादर करावा. पोषण माहमध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या संख्येबरोबच त्यांची गुणवत्ताही उत्कृष्ट असली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, पोषण माहमध्ये ॲनिमिया मुक्त भारत, बाळाचे पहिले 1 हजार दिवस, कुपोषण मुक्ती, गरोदरपणातील काळजी, पोषण-सुपोषण यावर वेबिनार, निबंध स्पर्धा यांच्या मार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. परसबागा अर्थात पोषण वाटिकांची निर्मिती, योगा, पोषण सामुग्रीचे वाटप, सॅम बालकांचा शोध आणि पोषण आहार व इतर मदत उपलब्ध करुन देणे, या प्रमुख संकल्पना पोषण माहमध्ये राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी पूर्ण महिन्यात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमादरम्यान मायग्रेशन सॉफ्टवेअरचे उद्घाटन, तितली प्रकल्पाचे उद्घाटन, केंद्र शासनाच्या पोषण ज्ञान पोर्टलवर ‘एक घास मायेचा’ या राज्याच्या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांनी बनवलेल्या पाककृतींच्या चित्रफीती अपलोड करण्याचा शुभारंभ, संपर्क संस्थेमार्फत ऑनलाईन पाककृती स्पर्धांचे प्रदर्शन आणि उद्घाटन करण्यात आले. माता बाल पोषणाची शिदोरी उपक्रमाची ऑनलाईन चित्रफितीचे संगणकीय कळ दाबून उद्घाटन, कोविड काळात अंगणवाड्यांनी केलेल्या कामाबाबतचा अभ्यास अहवाल, बाल कल्याण समितीच्या कार्य अभ्यास अहवालाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *